कंगना एकटीच नाही! ट्विटरची कारवाई हेतुपुरस्सर? 

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री स्वरा भास्कर, सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉ, विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार असे अनेकजण सध्या घटनात्मक पदावरील व्यक्तींची अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन निंदा करतात. त्यावेळी ट्विटरला त्यांच्या ट्विटमधील एखाद्या व्यक्तीबद्दल  द्वेष निर्माण करणारी आणि अश्लील तसेच दर्जाहीन भाषा दिसत नाही का? 

हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि सामाजिक, राजकीय विषयावर कुणाचीही भीडभाड न बाळगता थेट मतप्रदर्शन करणारी कंगना राणावत ही पुन्हा एकदा चर्चेला आली. यावेळीही ती तिच्या बेधडक मत मांडण्याच्या स्वभावामुळेच चर्चेत आली. पश्चिम बंगालमधील विधानसभेचे निकाल घोषित झाल्यावर अनपेक्षितपणे राज्यभर भाजपचे नेते आणि त्यांची समर्थक यांना लक्ष्य करण्यात आले, जाळपोळ सुरु झाली, बलात्कार, विनयभंग, लूटमार होऊ लागली. निवडणुकीतील विजयी तृणमूलचे कार्यकर्ते हे सर्व करत होते, हे स्पष्ट दिसत होते. या दंगलीमध्ये ११ जणांचा बळी गेला. त्याविरोधात देशभर संताप व्यक्त होत होता. फेसबुक, ट्विटरवर अनेक जण अत्यंत कडक शब्दांत संताप व्यक्त करत होते, मात्र या सर्वात ट्विटरला केवळ कंगनाच दिसली. अगदी डुक धरून संधी साधून कारवाई करावी, अशा प्रकारे कंगनाने पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर भाष्य करावे आणि लागलीच तिचे ट्विटर अकाउंट बंद करावे, असा काहीसा प्रकार कंगनाच्या बाबतीत घडला.

काय म्हटले कंगनाने? 

हे अत्यंत भयानक आहे. आपल्याला आता हे गुंडाई संपवायला सुपर गुंडाईची गरज आहे. ती मुक्त राक्षस वाटते आहे. त्यासाठी मोदीजी २००० सालचे तुमचे विराट रुप दाखवा!

काय कारण दिले ट्विटरने?  

एखाद्याला दुखापत करण्यासंदर्भातील वक्तव्य करणे, द्वेष निर्माण करणारी आणि अश्लील तसेच दर्जाहीन भाषा वापरुन टीका करणे हे ट्विटरच्या पॉलिसीनुसार चुकीचे आहे. अशाच काही नियमांचे कंगनाने उल्लंघन केल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले.

ट्विटर कधी करते कारवाई? 

जेव्हा एखाद्या व्यक्तीचे वारंवार ट्विटरच्या धोरणाला छेद देणारे ट्विट कुणी करत असेल आणि त्याला अनेक जण ‘वाईट’ म्हणून रिपोर्ट करत असतील, तर ट्विटर आधी त्याला समज देते, त्यानंतर त्याचे अकाउंट तात्पुरते किंवा कायमचे बंद करते.

(हेही वाचा : कंगनाची आता ‘koo’वर टिवटिव! स्वदेशी अ‍ॅपकडून स्वागत!)

कंगना एकटीच आहे का? 

पायल रोहतगी – कंगनाप्रमाणे बेधडकपणे मतप्रदर्शित करणारी हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री पायल रोहतगी हिचेही ट्विटर अकाउंट ट्विटरने बंद केले.

जागृती शुक्ला – टीव्ही अँकर आणि ज्येष्ठ पत्रकार जागृती शुक्ला हीदेखील राष्ट्रविरोधी कृत्यांचा कडक भाषेत समाचार घेत होती, तिचेही ट्विटरने नोव्हेंबर २०१८मध्ये अकाउंट बंद केले.

फ्रांसुआ गोतिए  – मूळचे फ्रांस नागरिक असलेले आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, भारतीय इतिहास अभ्यासक फ्रांसुआ गोतिए यांनीब्रिटिशांच्या वसाहतवाद या अमानवीय यंत्रणेवर आसूड उगारणारे पुस्तक ‘एॅन एन्टायरली न्यू हिस्ट्री ऑफ इंडिया’ (भारताचा एकदम नव्या पद्धतीने लिहिलेला इतिहास) हे पुस्तक लिहिले. त्यासंबंधी ट्विट केल्यानंतर त्यांचे अकाउंट बंद केले.

ट्विटरचा असाही दिखाऊपणा! 

मागील वर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या नावाखाली खलिस्तानी दहशतवाद्यांनी लाल किल्ल्यावर कब्जा केला, पोलिसांवर तलवारीने हल्ले केले, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. या हिंसेची टूलकिट ज्या ट्विटर अकाऊंटवरून फिरली, त्या तथाकथित पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, दिशा रवी यांचे अकाउंट बंद केले नाही. यात ट्विटरला हिंसेला प्रवृत्त करणारे आढळून आले नाही. अखेरीस भारत सरकारला सांगावे लागल्यावर ट्विटरने ५०० अकाउंट बंद केले, त्यामध्येही या दोघींचे अकाउंट नव्हते, त्यानंतर १ फेब्रुवारी २०२१ रोजी ट्विटरने यातील २५० अकाउंट पुन्हा सुरु केली. हा ट्विटरचा दिखाऊपणा नाही का?

ट्विटरकडून यांना संरक्षण आहे का?

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री स्वरा भास्कर, सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉ, विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार असे अनेकजण सध्या ट्विटरवर विशिष्ट विचारधारेला धरून कायम वैचारिक प्रदूषण निर्माण करतात आणि घटनात्मक पदावरील व्यक्तींची अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन निंदा करतात. त्यावेळी ट्विटरला त्यांच्या ट्विटमधील एखाद्या व्यक्तीबद्दल  द्वेष निर्माण करणारी आणि अश्लील तसेच दर्जाहीन भाषा दिसत नाही का, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

 

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here