कर्णमधुर गीतांनी मराठी रसिकांना गेल्या सहा दशकांहून अधिक काळ मोहिनी घालणारे ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे, लोकप्रिय संगीतकार यशवंत देव आणि आपल्या कविता-गाण्यांमधून जगण्यावर प्रेम करायला शिकवणारे ज्येष्ठ कवी-साहित्यिक मंगेश पाडगांवकर या त्रयींची अनेक गीतं म्हणजे ‘आनंदाचा ठेवा’च. या सुप्रसिद्ध कलाकारांनी अजरामर केलेला हा आनंदाचा ठेवा रसिकांसमोर उलगडण्यासाठी ‘एक आनंदगाणे’ या कार्यक्रमाचे सादरीकरण लवकरच होत आहे.
संगीतप्रेमींना श्रवणानंद…
ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे सुपुत्र अतुल अरुण दाते या कार्यक्रमात रसिकांशी संवाद साधतील. सुप्रसिद्ध निवेदिका दीपाली केळकर, गायक-संगीतकार मंदार आपटे, डॉ. जय आजगांवकर, गायिका अॅड. पल्लवी पारगांवकर, सारेगमप लिटिल चॅम्प विजेती गायिका सुगंधा दाते…अशा प्रतिभासंपन्न गायक-गायिकांनी गायलेल्या श्रवणीय अजरामर गाण्यांची भरगच्च सांगितिक पर्वणी ‘एक आनंदगाणे’या कार्यक्रमात संगीतप्रेमींना अनुभवता येईल.
विनामूल्य कार्यक्रमाचे आयोजन…
माणिक एन्टरटेन्मेंट निर्मित (Maanik Entertainment) आणि अतुल अरुण दाते प्रस्तुत पद्मभूषण कवीवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या ९५व्या जयंतीनिमित्त ‘एक आनंदगाणे’ पाडगांवकर-देव-खळे संगीत रजनी हा कार्यक्रम गुरुवारी, २५ एप्रिलला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर येथे विनामूल्य सादर होणार आहे. विनामूल्य प्रवेशिका कार्यक्रमाच्या दिवशी प्रयोगाच्या २ तास आधी उपलब्ध होतील.
कार्यक्रमाचे वेगळेपण…
कार्यक्रमाचे अनोखेपण सांगताना निर्माते अतुल अरुण दाते म्हणाले, ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव आणि श्रीनिवास खळे यांना ९८वर्षे पूर्ण होऊन दोघांनीही ९९व्या वर्षात पदार्पण केले आहे. या दोन्ही संगीतकारांव्यतिरिक्त ह्रदयनाथ मंगेशकर, अरुण पौडवाल आणि तरुण संगीतकार मंदार आपटे या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा आनंदही रसिकांना या कार्यक्रमात घेता येणार आहे.