हरित आवार : पर्यावरणाला नवसंजीवनी देणारा प्रकल्प! 

हरित आवार प्रकल्पाचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या मंगल दिनी, १३ एप्रिल २०२१ रोजी होत आहे.

साताऱ्याची ‘रयत शिक्षण संस्था’ आणि अमेरिकेतील महाराष्ट्रीयांनी स्थापन केलेली ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ या दोन्ही संस्थांनी नवी दिल्लीतल्या ‘क्लायमेट प्रोजेक्ट फाउंडेशन’ या संस्थेबरोबर सहकार्य करून आपल्या शाळा व महाविद्यालयांचे परिसर अधिक हरित आणि शाश्वत करण्याचे ठरवले आहे. कोणी कधीही अपेक्षा न केलेल्या किंवा विचारही न केलेल्या २०२० साली आलेल्या कोरोना जागतिक महामारीमुळे संपूर्ण जगाचे चित्रच बदलून गेले. या रोगाची साथ नियंत्रणाखाली आणण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले जात असूनही या रोगाचे थैमान चालूच आहे. यामागे कारण आहे पर्यावरणाचा ऱ्हास!

वनक्षेत्राच्या ऱ्हासामुळे आणि जंगली प्राण्यांचे अधिनिवास नष्ट झाल्यामुळे असे प्राणी मानवाच्या संपर्कात येत आहेत व या प्राण्यांपासून मानवापर्यंत पसरत जाणारे प्राणिजन्य आजार हे सध्याच्या काळातील सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. या कारणांमुळे पर्यावरणाबद्दलच्या आपल्या सध्याच्या विचारशैलीत बदल करणे आवश्यक आहे. ज्या पर्यावरणात आपल्याला राहावे लागते आहे, त्याचा आपल्या मनावर, कृतींवर आणि व्यक्तिमत्त्वावर खूप खोलवर परिणाम होतो. म्हणूनच आता आपण अधिक संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने उत्तम पर्यावरण या पृथ्वीवर निर्माण करण्याचे कार्य सुरू करायला हवे. ही बाब लक्षात घेऊन शिक्षणपद्धतीचे नियोजन करताना त्यात केवळ विद्यार्थ्यांचाच विचार न करता शिक्षकांचादेखील विचार केला आहे आणि केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे, तर संपूर्ण परिसराचे हरित आवारात रूपांतर व्हावे, हा विचार केला आहे.

हरित आवार कार्यक्रमांतर्गत हे उपक्रम राबवणार! 

  • सौर पत्र्यांमधून (सोलर पॅनेल) येणारी स्वच्छ ऊर्जा
  • पर्जन्य जलसंधारण केल्यामुळे होणारे पाण्याचे संवर्धन
  • कचऱ्याचे व्यवस्थापन आणि खतनिर्मिती करणे

(हेही वाचा : २०२१ वर्ष जागतिक तापमान वाढीचा उच्चांक मोडणार! )

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रकल्पाला सुरुवात! 

हरित आवार कार्यक्रमामुळे आवारातील हवा स्वच्छ राहील. आवार पर्यावरणस्नेही होईल. म्हणून यासाठी रयत शिक्षण संस्था पुढे आली आणि क्लायमेट रियालिटी फाऊंडेशन आणि महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्याने आपल्या शाळा व महाविद्यालयांची आवारे हरित करण्यासाठी DEEPAK (Delivery of Environment Education to Professionals for Awareness and knowledge) हा प्रकल्प सुरु करण्याचे ठरविले. म्हणजेच व्यावसायिकांना पर्यावरण शिक्षण देऊन त्यांच्यात ज्ञान आणि जाणीव जागृती निर्माण करणे हे कार्य हाती घेतले आहे. एप्रिल महिन्यातच या तिन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करारावर (MOU)  सह्या करण्यात आल्या. गुढीपाडव्याच्या मंगल दिनी, १३ एप्रिल २०२१ रोजी या प्रकल्पाची सुरुवात होत आहे.

हरित क्रांतीचा संकल्प करणाऱ्या तिन्ही संस्थांचा परिचय!

क्लायमेट प्रोजेक्ट फाउंडेशन

’ही ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर चालणारी संस्था असून हवामान बदल शिक्षणासंबंधी ही संस्था कार्यरत आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या सहकार्याने यांचे काम चालत असते. हवामान बदल आणि पर्यावरणीय शाश्वतता या दोन्ही विषयातील संदेश शिक्षकांना द्यावे म्हणून शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजले जातात. याअंतर्गत शाश्वत विकासाची ध्येये आणि हवामान बदल याची माहिती दिली जाते. त्याच सोबत विद्यार्थी आणि पालक यांना देखील कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाते. आपल्या संपूर्ण देशातील आठ हजारांहून अधिक शिक्षकांबरोबर काम करण्याचा अनुभव असल्यामुळे ‘क्लायमेट प्रोजेक्ट फाउंडेशन’, रयत शिक्षण संस्थेची आवारे हरित करण्यासाठी नक्कीच मदत करेल. हरित आवार उपक्रमामुळे कायापालट घडवून येणारे शिक्षण आणि शाश्वततेकडे वाटचाल करणारे कार्यक्रम हे शिक्षक, शाळा, महाविद्यालय, इतर पदाधिकारी आणि रयत शिक्षण संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी घेतले जातील. ‘क्लायमेट रियालिटी प्रोजेक्ट ’ हे अगोदरच ठिकठिकाणी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आणि हरित आवार कार्यक्रम या स्वरूपात देशभरात हवामान बदल विषयक कार्यक्रम घेत आहे आणि आता तर ही संस्था अजून अधिकच मेहनत घेईल.
अधिक माहितीसाठी खालील इ मेलवर संपर्क साधा.
The Climate Reality Foundation (India branch)
E: [email protected]
Website: www.climatereality.org.in

महाराष्ट्र फाउंडेशन

ही संस्था अमेरिकेत राहणाऱ्या आणि तेथे काम करणाऱ्या मराठी मंडळींनी स्थापन केली आहे. आपल्या राज्याच्या आणि देशाच्या प्रेमाखातर त्यांनी या फाउंडेशनची स्थापना केली आहे.  युनायटेड स्टेट्समधील  सर्वांसाठी सामाजिक आणि आर्थिक न्याय या तत्त्वानुसार आणि  त्यासंबंधीच्या कायद्याप्रमाणे ही संस्था धर्मादाय आणि ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर चालते. आरोग्यसेवा सुधारणे, पर्यावरण, शिक्षण आणि स्त्री सबलीकरणाला प्रोत्साहन देणे, तसेच दारिद्र्यनिर्मूलन अशा कारणांसाठी ही संस्था मदत करते.

रयत शिक्षण संस्था

ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी इ.स.१९१९ मध्ये  स्थापन केलेली भारतीय शिक्षणसंस्था आहे. शंभर वर्षाहूनही अधिक जुनी असलेली ही संस्था दक्षिण आशियातील सर्वात मोठी शिक्षणसंस्था मानली जाते. जात, धर्म किंवा आर्थिक स्तर यामुळे शिक्षणाची ज्यांना संधी मिळालेली नव्हती अशा विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी या संस्थेची स्थापना झाली. याचे मुख्यालय महाराष्ट्रातील सातारा येथे आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि हरित पृथ्वी बनवून चांगल्या भविष्याकरिता कायापालट करणे हे केवळ शिक्षणामुळेच शक्य होते अशी रयत शिक्षण संस्थेची धारणा आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here