Hair donation: कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी अनोखा प्रयोग !

    167
    Hair donation: कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी अनोखा प्रयोग !
    Hair donation: कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी अनोखा प्रयोग !
    • नमिता वारणकर 

    आपल्या केसांमुळे  एखाद्या व्यक्तिला तिचं सौंदर्य खुलवण्यासाठी मदत (Hair donation) झाली, तर ? असा विचार कधी केला आहे का?…हे शक्य आहे…हा प्रयोग समाजातील प्रत्येक व्यक्ती निश्चितच करण्याचा प्रयत्न करू शकते. केमोथेरपीनंतर केस पूर्ण गळतात. टक्कल पडते. शरीराची ही अवस्था स्त्री-पुरुष दोघांनाही अस्वस्थ करणारी… नैराश्य आणणारी असते. अशा वेळी या स्त्री-पुरुषांना ‘मानवी केस’देण्याची मदत आपण करू शकतो. याकरिता आपण आपले स्वत:चेच केस दान करू शकतो.

    कर्करोगावर केमोथेरपी हा महत्त्वाचा उपचार आहे. यादरम्यान सुरू केलेल्या औषधोपचारामुळे केस खूपच गळू लागतात. अशावेळी ‘नैसर्गिक केसांचे विग’ हा उत्तम पर्याय आहे. विग घालून समाजात वावरताना या रुग्णांचा आत्मविश्वास बळावतो. समाजात चारचौघात वावरताना अडचण येत नाही.ही मदत म्हणजे समाजऋण फेडण्याचाही मार्ग होऊ शकते. यासाठी मुंबई, केरळ येथे विविध संस्था कार्यरत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘Cope with Cancer-Madat’ही एक संस्था. दूरध्वनी किंवा ई-मेलद्वारेही संस्थेला संपर्क करता येऊ शकतो तसेच तुम्ही तुमचे केस व्यवस्थित कापून त्यांना रबर बॅण्ड लावून कुरियरद्वारेही ‘madat charitable trust – Madat’ला केस पाठवू शकता किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर ईमेल करू शकता.

    केसदानाची गरज का ?
    – सामाजिक संस्थांद्वारे केसदानाची गरज राबवून नैसर्गिक केसांचे विग तयार केले जातात. एका विगसाठी तीन ते चार व्यक्तिंनी केलेल्या केसांची गरज असते. विग तयार करताना केसांची निवड,रंग, केसांचा पोत या सगळ्या गोष्टींची तपासणी केली जाते.
    – काही महिला केमोथेरपी सुरू करण्याच्या आधी येतात. त्यांचे केस सलूनमधील कारागिरांच्या मदतीने कापले जातात. एका आठवड्यात त्यांना त्यांच्याच केसांचा विग बनवून दिला जातो. स्वत:च्या केसांचा विग असल्यामुळे एक वेगळा आत्मविश्वास बळावतो.
    – केमोथेरपीनंतर केस जाऊ शकतात याची माहिती आधीच रुग्णांना दिलेली असते. त्यामुळे काही रुग्ण केमोथेरपी चालू होण्याआधीच त्यांचे केस सलूनमध्ये देतात आणि विग बनवून घेतात.त्यामुळे त्यांना तो विग कृत्रिम दिसत नाही. अनेक महिला या सुविधेचा फायदा घेत आहेत.

    सिंथेटिक आणि नैसर्गिक विगची गुणवत्ता…
    सिंथेटिक विगपेक्षा स्वत:च्या किंवा नैसर्गिक केसांचा विग दिसायला चांगला दिसतो. कारण त्यामध्ये नैसर्गिकपणा असतो. सिंथेटिक विगची काही लोकांना अॅलर्जी असते. काहींना पुरळ उठू शकतात. अशावेळी नैसर्गिक केसांपासून तयार केलेला विग वापरणे सोयीचे जाते, अशी माहिती संस्थेच्या चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर उर्विजा संघवी यांनी दिली.

    ग्रामीण महिलांच्या समस्या…
    सांगली, सोलापूर, धुळे, जळगाव अशा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी एखाद्या मध्यमवयीन स्त्रिला कर्करोग झाला असेल आणि त्यात तिचे केस गेले, तर घरात काही वेळा लग्नकार्य इत्यादी सोहळ्यांच्या वेळी या महिलांना केसाअभावी चारचौघात अवघडल्यासारखं होतं. अशा महिलांना नैसर्गिक केसांपासून तयार केलेल्या विगची मदत होते. रुग्णाचा औषधोपचारांचा खर्च मोठ्या प्रमाणात झालेला असतो.मुख्य म्हणजे ग्रामीण भागातील महिलांचे उपचारही उशिरा सुरू होतात. त्या स्वत:साठी कुठलाही खर्च करायला तयार नसतात. शस्त्रक्रिया, औषधोपचारांचा खर्च त्यानंतर विगसाठी पैसे खर्च करायला या महिला तयार होत नाहीत. अशा महिलांना हे विग फारच उपयुक्त होतात.

