जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा…हरे राम, हरे कृष्णाच्या नामघोषाने पुण्याचा परिसर दुमदुमून गेला. महाराष्ट्रासह तामिळनाडू, कर्नाटक, बंगाल आणि ओरिसा प्रांतातील पारपंरिक वाद्याच्या गजरात आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनातमृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय येथून आयोजित जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव सोहळा थाटात साजरा झाला.
ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथे रथयात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव साजरा होत आहे. यंदाचे ८ वे वर्ष आहे. खासदार मेधा कुलकर्णी, महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य राजेश पांडे, इस्कॉन संस्थेचे संन्यासी प.पू. कृष्णचैतन्य स्वामी, प्रबोधानंद स्वामी आणि इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू यांच्या हस्ते स.प. महाविद्यालयाच्या प्रांगणात आरती करून रथयात्रेला सुरुवात झाली.
(हेही वाचा – विशाळगड अतिक्रमणावरून Sambhaji Raje आक्रमक: १३ जुलैला शिवभक्तांसह गडावर जाणार)
भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांच्या मूर्ती विराजमान असलेल्या रथाची उंची २० फूट इतकी असून फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी रथावर सजावट करण्यात आली होती.
५६ भोगांचा नैवेद्य…
इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, उपाध्यक्ष संजय भोसले, प्रवक्ते जनार्दन चितोडे, रथयात्रा समन्वयक अनंतगोप प्रभू, वरिष्ठ भक्त जयदेव प्रभू, जान्हवा माता यांसह अनेक साधू, ब्रह्मचारी, भक्त वृंद आदींच्या उपस्थितीत रथयात्रा पार पडली. स.प. महाविद्यालय येथे रथयात्रेचा समारोप झाला. रंगावली, पुष्पवृष्टीसह फटाक्यांची आतिषबाजी यात्रेमध्ये देखील करण्यात आली. रथयात्रा समारोपानंतर भगवंतांना ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करून आरती देखील झाली. जवळपास २० हजार भाविकांना प्रसाद वाटप महाविद्यालयाच्या प्रांगणात रथयात्रेच्या सुरुवातीला आणि समारोपानंतर झाले. तर, रथयात्रा मार्गावर १ लाख प्रसादाची पाकिटे वाटण्यात आली.
भगवान जगन्नाथाची कृपा जगभर पसरवण्यासाठी
भगवान जगन्नाथ, भगवान बलराम आणि सुभद्रा लोकांना दर्शन, आशीर्वाद आणि कृपा देण्यासाठी रस्त्यावर येतात. जगन्नाथ पुरी येथे शतकानुशतके ही रथयात्रा काढली जाते. हा सोहळा साजरा करण्यासाठी जगन्नाथ पुरी येथे लाखो लोक जमतात. परंतु जगन्नाथ पुरी येथे प्रत्येकजण वैयक्तिकरित्या जाऊ शकत नाही. त्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथाची कृपा जगभर पसरवण्यासाठी रथयात्रा सुरू केली.
हेही पहा-