कोरोना महामारीने अनेक मानवनिर्मित नैसर्गिक प्रश्न उभे केले आहेत. हा विषाणू चीनने युद्ध-शत्र म्हणून वापरला असो किंवा वटवाघळीच्या द्वारे हा मानवी शरीरात प्रवेश केला असो, तो आज जगभर महामारीच्या रूपाने आपल्या समोर उभा आहे आणि आपण स्वत:ला बुद्धिमान, विज्ञानयोगी म्हणून म्हणविणारे त्याचा समोर हतबल झालो आहोत. नैसर्गिक साधन संपत्तीपेक्षा अधिक लोकसंख्या, सजीवाचे पालन पोषण करणाऱ्या जंगलांचा विनाश, मानवाला संरक्षण देणाऱ्या पशु-पक्षी, वन्यजीवाची हत्या, विनाषकारी प्रदूषण आणि स्वार्थी, अनैसर्गिक जीवन शैली ही सर्व कृत्ये अश्या महामारीला कारणीभूत आहेत.
…तर विकास, विज्ञान आणि बुद्धी वाचवू शकणार नाही!
ज्या निसर्गात आपला जन्म आणि विकास झाला त्यालाच नष्ट करून आपण केवळ मानवाच्याच प्रगतीचा विचार केला, त्याचे गंभीर परिणाम निसर्ग न कळणाऱ्या मानवाला भोगावे लागणारच होते. आजच सावध झालो नाही तर भविष्यातही ह्यापेक्षा महामारी आणि नैसर्गिक आपत्तीचे मोठे गंभीर परिणाम भोगावे लागेल, असे मी माझ्या ‘निसर्गाकडे परतू या’ ह्या पुस्तकात आधीच लिहिले आहे. मी माझ्या अनेक भाषणातून आणि लेखातून सतत सांगत होतो की, निसर्गाचा विनाश करून मानवाचा विकास होऊच शकत नाही. तथाकथित विकासाच्या नावाने जगाने जी निसर्गाची नासधूस केली त्यासाठी निसर्गाने मानवाविरुद्ध पुकारलेले हे एक कोरोना युध्द आहे, हे आज कळले नाही तर भविष्यात तुम्हाला तुमचा विकास, तुमचे विज्ञान आणि बुद्धी वाचवू शकत नाही. आज, आता आपल्याला गमवलेले निसर्ग वैभव त्वरित वापस आणावे लागेल. वने, पर्यावरण, पशु पक्षांचा, सजीवांचा सन्मान करावा लागेल, त्यांचे सोबत गुण्या-गोविंदाने राहावे लागेल तरच पुढील काळात आपण जगू अन्यथा आपणला विनाष अटळ आहे.
(हेही वाचा : लस पुरवठा करणा-या ‘त्या’ कंपन्या ठरल्या अपात्र)
अन्यथा अनेक महामारी आपल्या प्रतीक्षेत आहेत!
मित्रांनो, सजीव विकासाच्या सुरुवातीला सर्वच जीव हे एकपेशीय आणि विषाणूच होते. पुढे सुरक्षा आणि आहार मिळविण्यासाठी एकपेशीय जीवांनी बहुपेशीय रूप विकसित केले. आज ब्लू व्हेल, हत्ती आणि मानव ह्या सर्वांचे शरीर जरी मोठे झाले तरी सर्व प्राण्यांच्या जीवनाचे मूळ स्वरूप एकपेशीयच आहे, खर तर आपण सुद्धा एकपेशीय जीवच आहोत. सर्व जीव जगण्यासाठी आणि प्रजोत्पनासाठी धडपडत असतात. जीवाणूमध्ये बक्टेरिया, प्रोटोंझुआ, यीस्ट, अलजी आणि आर्किया ह्या एकपेशीय जीवाणूचा समावेश असून त्या स्वतंत्रपणे किंवा इतरांच्या शरीरात जगतात, प्रजनन करू शकतात. त्यांच्यामुळेही रोग होतात. परंतु काही जीवाणूंच्या अनेक प्रजाती आपल्या शरीरात जगून आपल्याला मदतही करतात. असे करोडो जीवाणू प्रत्येकांच्या शरीरात असताच. विषाणू (Viruses) मात्र वेगळे आहेत, येम्फ्लूएन्झा