    (हेही पहा – Namo Bharat Train : १० वर्षांत ट्रेनचा कायापालट करणार; नमो भारत जलद रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा )

    संस्थांचे कार्य ‘विनामूल्य’
    – केरळमध्ये या विषयावर कार्य करणाऱ्या संस्था आहेत. या संस्थेची शाखा चेंबूरमध्ये आहे. ‘गिफ्ट हेअर गिफ्ट कॉन्फिडन्स’हे या संस्थेचे घोषवाक्य आहे. या संस्थेमध्ये केस दान देणाऱ्या महिलांना मार्गदर्शन केले जाते.येथे लोकांनी दिलेल्या केसांपासून विग तयार केले जातात. बऱ्याचशा नैसर्गिक केस गोळा करणाऱ्या संस्था अॅपल सलूनमध्ये हे केस देतात.अॅपल सलूनमधून असे विग तयार करून दिले जातात. मानवी केसांपासून तयार केलेले हे विग मोफत दिले जातात.या संस्थांमध्ये पैसे अर्पण करण्यासाठी एक पेटी ठेवलेली असते.त्यामध्ये मोफत घेतलेल्या विगचे काही जणांना पैसे द्यावेसे वाटले, तर असे रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक त्यांच्या इच्छेने कितीही रुपये अर्पण करू शकतात.आश्चर्य म्हणजे अगदी ‘एक’ रुपयासुद्धा ! ज्या महिलेच्या केसाला जो विग साजेसा आहे, तो विग ती महिला विनामूल्य या संस्थेतून घेऊन जाऊ शकते.नैसर्गिक केस तयार करणाऱ्या संस्थांना समाजातील लोकं देणगी स्वरुपात मदत करतात किंवा काही कुटुंबेही देणगी देऊ शकतात.या मदतीच्या माध्यमातून नैसर्गिक विग तयार करण्याचा खर्च सहज निघतो. सामाजिक संस्था समाजातील कर्करोगामुळे केस गेलेल्या रुग्णांना ‘मानवी केसां’चे विग तयार करून देण्याची मदत करते, अशी माहिती सुवर्णा बेडेकर देतात.
    – परळ मधील टाटा मेमोरियल रुग्णालयातही याविषयी माहिती मिळू शकते. येथेही या संस्थांचे कार्यकर्ते जनजागृतीपर माहिती देतात.
    – माटुंगा येथील प्रशांती रुग्णालय येथेही याबाबत माहिती मिळू शकते.

    मोठी समस्या
    सध्याच्या धावपळीच्या युगात बऱ्याचशा महिलांचे केस लांबसडक नसतात. अनेक महिला तर केसांची काळजी घ्यायला वेळ नसतो म्हणूनही केस कापतात, याशिवाय आरोग्याच्या काही समस्या. यामुळे होणारी केसगळती, अशा विविध प्रकारच्या समस्यांमुळे समाजात बहुतांश महिलांचे केस छोटे असतात. महिलांसाठी केसांचे विग तयार करायला कमीत कमी १४ ते १५ इंच केस लागतात. विग तयार करायला. डोक्याचा घेर आणि खाली थोडासा बो बांधता येईल किंवा पिन लावता येईल. त्यामुळे या संस्थांना १६ इंच केस आवश्यक असतात, मात्र हल्ली एवढे सलग मोठे केस फारच कमी महिलांचे असतात तसेच ६ ते ८ इंच केसांचे विग पुरुषांना चालतात. पुरुषांचे विग वापरण्याचे प्रमाण महिलांपेक्षा कमी आहे. बरेचसे पुरुष विग वापरतातच असे नाही. ५० वर्षांच्या पुढे एखाद्या पुरुषाला कर्करोग झाला असेल, तर त्यांना टक्कल पडलं तरीही काही वाटत नाही. त्यामुळे हल्ली बहुसंख्य महिलांचे केस खांद्यापर्यंतच असल्यामुळे लांब केस विग तयार करण्यासाठी मिळत नाहीत. ही आज समाजातील मोठी समस्या आहे, अशी माहिती संस्थेच्या …यांनी दिली. त्यामुळे महिलांनी केस १५ ते १६ सेंटिमीटर तरी वाढून नंतर अशा विग तयार करणाऱ्या सेवाभावी संस्थांना दान करावेत.अॅपलमार्फत किंवा कोणाहीमार्फत ते देता येऊ शकतात.

