फुटीरतेची बीजे रुजवणारी मदरसे बंद करावीत! कॅप्टन सिकंदर रिझवी यांचे परखड मत 

सध्या वीर सावरकर काळेपाणी मुक्ती शताब्दी व्याख्यानमाला सुरु आहे. कोरोना महामारीमुळे ही व्याख्यानमाला ऑनलाईन आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना कॅप्टन सिकंदर रिझवी यांनी त्यांची परखड मते मांडली. 

185

वहाबी विचाराच्या जनसमुदायाला  भारतात येऊन सुमारे दीडशे वर्षे झाली आहेत. त्यानंतर साधारण १९५० नंतरच्या सुमारास भारतातील मुसलमानांमध्ये या वहाबी विचारांचे मूळ धरू लागले. काँग्रेसनेच त्यांना परवानगी दिली होती. त्यामुळेच सारंगपूर येथे देवबंद सेमीनरी आणि लखनऊ नदवा येथे दुसरे केंद्र तयार केले गेले. भारतातील मुस्लीम त्यांच्या परंपरेमध्ये हिंदुत्वाला स्वीकारत आहेत, म्हणून त्यांना त्यापासून दूर करून त्यांनी स्वतःचे अस्तित्व राखावे, याकरता वहाबीवाद्यांचा आटापिटा सुरू झाला. त्यासाठी त्यांना सौदीमधून भरभक्कमपणे पाठिंबा मिळत होता. अशा वहाबी विचारांच्या मदरशांमधून अरबी आणि फारशीत शिक्षण दिले जाते. तिथे तालिबानी पद्धतीचे दिले जाणारे शिक्षण लहान मुलांच्या मनात एकप्रकारे फुटीरतेची बीजे रुजवत आहे,  ही बाब लक्षात घेता हे मदरसे बंद करायला हवेत, असे परखड मत ‘हिंदु राष्ट्र शक्ति संघटने’चे संस्थापक कॅप्टन सिकंदर रिझवी यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित वीर सावरकर काळेपाणी मुक्ती शताब्दीच्या निमित्ताने ऑनलाइन व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प गुंफतांना कॅप्टन सिकंदर रिझवी हे ‘वीर सावरकर का हिंदुत्त्व और निधर्मिता‘ या विषयावर बोलत होते.

मुस्लिमांना दिल्या जाणाऱ्या अल्पसंख्यांकांच्या सुविधा बंद करा! 

बंगालमध्ये मुगलीस्तान बनवण्याचा प्रयत्न होत आहे, हे सारे वहाबीवाद्यांचे कृत्य आहे. देशाच्या अन्य काही छोट्या छोट्या भागांमध्येही असे प्रकार होत आहेत. हे सारे रोखले पाहिजे, कारण यामागे देशाचे पुन्हा तुकडे करण्याचे कारस्थान आहे. यासाठी आता अशा लोकांना रोखण्याकरता धैर्याने सर्वांनी समोर आले पाहिजे. याकरता सरकारचीही इच्छाशक्ती हवी, तसेच अशा प्रकारचे शिक्षण देणाऱ्या मदरशांना बंद करायला हवे आणि त्यावर सरकारचे नियंत्रण आणायला हवे, असेही कॅप्टन रिझवी म्हणाले. भारतातील  मुस्लीम मुळात विद्रोही नाहीत, पण विरोध करता करता ते विद्रोही झाले आहेत. त्यामागेही त्यांना नीट शिक्षण मिळाले नसल्याचे दिसून येत आहे, असेही ते म्हणाले. मुसलमानांची लोकसंख्या वाढलेली आहे, त्यामुळे अल्पसंख्याक म्हणून त्यांना मिळणाऱ्या सुविधा बंद करायला हव्यात. जर अशा सुविधा द्यायचाच असतील, तर राज्यनिहाय लोकसंख्या विचारात घेऊन विविध राज्यांमध्ये असलेल्या अन्य अल्पसंख्याक समाजाला सुविधा मिळायला हव्यात. देशस्तरावर लोकसंख्येचा विचार करून अल्पसंख्याक म्हणून विचार केला जाऊ नये, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा : ३७० हटवले, तरी इस्लामीकरण सुरुच आहे! अंकुर शर्मांची धक्कादायक माहिती )

उर्दू भारतीय भाषा!

ऊर्दू भाषेबद्दल बोलताना ते म्हणाले कि, उर्दू ही मुळात भारतीय भाषाच आहे, ती केवळ मुसलमानांची भाषा नाही. ती भारतातच निर्माण झाली असून त्यात संस्कृत, हिंदी, फारसी शब्दही आहेत. पाकिस्तानने उर्दू ही त्यांची आणि मुसलमानांची भाषा आहे, असा अपप्रचार केला आहे. विद्यमान स्थितीचा विचार करता शिक्षणपद्धती बदलायला हवी. स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक यांच्या जीवनाची माहिती द्यायला हवी. मुस्लीम मुलांवर धर्माचा असणारा पगडा लक्षात घेता, हे सारे सुधारण्यासाठी पाठ्यक्रमही बदलायला हवा. मदरशांवरही सरकारचे नियंत्रण हवे, सरकारी पाठ्यक्रमच शिकवायला हवा. कुराण शिकवायला हवे, मात्र त्याबरोबर त्यातील वचनांचा योग्य अर्थही शिकवायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

…म्हणून मुसलमानांनी हिंदूंचे ऋणी असायला हवे!

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचले गेले पाहिजे, त्यासाठी नव्या पिढीने त्यांच्या साहित्याद्वारे त्यांचा अभ्यास करायला हवा. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्यायला हवे, अशी आमची मागणी आहे आणि आम्ही ती मागणी केंद्र सरकारकडे करूच, असेही त्यांनी सांगितले. वहाबी विचारांच्या मुसलमानांबाबत अतिशय परखडपणे व जोरदार टीका करताना रिझवी म्हणाले की, जेथे मोहम्मदाच्या मुलीला, जावयाला आणि कुटुंबीयांनाही त्यांनी निर्घृणपणे ठार केले. इमाम हुसेन यांची शहादत केली. हे मुसलमान कोण होते? त्यावेळी इमाम हुसेन यांच्या बाजूने हिंदू ब्राह्मण लढले होते. तेव्हा इमाम हुसेन आणि कुटुंबीयांनी भारतात यायचे असल्याचेही सांगितले होते. यामुळेच खरे तर मुसलमानांनी हिंदूंचे ऋणी असायला हवे, असेही कॅप्टन रिझवी म्हणाले. जे मोहम्मदाच्या वारसांना ठार करताना कसलाही विचार करीत नाहीत, असा हा वहाबीइझम बाळगणारे हिंदूंचा कसला विचार करणार?, असाही सवाल त्यांनी केला. मदरशांमधून मुसलमान मुलांना अरबी – फारशीतून विष भिनवणारे शिक्षण देण्यापेक्षा राष्ट्रवादाचे शिक्षण देण्याची गरज आहे, असेही कॅप्टन रिझवी म्हणाले.

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी प्रस्ताविक केले. तसेच स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी कॅप्टन रिझवी यांना प्रश्न विचारून व्याख्यानातील लज्जत अधिक वाढवली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.