डेंगू, रोटावायरस, सार्स कोविड, मर्स, चिकनगुनिया, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, इबोला, झिका, एचआयव्ही, मार्बर्ग, हन्ता, रेब्बीस, स्मालपोक्स हे धोकादायक विषाणू आपण अनुभवले आहेत. ते प्रोटीनने वेढलेले जनुकीय पदार्थ असतात. त्यांना प्रजनन आणि विकास करण्यासाठी इतर जीवांच्या पेशी किंवा शरीराची आवश्यकता असते, म्हणूनच विषाणू जगण्यासाठी मानव, प्राणी, पशु, पक्षी इ. सजीवांच्या शोधात असतात. ते गरजेप्रमाणे सतत स्वत:त बदल करून टिकाव धरण्याचा प्रयत्न करीत असतात, ही खऱ्या अर्थाने सूक्ष्म जीवांची लढाई असून जो जिंकला तो टिकला हा निसर्गाचा नियम आहे. (survival of the fittest). म्हणूनच जोपर्यंत आपले शरीरात रोग प्रतिकारक शक्ती (Immunity) नाही तोपर्यंत आपण विषाणूंना हरवू शकत नाही. ह्याचमुळे इम्मुनिटीमुळे नैसर्गिक जीवन जगणार्या जंगलातील प्राण्यांना फारसे रोग होत नाही. बुद्धी आणि विज्ञानासोबत सशक्त शरीर सुद्धा आवश्यक आहे, हे आता कोरोनामुळे आपल्याला कळले पाहिजे. निसर्ग किती महत्वाचा आहे हे आपल्याला कायमचे कळले तर ठीक अन्यथा अनेक महामारी आपल्या प्रतीक्षेत आहेतच.
जंगलतोड थांबवा!
जंगल, वृक्ष हेच सर्व जीवनाचा आधार आहे. ज्याप्रमाणे वृक्ष आपल्याला प्राणवायू देतात त्याचप्रमाणे ते सजीवांना अन्न आणि आसरा देतात. तापमान कमी करून पिण्याच्या पाण्याची सोय करतात, आपल्याला धूळ, सूक्ष्मजीव आणि विषाणूपासून संरक्षण देतात. जसजसे जंगल कमी व्हायला लागले, तसतसे आपले नैसर्गिक संरक्षण कवच संपत गेले. आज जगभर होत चाललेली जंगलतोड/वृक्षतोड पाहता आज आपले संरक्षण कवच राहिले नाही आणि जमीन, पाणी आणि हवेतील व्हायरस आपल्याला संसर्ग करू लागले.
विषांणूचा वाहक पशु-पक्षांचा ऱ्हास होतोय!
पक्षांना त्यांचे-त्यांचे रोग होतात, प्रत्येक तापमानाला विविध व्हायरस प्रजाती संसर्ग करीत असतात, परंतु जंगल नष्ट होऊ लागल्याने आता विषांणूचे वाहक पशु-पक्षी अधिवासा अभावी ऱ्हास होत चालले आहेत, त्यांची संख्या कमी होत चालली आणि आणि त्यांचे रोग मानवाला व्हायला लागले. स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू, कोरोना इत्यादी अनेक रोगजंतू हे जंगल/वृक्ष कमी होत गेल्याने मानवाला संसर्ग करीत आहेत. कोरोना विषाणू हा वटवाघळींना होतो, परंतु त्यांची संख्या कमी होत चालल्याने तो आता माणसात संसर्ग करू लागला आहे. म्हणूनच आता मानवाला जंगल, वृक्षांचे आणि वन्यजीवांचे महत्व ध्यानात घेतले पाहिजे. जर ह्याच गतीने आपण मानवाच्या तथाकथित विकासामुळे चुका करीत राहिलो, तर मानवाचाच विनाश होणार हे नक्की.
(हेही वाचा : ‘त्या’ झाडांना पुनर्जीवित करण्यासाठी अधिकाऱ्याने राबवली अनोखी संकल्पना)
म्हणून सार्स, पोलिओ, इबोला, कोविड सारखे रोग होऊ लागले!
