लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
कविवर्य सुरेश भट यांच्या ह्या ओळी किती समर्पक आहेत. मराठी भाषेने अनेक दिग्गज साहित्यिक दिले आहेत. त्यातले शांत, संयमी, भावनिक व सांस्कृतिक जाणीव असलेले महान साहित्यिक म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर. आपण त्यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखतो. कुसुमाग्रजांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुण्यात झाला. (Marathi Bhasha Gaurav Din)
त्यांचे खरे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर. सुरुवातीच्या काळात त्यांनी त्यांच्या या नावाने काही कविता प्रसिद्ध केल्या, मात्र १९३० नंतर त्यांनी आपले नाव बदलून विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवले. पुढे ते ‘कुसुमाग्रज’ या नावाने काव्यलेखन करू लागले. पिंपळगाव येथे प्राथमिक शिक्षण आणि नाशिकच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण केशव रंगनाथ शिरवाडकर हे खूप मोठे समीक्षक होते आणि ते कुसुमाग्रजांचे लहान भाऊ होते.
२०१८ मध्ये केशव शिरवाडकरांचे निधन झाले. सुरुवातीला काळात कुसुमाग्रजांनी सामाजिक चळवळीतही सहभाग घेतला होता. १९३२ मध्ये वयाच्या विशीत त्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश द्यावा म्हणून केलेल्या सत्याग्रहात सहभाग नोंदवला होता. त्यांनी १९३६ मध्ये आलेल्या सती सुलोचना या चित्रपटासाठी पटकथादेखील लिहिली आहे आणि याच चित्रपटात त्यांनी लक्ष्मणाची भूमिका देखील साकारली होती. मात्र हा चित्रपट चालला नाही.
पुढे त्यांची साहित्यिक कारकीर्द आभाळाला जाऊन पोहोचली. त्यांनी अनेक काव्यसंग्रह, नाटके लिहिली. नटसम्राट हे नाटक आजही नाट्यवीरांच्या आणि नाट्यरसिकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. त्यांचा पहिला कविता संग्रह १९३३ रोजी प्रकाशित झाला आणि संग्रहाचे नाव होते, ‘जीवन लहरी’. त्यांनी पत्रकार म्हणूनही काम केले आहे. सुरुवातीला ‘नवा मनू’ या वर्तमानपत्रातून त्यांनी लिखाणास सुरुवात केली. तसेच साप्ताहिक प्रभात, दैनिक प्रभात, सारथी, धनुर्धारी अशा नियतकांलिकात त्यांनी लेखन केले आहे.
कुसुमाग्रजांनी जवळजवळ पाच दशके आपली साहित्यिक कारकीर्द गाजवली. त्यांनी १६ कविता, ३ कादंबऱ्या, ८ लघुकथा, ७ निबंध, १८ नाटके आणि ६ एकांकिका लिहिल्या. ‘विशाखा’ या संग्रहाने भारतीय चळवळीत उतरणार्या तरुणांना प्रेरणा दिली. विशाखा हा संग्रह म्हणजे भारतीय साहित्यातील उत्कृष्ट पुस्तक मानले जाते.
१९६४ मध्ये मडगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. नटसम्राट या नाट्य पुस्तकासाठी त्यांना १९७४ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९८७ मध्ये ज्ञानपीठ तर १९९१ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. कुसुमाग्रजांची महती एवढी थोर की २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा होऊ लागला.
आज मराठी राजभाषा गौरव दिन आहे, या दिनानिमित्त आपण मराठी भाषेच्या संवर्धनाची शपथ घेतली पाहिजे आणि आपल्या मुलांना मराठी माध्यमातूनच शिकवले पाहिजे. ही सुरुवात आहे. मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने झटले पाहिजे. अमृतातही पैजा जिंकणारी मराठी भाषा ही जगभरातील भाषेशी स्पर्धा करण्यास समर्थ आहे. जय महाराष्ट्र, जय माय मराठी…!
हेही पहा –
Join Our WhatsApp Community