केरळचा  ‘1 टक्का डोसिंग पॅटर्न’!

85

आपण भारतीय हे नेहमीच नवनवीन पॅटर्नसाठी आसुसलेलो असतो. कोरोना काळात सुद्धा असे अनेक पॅटर्न चर्चेत आले, जसे मुंबई पॅटर्न, नंदुरबार पॅटर्न वैगरे. पण एक दुर्लक्षित परंतु अत्यंत उपयुक्त पॅटर्नबद्दल चर्चा का झाली नाही? कशाशी संबंधित आहे हा पॅटर्न? तर तो कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण आणि त्यासंबंधी अन्य कारणांशी संबंधित आहे. लसीकरण संदर्भात अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. जसे लांब रांगा, 45+, 18+, पहिला डोस, दुसरा डोस, गर्दी, वशिलेबाजी इत्यादी. हे सर्व प्रश्न निर्माण होण्यामागील कारण एकच ते म्हणजे लसीची अनुपलब्धता आणि कदाचित अजून एक कारण असू शकेल ते म्हणजे लसीकरणाचे चुकीचे नियोजन…पण ह्यातील नियोजनाबाबतीत एक सुलभ पॅटर्न तयार झाला आहे तो म्हणजे ‘केरळ लसीकरण पॅटर्न’ (केरळ 1% डोसिंग पॅटर्न). ‘एक टक्का’ आपल्याकडील राजकारणात कदाचित मान्य नसलेले गणित असेल, ‘ते’ म्हणतील किमान 5-10 टक्के तरी असायला हवेत…पण इथे एक टक्का खूप उपयुक्त प्रमाण आहे.  हे समजणे गरजेचे आहे. उपहास बाजूला ठेऊन सकारात्मक बाबीकडे बघू या.

…तर लसीकरणातील १३० कोटी वाचतील! 

लसीच्या तुटवड्यावरून निव्वळ बोंबा न मारता आपल्याला आहे त्याच लसीच्या साठ्याचा कसा उपयोग करता येईल, याचे जिवंत उदाहरण केरळ वैद्यकीय यंत्रणा आणि खास उल्लेख म्हणजे तेथील नर्सेस. नर्सेस म्हणजे देवीचे रूप असे म्हणतात. स्वर्गाचे दरवाजे फक्त ह्या सेवेकरी देवींसाठी उघडे असतात असा एक समज आहे. नर्सिंग हा धंदा न करता केरळी भगिनींनी हा सेवेकरी पेशा स्वेच्छेने पत्करला आहे. निव्वळ भारतातच नव्हे, तर जगभर नर्सिंग दुनियेत केवळ केरळी भगिनींचा दबदबा आहे. अर्थात केरळी नर्सेससोबत इतर भागातील सुद्धा नर्सेस असतात, पण बहुमत आकडा केरळकडे आहे. कोरोना काळात सुद्धा रुग्ण सेवा करताना ह्याच भगिनी केवळ सेवाभाव हाच धर्म बाळगतात. त्यांचे सूक्ष्म पातळीवरचे नियोजन आणि रुग्णांशी गोड बोलणे, यामुळे रुग्णाने आजाराचे अर्धे युद्ध जिंकलेले असते. नर्सेस नावाच्या देवीचा अनुभव आयुष्यात प्रत्येकाने कधी ना कधी घेतलेलाच असेल. आता ह्याच भगिनींनी कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचताना प्रस्थापित बंध तोडून एक नवीन पॅटर्न उभा केला आहे. केरळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका ट्विटद्वारे म्हटले आहे की, केरळला मिळालेल्या 73 लाख 38 हजार 806 लसीच्या डोसमध्ये 74 लाख 26 हजार 164 लसीकरण झाले, म्हणजेच 87, 358 लसीकरण जास्त झाले. संख्येत 1 टक्क्याचा अधिकचा भार हलका केला आहे. जर हाच प्रयत्न भारतभर केला, तर 130 कोटी भारतीय लोकसंख्येत हेच प्रमाण 1.3 कोटी डोस पेक्षा जास्त आहे. जर प्रत्येक डोस मागे 100 रुपये इतका खर्च पकडला, तर 130 कोटी सहजपणे वाचतील.