सजीवांच्या निर्मितीनंतर वृक्ष आणि प्राणी असे दोन प्रमुख गट पडले, त्यानंतर प्राण्यांत आहाराच्या दृष्टीने शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रमुख गट तयार झाले. सूक्ष्मजीवांच्या बाबतीत सुद्धा अनेक प्रजाती तयार झाल्या. पुढे आहार, सुरक्षा आणि प्रजननासाठी प्रचंड स्पर्धा सुरु झाली. ह्या स्पर्धेतूनच एक नियंत्रित अशी जीवसृष्टी तयार झाली. वृक्ष आणि शाकाहारी प्राणी ह्यांची एकमेकांवर अवलंबिता वाढली, अन्न साखळी तयार झाली, त्यातूनच सहजीवन सुरु झाले. प्राण्यांनी वृक्षावर जगायचे आणि पशु, पक्षी, प्राण्यांनी वृक्षांची बीजे दूरवर लावायची, असा हा जनुकीय लिखीत जणू कराराच आहे. ह्या सजीवांच्या स्पर्धेत अनेक सूक्ष्मजीव शरीर धारण करू शकले नाहीत. ते आजही एकपेशीय सजीवच आहेत. परंतु त्यांना जगण्यासाठी आणि प्रजननासाठी बहुपेशीय जीवांची गरज भासू लागली. हजारो बेक्टेरीया आणि व्हायरसच्या प्रजाती पशु, पक्षी आणि इतर प्रजातीत शिरून त्यांच्या शरीरात आहार आणि प्रजानन करू लागली. ह्यातूनच आपणास रोग होऊ लागले. खर तर आजही सर्व एकपेशीय आणि बहुपेशीय सजीव हे मुळात सूक्ष्मजीवच आहेत आणि महामारी ही त्यांच्यातील जगण्याची स्पर्धा आहे. मांसाहारी प्राणी इतर शाकाहारी प्राण्यांना मारूनच जगतात, तसे व्हायरस आणि बेक्टेरीयासुद्धा मानव आणि प्राण्यावर जगतात. परंतु अनेक सूक्ष्मजीव मात्र आपल्याशी सहजीवन साधून मदत करतात तर अनेक मारक ठरतात. लाखो-करोडो वर्षांच्या विकास क्रमात निसर्गात एक सुनियंत्रित व्यवस्था तयार झाली, परंतु पृथ्वीवर मानवाच्या आगमनानंतर ही व्यवस्था हळूहळू डळमळू लागली. विशेषत: मानव कृषी, उद्योग आणि विज्ञान क्षेत्रात विकास करू लागला आणि निसर्गाचे संतुलन बिघडू लागले. जंगले, वृक्ष नष्ट करून विकासाच्या नावाने आपण आपलाच विनाश करू लागलो हे आपल्याला कळलेच नाही. आमच्यासारख्या पर्यावरण क्षेत्रात कार्य आणि अभ्यास करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि वैज्ञानिकांनी पर्यावरणाचा ऱ्हास केल्यास गंभीर परिणाम होतील हे सतत सांगितले. परंतु वाढत्या लोकसंख्येच्या गरजा, राजकीय असमर्थतता आणि उद्योजगांचा स्वार्थ ह्यामुळे वने आणि वन्यजीव ऱ्हास पावत चालले. गाव-शहरातील पशु-पक्षी कमी झाले. त्यामुळे जे व्हायरस ह्या प्राण्यांच्या शरीरात वाढत होते त्यांना आता होस्ट (प्राणी-पक्षी) राहिले नाहीत आणि म्हणून त्यांनी मानवाला आपली शिकार करणे सुरु केले, ह्यातूनच सार्स, पोलिओ, इबोला, कोविड इ. सारखे रोग होऊन गेले, वन्य जीव ऱ्हास झाल्याने पशु-पक्षांचे रोग मानवाला होऊ लागले. आजचा कोरोना विषाणू हा त्यातीलच असून भविष्यात आपल्या पुढे कोणता विषाणू-जीवाणू येईल सांगता येत नाही.
(हेही वाचा :उन्मळून पडलेल्या झाडांचा असाही केला नगरसेवकाने उपयोग)
…तर महामारीच्या रूपाने, नैसर्गिक आपत्तीने लोकसंख्या कमी होईल!
