ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा ‘अरुण दाते कला सन्मान’ पुरस्कार यावर्षी सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांना प्रदान करण्यात येणार आहे. माणिक निर्मित आणि अतुल अरुण दाते प्रस्तुत रामुभैय्या दाते स्मृति समितीतर्फे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते श्रीधर फडके यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
‘अरुण दाते कला सन्मान’ पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की आणि ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांना, तर दुसऱ्या वर्षी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आणि अनुराधा मराठे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. रविवार, ५ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क येथे ‘अरुण दाते कला सन्मान’ पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. (Maanik Entertainment)
रसिकांसाठी भव्य संगीत सोहळा…
या पुरस्कार सोहळ्यानिमित्त रसिकांसाठी सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गायक श्रीरंग भावे, गायिका पल्लवी पारगांवकर, गायिका वर्षा जोशी, गायक-संगीतकार मंदार आपटे या सोहळ्यात आपली कला सादर करणार आहेत. ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे सुपुत्र अतुल दाते यावेळी रसिकांशी संवाद साधतील. वेदश्री दवणे या भव्य संगीत सोहळ्याचं निवेदन करणार आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे.