म्युकरमायकोसिस: उपचार नको डोळेच काढा! असे म्हणतील गोरगरीब!  

सध्या महाराष्ट्रात १५०० म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची नोंद झाली आहे, पैकी ५०० बरे झाल्याचा दावा सरकारचा आहे. राजस्थानात १ हजार, तर मध्य प्रदेशमध्ये ८०० रुग्णांची नोंद झाली आहे.

149

म्युकरमायकोसिस या आजाराचे राज्यात दररोज २०० नवे रुग्ण सापडत आहेत, येत्या काळात ही रुग्ण संख्या वाढत जाणार आहे, तेव्हा सरकारी रुग्णालये अपुरी पडतील. त्यावेळी मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर सरकार उपचार देऊ शकणार नाही, परिणामी कोरोनाप्रमाणे खासगी रुग्णालयांतही म्युकरमायकोसिसवर उपचार सुरु होतील, मात्र उपचाराचा खर्च पाहूनच रुग्णांना ‘उपचार नको संसर्ग झालेले डोळेच काढा’, असे म्हणायची वेळ येईल. कारण यासाठी लागणाऱ्या एम्फोटेरिसिन-बी हे ७ हजार रुपयांना मिळणारे इंजेक्शन एका रुग्णाला ७० द्यावे लागतात, अशावेळी रुग्णाला नुसते इंजेक्शनसाठीच ४ लाख ९० हजार रुपये मोजावे लागतील. त्याचबरोबर अन्य खर्च धरून हा आजार तब्बल ६ ते साडे सहा लाखापर्यंत जाईल. हा इतका खर्च मध्यमवर्गीयांनाच परवडणार नाही, तर गरिबांना कुठून परवडणार? अशावेळी इतका खर्च करण्याऐवजी ‘डॉक्टर, डोळेच काढा’, असे ते म्हणतील. अशी वेळ यायची नसेल, तर कोरोनाच होऊ देऊ नका, हाच यावर उपाय नाही का?

म्युकरमायकोसिससाठी कोरोना ठरतोय मूळ कारण! 

सध्या भारतात एका मागोमाग एक नवनवीन रोग पसरत आहेत, तर काही जुनेच संसर्गजन्य रोग पुन्हा नव्याने हातपाय पसरू लागले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत याचा प्रत्यय येत आहे. आणि हे रोगही इतके भयानक आहेत कि कोरोनापेक्षा अधिक मृत्यू दर असलेले आणि उपचाराच्या दृष्टीनेही अधिक महागडे आहेत. त्यामुळे यात सर्वसामान्यांची अक्षरशः फरफट होत आहे. कोरोनाची दुसरी लाट काही अंशी नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसत असतानाच म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीजन्य रोगाचा फैलाव देशभर सुरु आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करतांना त्यांना मोठ्या प्रमाणात स्टिरॉईड आणि अँटिबायोटिक द्यावे लागत आहेत. यामुळे आधीच या अशा रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते, अशा नाजूक परिस्थितीत त्या रुग्णांना म्युकरमायकोसिस या संसर्गजन्य रोगाची लागण होत आहे. अशा रुग्णांना तातडीने उपचार करण्याची गरज असते. कारण नाकावाटे ही बुरशी प्रवेश करते आणि वेळेत उपचार मिळाले नाही, तर काही दिवसांत ती डोळे आणि नंतर मेंदूत प्रवेश करते, परिणामी मृत्यू अटळ आहे. यात अनेकांचे डोळे काढावे लागत आहेत.

(हेही वाचा :म्युकरमायकोसिसचा मुंबईत पहिला बळी!)

म्युकरमायकोसिसचा मृत्यू दर अधिक!   

या रोगाचा मृत्यू दर ५२ टक्के असल्याचे डॉक्टर सांगतात, पण हा मृत्यू दर ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे आणि त्यांना सहव्याधी आहेत, अशा रुग्णांना गृहीत धरून ठरवण्यात आला आहे. वास्तविक या रोगावरील औषधाचा असलेला तुटवडा, त्यामुळे उपचारात नाईलाजास्तव होत असलेला विलंब यामुळेही मृत्यू दर वाढत आहे. सध्या महाराष्ट्रात १५०० म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची नोंद झाली आहे, पैकी ५०० बरे झाल्याचा दावा सरकारचा आहे. राजस्थानात १ हजार, तर मध्य प्रदेशमध्ये ८०० रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात सध्या ९०० म्युकरमायकोसिसचे रुग्ण आहेत आणि केंद्र सरकारने ७५ हजार एम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचा साठा पाठवला आहे. ते संपेपर्यंत नवा साठा येईल, अशी अपेक्षा आहे. मात्र सरकारचे रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्याकडे प्राधान्य असणार आहे.
– डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग.

एम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनवर रेमडेसिवीरप्रमाणे केंद्राचे नियंत्रण  

महाराष्ट्राचा विचार करता ग्रामीण भागातील रुग्णसंख्या जास्त प्रमाणात असून त्यांच्यावर ठराविक सरकारी रुग्णालयांत उपचार होत आहेत. त्यामध्ये मुंबईतील केईएम, नायर, जे जे रुग्णालयात यावर उपचार होत आहेत. मागच्या आठवड्यात या रोगाचा पहिला मृत्यू केईएममध्ये झाला आहे. सध्या रोगावर एकमेव औषध आहे, ते म्हणजे एम्फोटेरिसिन-बी इंजेक्शन. कालपर्यंत या आजाराचे रुग्ण तेवढ्या संख्येने नव्हते, म्हणून या औषधाचे उत्पादनही मर्यादित स्वरूपात होत होते, परंतु मागच्या २ आठवड्यात अचानक रुग्ण संख्या वाढू लागली आणि या औषधाचा तुटवडा निर्माण झाला. या औषधाचाही रेमडेसिवीरप्रमाणे काळाबाजार होईल म्हणून सरकारने तातडीने त्याच्या विक्रीवर बंदी आणून आता याही औषधाचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट सरकारी रुग्णालयांना होत आहे. त्यामुळे बाजारात आता एम्फोटेरिसिन-बी इंजेक्शन उपलब्ध नाही. सध्या हे इंजेक्शन भारतात मोजक्याच ५ कंपन्या उत्पादन करत आहेत, त्यामध्ये भारत सिरम, सिप्ला आणि मायलोन या कंपन्या आहेत. आता केंद्र सरकारने आणखी ५ कंपन्यांना उत्पादन करण्याची परवानगी दिली आहे. हे औषध केवळ सरकारी रुग्णालयांमध्येच उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे खासगी रुग्णालयांत हे औषध मिळत नाही. त्यामुळे राज्यात या आजारावर कुठल्याही खासगी रुग्णालयात उपचार होत नाहीत.

(हेही वाचा : आता म्युकरमायकोसिसच्या औषधाचा काळाबाजार?)

या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे आहेत का? 

  • आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या म्हणण्यानुसार राज्यात दिवसाला २०० म्युकरमायकोसिसचे नवे रुग्ण सापडत आहेत. रुग्ण वाढीचा हा वेग पाहता रुग्ण संख्या अशीच वाढत गेली, तर सरकारी रुग्णालये अपुरे पडतील, त्यावेळी नव्या रुग्णांवर कुठे उपचार करणार?
  • हा आजार जडलेल्या प्रत्येक रुग्णाला किमान ६०-७० इंजेक्शन लागतात. एका  इंजेक्शनची कमाल ७ हजार रुपये किंमत आहे. इतक्या मोठ्या संख्येने जर एका रुग्णाला इंजेक्शन लागत असतील, तर त्याचा तेवढा पुरवठा कसा होणार?
  • आधीच या इंजेक्शनचा तुटवडा आहे, अशा वेळी त्याचे अल्पावधीत उत्पादन कसे होणार?
  • राज्याला आवश्यक आहेत तेवढे एम्फोटेरिसिन-बी इंजेक्शन मिळण्यास १० दिवस लागणार आहेत, असे स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. त्या दरम्यान अत्यवस्थ रुग्णांचे काय होणार?
  • राज्य सरकार सध्या या आजारावर म. ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करत आहे. मात्र रुग्णसंख्या वाढल्यास तेवढ्या संख्येने सरकार मोफत उपचार करणार आहे का?
  • हा रोग विम्यांतर्गत समावेश करण्यात आला आहे, मात्र जर खासगी रुग्णालयात यावर उपचार होणार नसतील, तर त्याचा उपयोग काय?

(हेही वाचा : म्युकरमायकोसिसचे दिवसाला २०० रुग्ण वाढतात! राजेश टोपे यांची माहिती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.