कोरोनासारख्या विषाणूची साथ आणि महामारी हे वाढत्या मानवी लोकसंख्येचे कारण आहे. निसर्ग हा सजीवांच्या वाढत्या संख्येला शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांच्या माध्यमाने नियंत्रित करीत असतो. जंगलात हाच नियम कार्य करीत असतो, परंतु मानवाच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे आपण इतर सशक्त प्राण्याच्या पेक्षा वरचढ झालो. शेती, उद्योग आणि स्वत:च्या विकासाचाच विचार करून आपण प्राण्याचे जंगल तोडून मानवाची विकास कामे केली. मानवाला आता नैसर्गिक शत्रू राहिला नसल्यामुळे आपली सख्या अनियंत्रितपणे वाढली, त्यांना जगण्यासाठी आपण वने, वन्यजीव आणि नैसर्गिक संसाधनांना नष्ट करू लागलो, सजीवांचा व्यापार करू लागलो, त्यांचा आहार म्हणून वापर करू लागलो, क्वचित मांसाहारामुळेही काही विषाणू मानवाच्या शरीरात प्रवेश करतो आणि संसर्गजन्य रोग होतात. ह्यातून वन आणि वन्यजीवांचे प्रमाण अत्याधिक कमी होऊन मानवाची संख्या झपाट्याने वाढू लागली. कुठल्याही एका प्रजातीची संख्या वाढणे हे निसर्गाला अपेक्षित नसते. जर वाढली तर निसर्ग त्या संख्येला विविध प्रकाराने आळा घालतो, महामारीच्या रूपाने, नैसर्गिक आपत्तीच्या रूपाने मग ही वाढती संख्या कमी होते. आपण शेती करताना मिश्र शेतीचे प्रयोग करीत होतो, ह्याचे कारण हेच होते. एकाच प्रकारचे पिक घेतले, तर त्या पिकावर आलेला रोग सर्व शेतावर येवून पिके नष्ट व्हायची. आता आपण जणू फार बुद्धिमान झालो समजून सामूहिक शेती आणि एकाच प्रजातीची पिके घेत आहोत, त्यामुळे रोग जास्त येतो, रोग येतो म्हणून कीटकनाशके फवारू लागलो. ह्यातून प्रदूषण आणि आरोग्याच्या समस्या उभ्या ठाकल्या. हे अनैसर्गिक दृष्ट चक्र आजही असेच आज सुरु आहे. आपण निसर्गाची चिरंतन, टिकावू व्यवस्था बदलून विनाशी मानवी व्यवस्था आणली. हीच बाब मानवी लोकसंख्येला लागू होते. एकाच प्रजातीची संख्या वाढली, तर एकच रोग सर्वांना होतो आणि देशभर, जगभर पसरतो. इतर पशु-पक्षी आणि वन्यजीव जास्त प्रमाणात असते, तर विषाणू जन्य रोग त्या पक्षी- प्राण्यांना लागले असते आणि आपण बचावलो असतो. परंतु त्यांचे रोग एकदा एका माणसाला लागले कि ते सहज कोरोनासारखे जगभर पसरतात. आता आपण युद्ध पातळीवर लोकसंख्या कमी केली नाही तर अश्या अनेक महामारी येतच राहतील.
महामारी थांबवायच्या असतील तर प्रदूषण थांबवावे लागेल!
अगदी अल्प नैसर्गिक घटना सोडता प्रदूषण ही मानवनिर्मित समस्या आहे. जसजसे प्रदूषण वाढत आहे, तसतसे आरोग्याच्या समस्या वाढत आहे. प्रदूषणामुळे पाण्यात आणि हवेत जीवाणू आणि विषाणूंची संख्या प्रचंड वाढते. ह्यातून रोगराई आणि महामारी पसरते हे सर्वश्रुत आहेच. हवा प्रदूषण, हरित वायू आणि हरित गृह परिणामामुळे तापमान वाढते. ह्या बदलत्या तापमानामुळे विषाणूंना वाढण्यासाठी आणि जनुकीय बदल करण्याची संधी मिळते. ह्यातून महामारी पसरण्याचा धोका संभवतो. म्हणून भविष्यात अश्या प्रकारच्या महामारी थांबवायच्या असतील तर जमीन, हवा, पाणी प्रदूषण थांबवावे लागेल.
