कशी स्थापन झाली पहिली भारतीय लोकसभा? वाचा…

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तब्बल ५ वर्षे देशाची घडी बसवण्यात घालवल्यावर भारतीय समाजव्यवस्थेला लोकसभा स्थापनेचे वेध लागले. सलग ४ महिने पहिली लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पडली, त्यानंतर १७ एप्रिल १९५२ रोजी भारताची पहिली लोकसभा स्थापन झाली. 

भारतीय लोकसभा ही आज ६९ वर्षांची झाली आहे. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर फाळणीमुळे निर्माण झालेला सामाजिक आणि राजकीय उद्रेक शमवणे, संस्थाने देशात सामावून घेणे, राज्यघटना बनवणे अशी सर्व दिव्ये पार पडल्यावर भारत देशाला आता संसदीय प्रणालीचे वेध लागले होते. स्वातंत्र्यानंतर तब्बल ५ वर्षांनी भारतात पहिली लोकसभा निवडणूक झाली. तब्बल ४ महिने ही निवडणूक प्रक्रिया सुरु होती. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू या पहिल्या पंतप्रधानांच्या रूपाने १७ एप्रिल १९५२ रोजी पहिली भारतीय लोकसभा स्थापन झाली.

अशी झाली पहिली लोकसभा निवडणूक! 

स्वातंत्र्यानंतर 1951-52 मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक झाली. स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने अवघ्या जगाचे खास करून ब्रिटिशांचे या निवडणुकीकडे लक्ष्य होते. कारण दुसऱ्या महायुद्धात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांना चांगलेच बेजार केले होते, ज्यामुळे ब्रिटिशांचे भारतावरील नियंत्रण सुटले आणि भारताला स्वातंत्र्य देणे ब्रिटिशांना भाग पडले होते. म्हणूनच अवघ्या जगाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्याचे दिव्य आव्हान तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांनी समर्थपणे पेलले.

(हेही वाचा : कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवा! पंतप्रधान मोदींचे आवाहन)

४ महिने सुरु होती लोकसभा निवडणूक!

ही निवडणूक तब्बल 68 टप्प्यांत पार पडली होती. त्यावेळी एकूण 53 पक्ष मैदानात होते. मतदानाबाबत जनतेत जागृती निर्माण करण्यापासून त्यांना मतदान प्रक्रिया समजवण्याचे आव्हान होते. मतदारांच्या आणि निरक्षरांच्या सोयीसाठी मतदान पत्रिका टाकण्यासाठी पक्षाचे चिन्ह असलेल्या लोखंडी पेट्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यासाठी दोन कोटींपेक्षा जास्त लोखंडी पेट्या बनवण्यात आल्या होत्या. तर सुमारे 62 कोटी बॅलेट पेपर छापण्यात आले होते. ही पहिली निवडणूक 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या चार महिन्यांच्या काळात घेण्यात आली.

अशी सुरु होती मतदान प्रक्रिया!

489 जागांची होती पहिली लोकसभा! 

लोकसभेच्या 489 जागांसाठी 401 मतदारसंघात निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी 86 मतदारसंघात दोन जणांची खासदार म्हणून निवड करण्यात आली. सर्वसामान्य वर्गातील एक आणि एससी, एसटी समुदायातील एक अशा दोन प्रतिनिधींची निवड करण्यात आली. उत्तर बंगाल या मतदारसंघातून तीन खासदारांची निवड करण्यात आली. त्यावेळी काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, भारतीय जनसंघ यासाह 53 पक्ष मैदानात उतरले होते. 36 कोटी लोकसंख्येमध्ये 17.3 कोटी मतदार होते. त्यातील 45.7 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

काँग्रेसला मिळाले बहुमत!

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला. 489 जागांपैकी 364 जागा काँग्रेसने जिंकल्या. बहुमतासाठी 245 जागांची गरज होती. सीपीआय हा 16 जागा मिळवून दुसऱ्या स्थानावर होता. तर 12 जागा मिळवणारी सोशलिस्ट पार्टी तिसऱ्या स्थानावर होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी 16 टक्के मते मिळवली होती. तब्बल ४ महिने निवडणूक प्रक्रिया राबवल्यानंतर १७ एप्रिल १९५२ रोजी पहिल्या भारतीय लोकसभेची स्थापना झाली. गणेश वासुदेव मालवणकर हे पहिले लोकसभा अध्यक्ष बनले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here