(हेही वाचा : कोरोनासंबंधी आरोग्य सेवा आणि उद्घाटन नावाचा बाजार!)

कसे शक्य आहे ‘अधिक’चे लसीकरण?

एका लशीच्या बाटलीत म्हणजे वायलमध्ये अंदाजे 10 डोस असतात, असे म्हटले जाते. पण लिकेज म्हणजे गळतीचे प्रमाण पकडून अधिकचा डोसचे प्रमाण बाटलीत भरलेले असते. लसीकरण करताना ह्याच अधिकच्या ( buffer) लसीचे नियोजन करून एका वायलमध्ये 10 पेक्षा अधिक लसीकरण केले जाते. निव्वळ आकडेवारीत न जाता प्रत्यक्ष उपलब्ध साठ्यात युद्ध लढणारे हे आरोग्य सेवक महान आहेत. भारतात लस तुटवटा आहे, हे सर्वांना ज्ञात आहे. त्यातून थोड्या प्रमाणात का होईना लसीकरण संख्या वाढवण्याचा हा प्रकार कौतुकास्पद आहे. निसर्ग संपन्न आणि सर्वात जास्त साक्षर लोकसंख्या असलेल्या केरळ राज्याच्या ह्याच पराक्रमाची दखल भारत सरकारने घेतली पाहिजे. एका बाजूला काही ठराविक ठिकाणाहून लस अपव्यय होत असल्याची बातमी येत असताना केरळी लसीकरण प्रकार दिलासादायक आहे. प्रत्यक्ष करोडो रुपये वाचवणे कदाचित शक्य असेल किंवा नसेल पण एक जरी लसीकरण जास्त झाले, तर कोविडची कीड काढून टाकण्यास मदत होईल. लसीकरण गरजेचे आहे, कारण मनुष्यहानी होणे ही अप्रत्यक्षपणे देशाची आर्थिक तसेच अनेक पातळीवरील हानी आहे. लसीकरण झाल्यास कोविडने आजारी पडण्याचे प्रमाण खूप कमी होईल. म्हणजेच एका वायलमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढवून ह्या नर्स नावाच्या केरळी कळ्या सुगंधी फुले उमलवत आहेत. काळ काळा आहे, पण असे छोटेसे पांढरे ठिपके सुद्धा आशेचे किरण आहेत. ह्या आरोग्य सेविका/सेवक भारतीय रत्ने आहेत. या माणकांची अपेक्षा कधीही काहीही नसते, अशी रत्ने भारतरत्नासाठी लायक आहेत इतके महान आहेत!

केरळीय आरोग्य व्यवस्थेला सलाम!

माननीय केंद्र सरकार, केरळ कदाचित कम्युनिस्ट विचाराचे आहे, जे विचार राजकीय पटलावर तुम्हाला मान्य नसतील, पण केरळचे वैद्यकीय यंत्रणेचे सकारात्मक धोरणे स्वीकारण्यास काय हरकत आहे! कम्युनिस्ट विचारात म्हणजेच जीवन पद्धतीत सामाजिक, तसेच एकतेवर भर दिला आहे. त्याच तत्वावर आधारित ‘केरळ 1% डोसिंग पॅटर्न’ म्हणजे ‘मी किंवा एकाला’ या पद्धतीवर नव्हे तर ‘आम्ही आणि आमच्या रस्त्याकडे’ ( we and our way towards) धोरणावर आधारित आहे. हा रस्ता सकारात्मकतेकडे जातो. केरळीय आरोग्य व्यवस्थेला सलाम करीत केंद्राने हा पॅटर्न लगेच स्वीकारायला हवा. हा पॅटर्न सर्व भारतभर राबविल्यास होणारा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा विचारात घेतल्यास भारतीय जनता तुम्हाला दुवा देईल.

एक भारतीय म्हणून, केरळी आरोग्य सेवक/ सेविका तथा तिथल्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेला त्रिवार नमस्कार…

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.