(हेही वाचा: ‘तो’ इंडियन व्हेरिएंट नाहीच… काय आहे WHOचे म्हणणे? )
भविष्यात जगायचे असेल तर शारीरिक क्षमता वाढवा!
मानव आणि सजीवांचा जन्म आणि विकास जंगलात झाला आहे. तेच आपले नैसर्गिक आहार, विहार आणि संरक्षणाचे साधन आहे. आजही बहुतेक सजीव तिथेच वास करतात. परंतु मानव मात्र स्वत:ला वेगळा जीव समजून मोठमोठी अनैसर्गिक शहरे बांधू लागला, स्वत:च्या शारीरिक क्षमता विकसित करण्याऐवजी यांत्रिक क्षमता वाढवू लागला. बाकी सजीव मात्र शारीरिक क्षमतेमुळे निसर्गात टिकू शकले, मानव मात्र ह्यामुळे रोगजंतूशी आणि महामारीशी सामना करण्यात अपयशी ठरला. धावण्यासाठी वाहने, थंडी-उष्णतेपासून बचावासाठी हिटर-एसी, पावसापासून दूर राहण्यासाठी सिमेंटची घरे, खाण्यासाठी कच्ची पाले भाजीऐवजी तळलेले, शिजविलेले पदार्थ, आजारापासून बचावासाठी औषधे अश्या सर्वच अनैसर्गिक जीवनामुळे मानव अन्न, वस्त्र, निवारा ह्यात पुरता शरीरबाह्य यंत्रणेवर अवलंबून राहिला. आज आपण ज्याला आधुनिक आणि विलासी जीवन म्हणतो खर तर ते अनैसर्गिक, खोटे आणि आभासी जीवन आहे. मानव जातीला पृथ्वीवर हजारो वर्षे जगायचे असेल तर आतापर्यंत आपण हे जे करीत आलो आहोत ते आता बदलावे लागेल. आपण जंगलात जावून राहणे शक्य नसले तरी शहरात वृक्ष वल्ली, पशु-पक्षी मात्र नक्कीच वापस आणू शकतो. पुढे भविष्यात जगायचे असेल तर आपल्या शारीरिक क्षमता वाढविल्या पाहिजे.
काय उपाय-योजना केल्या पाहिजे!
आज आपण तथाकथित आधुनिक विज्ञानयुगात आहोत आणि निसर्गाच्या दूर चाललो आहोत. सत्य हे आहे की निसर्गाच्या संरक्षणातच आपले रक्षण आहे. आज जगाला सर्वात मोठा धोका हा लोकसंख्येचा आहे. हीच लोकसंख्या सर्व नैसर्गिक साधन संपत्तीचा नाश करीत आहे. म्हणूनच नैसर्गिक साधन-संपतीचे जतन केले पाहिजे. आपल्याला प्राणवायु, पाणी, अन्न अश्या ज्या अत्यावश्यक गरजा आहेत त्या आपण प्रदूषित करून त्याचा व्यवसाय करू लागलो. हे थांबवून स्वच्छ हवा, निर्मळ पाणी आणि शुद्ध प्राणवायू मिळाला पाहिजे. जीवनाला आवश्यक असलेले जंगल, पशु-पक्षी ह्यांचे संरक्षण आणि संख्यावाढ प्राधान्याने व्हायला पाहिजे. शहरात सर्वत्र वृक्ष लागवड करणे, हवा-पाणी प्रदूषण कमी करणे, आपले विलासी, जीवन कमी करून निसर्ग पूरक जीवनमान जगायला पाहिजे. रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आहारात जास्त प्रमाणात फळे-पाले भाज्या आणि अत्यल्प मांसाहार केला पाहिजे. आज आपण वनात राहू शकत नाही, तर परिसर वन्यजन्य परिस्थिती मात्र नक्कीच निर्माण करू शकतो. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण हा बदल करण्याचा निर्धार केला पाहिजे.
(हेही वाचा: दहावीच्या निकालाबाबत शिक्षकांमध्येच संभ्रम! निकाल अंदाजे लावणार? )
Join Our WhatsApp Community