    अॅपल सलून...
    अगदी छोट्या केसांचा विग असेल,तर त्या विगची किंमत १५ ते १८ हजार अशी असते.बरेचसे सलूनवाले ज्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी शाखा आहेत, असे लोकं मोठे केस घेतात. त्या केसांचे नैसर्गिक केसांचे विग नटनट्यांना लाखो रुपये देऊन विकतात.त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे विग लागतात. चित्रीकरणासाठी अशा विगची गरज असते. अॅपल सलूनकडून केस कापले, तर ते इंचानुसार पैसे कापण्याचे पैसे घेते. त्यापेक्षा कुठल्याही पार्लरमध्ये कापून थेटही पाठवता येतात.कुरियर किंवा स्पीड पोस्टने हे केस पाठवता येतात.पाठवताना ते सरळ करून त्याला रबर बँड लावायचं आणि ते झिप लॉकमध्ये ठेवायचे.त्यावर नाव,पत्ता,दूरध्वनी क्रमांक लिहून हे पाकिट कुरियर ईमेलही करू शकता.

    जनजागृती होण्याची गरज !
    – बहुतेक स्त्रिया फॅशन किंवा धार्मिक हेतूंसाठी केस कापतात.रीस्टाईल करतात. आपले निरोगी केस एका गरजू व्यक्तिला दान देण्यासाठी संस्थेकडून जनजागृती केली जाते. ज्यांना समाजासाठी काही करण्याची इच्छा आहे, असे लोक स्वत:हून आपले केस दान करतात.
    – हे केस कोणीही दान करू शकतात.
    – केस हा आपल्या लुकचा आणि आपण स्वतःला जगासमोर मांडण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. केमोथेरपीमुळे ते अचानक जातात. कर्करोगाच्या रुग्णांसाठी केस गळणे हे केमोथेरपी आणि रेडिएशन उपचारांच्या सर्वात तणावपूर्ण आणि वेदनादायक दुष्परिणामांपैकी एक आहे.अशा रुग्णांना केसगळतीमुळे शारीरिक आणि भावनिक त्रासाला सामारे जावे लागते. तुम्ही केलेल्या मदतीमुळे त्यांना निश्चित निराशेतून बाहेर येण्याचा मार्ग मिळू शकतो.

    विग घातल्याने केस गळतात का
    विग घातल्याने केमोथेरपीमुळे होणारे केस गळती लपविण्यास मदत होते,परंतु त्यामुळे केस गळणे टाळता येत नाही.केमोथेरपी पूर्ण झाल्यानंतर केस परत वाढू लागतात.आपला लूक किंवा चारचौघात वावरण्यासाठी ‘विग’ हा एक उपयुक्त पर्याय असू शकतो.नैसर्गिक केस किंवा उच्च-गुणवत्तेच्या सिंथेटिक तंतूपासून बनवलेले विग निवडणे महत्वाचे आहे. जे टाळूला हलके असतात आणि केसांना अधिक नुकसान करत नाहीत.

    अनुभव…
    बऱ्याच वर्षांपासून केस दान करायचं होतं,कारण माझे केस खूपच लांब होते. दरवर्षी वाढदिवसाच्या दिवशी मी एक सामाजिक काम करते. दरवर्षी समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याचा माझा प्रयत्न असतो. यावर्षी मला थायरॉइडचा त्रास सुरू झाला. त्यामुळे मला रक्तदान वगैरे करता येणार नाही. म्हणून यापेक्षा काहीतरी वेगळं करावं म्हणून हे सुचलं की, केस लांबही होते. म्हणून द्यावेसे वाटले. माझे एक नातेवाईक रुग्णालयात असताना मी त्यांना डबा द्यायला जायचे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, ज्या महिलांना कर्करोग झालाय. अशा महिलांची केमोथेरपी झाल्यानंतर त्यांना केसांच्या विगसाठी फार समस्या येते. कर्करोगावर औषधोपचार करत असताना आधीच अशा महिलांची रोगप्रतिकारक्षमता कमी झालेली असते. त्यामुळे त्यांना कृत्रिम विग वापरले तर ते अगदी कमी वेळासाठी लावले तरी त्यामुळे अॅलर्जी होऊ शकते. त्यांना केसांच्या खालील त्वचेला कृत्रिम विग सहनच होत नाहीत. याला पर्याय म्हणजे मानवी केसांपासून तयार केलेल विग वापरणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते. संस्थेला केस अर्पण केल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला प्रमाणपत्रही मिळते, अशी माहिती वाढदिवसानिमित्त कोप विथ कॅन्सर-मदत या संस्थेला केस दान देणाऱ्या सुवर्णा बेडेकर सांगतात.

    हेही पहा –

     

    Join Our WhatsApp Community

    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.