अग्निशमन दलातील असंतोषाची आग विझवण्याची गरज!

या व्हिडिओमागे आता राजकारणाचा वास येऊ लागला आहे. ज्या कामगार संघटनांना 'आपली डाळ शिजणार नाही', असे वाटते, अशांनी तर हा प्रकार केला नसेल ना?

प्रातिनिधीक छायाचित्र

मागील आठवड्यात प्रसारमाध्यमांमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी भर पावसात अग्निशमन दलाच्या जवानांची परेड घेतली. स्वत: छत्रीखाली राहून त्यांनी जवानांना भर पावसात भिजवून त्यांच्याकडून मानवंदना स्वीकारली.

खरं तर हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागे तसं काहीही कारण नव्हतं. अग्निशमन दलाच्या जवानांना ऊन, पाऊस, वारा यांचं काहीही सोयरसुतक नसतं. भर उन्हात, भर पावसात भिजत तर वादळी वाऱ्यातही हे जवान आपले कर्तव्य पार पाडत असतात. अनेकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. मग तो मनुष्य असो वा प्राणी किंवा पक्षी. जीविताचे रक्षण करणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य आहे. ते कर्तव्य करत असताना कशाचीही भिडभाड बाळगण्याची, किंवा घाबरुन पळून जाणारे हे जवान नसतात. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांच्या कामाची किर्ती सातासमुद्रापार पसरलेली आहे. हे तेच जवान आहेत, ज्यांनी २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांकडून बंदुकीच्या फैऱ्या, बॉम्बफेक होत असताना देखील तिथे लागलेली आग धिरोदात्तपणे लढत विझवली होती. त्यामुळे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिस, एनएसजी जवानांचा जेवढा मोठा हातभार होता, त्याहूनही अधिक मोठी आणि महत्वाची कामगिरी आमच्या मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी निभावली होती. पण ज्याप्रकारे हा व्हिडिओ व्हायरल झाला, तो ज्यांची बदनामी करण्यासाठी व्हायरल केला, त्याऐवजी तो मुंबई अग्निशमन दलाचीच अधिक बदनामी करुन गेला आहे.

अतिरिक्त आयुक्तांची बदनामी करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल

कोणत्याही गणवेशधारी जवान तथा अधिकाऱ्यांचा एक शिष्टाचार असतो. परेड करतानाही हा शिष्टाचार मोडणार नाही याची काळजी ते सतत घेत असतात. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनीही तीच काळजी घेतली. परेड सुरू झाल्यानंतरही ती मध्येच थांबवू नये, हा शिष्टाचार आहे. त्यामुळे ज्यावेळी अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे जेव्हा व्यासपीठावर पोहोचल्या, त्यावेळी जवानांनी त्यांना मानवंदना दिली. परंतु अश्विनी भिडे जेव्हा तिथे पोहोचल्या, तेव्हा पाऊस नव्हता. पण जेव्हा परेड सुरु झाली तेव्हा पावसाच्या जोरदार सरी आल्या. त्यामुळे पावसातही जवानांनी आपली परेड सुरुच ठेवली. कारण परेड मध्येच बंद करणे हे त्यांच्या शिष्टाचारात नव्हते. पण त्याचा विपर्यास काढून काही कामगार संघटनांनी तसेच विभागातील असंतोषी वृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी याचा व्हिडिओ व्हायरल करिन अतिरिक्त आयुक्तांनी स्वत: छत्रीखाली राहून जवानांना पावसात भिजवत कशाप्रकारे मानवंदना स्वीकारली, याची बदनामी करण्यास सुरुवात केली.

व्हिडिओतून चुकीचा संदेश बाहेर आला 

हा व्हिडिओ व्हायरल का झाला?, कुणी केला? हा महापालिकेच्या शोध कार्याचा भाग आहे. त्याचं खरं कारण आज ना उद्या समोर येईलच. अज्ञानातून हा व्हिडिओ बनवला गेला. खरंतर यातून वेगळा संदेश बाहेर गेला, तो म्हणजे जवानांना पावसात भिजत परेड द्यावी लागली याचा. जवानांना कधीही पावसाची पर्वा नसते. प्रसंगी पावसात भिजतच त्यांना काम करावे लागते. पावसात भिजणाऱ्या जवानांची एवढी काळजी करणारे लोक ते जवान जेव्हा आग विझवताना सतत भिजत असतात, पावसात एखादी दरड कोसळल्यानंतर चिखलात माखून त्याखाली गाडलेल्यांना बाहेर काढतात, इमारत दुघर्टना असो रस्त्यांवर पडलेले झाड असो, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेल्यांना बाहेर काढताना अंगावरील कपडे आगीतील राखेने काळवंडलेले आणि भिजलेले असताना त्यांचे व्हिडिओ बनवून आपल्या संवेदना का व्यक्त करत नाहीत? शेवटी जवानांच्या कर्तव्याचा तो भाग होता. मुळात जेव्हा ते पावसात परेड करत होते, त्यावेळी एकाही जवानांच्या मनाला हा प्रश्न भिडला नाही की, मॅडम स्वत: छत्रीत आहेत आणि आम्हाला पावसात भिजवून मानवंदना स्वीकारत आहेत. मुळात आम्ही जवान आहोत, कितीही मुसळधार पाऊस आला किंवा अशी संकटं आली तरी आम्ही खचून जाणारे नाहीत, असाच विचार त्यांच्या मनात होता.

जेव्हा हा व्हिडिओ मी पाहत होतो, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर १५ ऑगस्ट २०२०चा क्षण आला. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी महापालिका मुख्यालय इमारतीवर झेंडावंदन करताना मुसळधार पावसाची बरसात झाली. त्यावेळी महापौर किशोरी पेडणेकर आणि आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या डोक्यावर मग शिपायांनी छत्री धरली. परंतु त्यावेळी मानवंदना देणारे मुंबई अग्निशमन दलाचे जवान, सुरक्षा रक्षक विभागाचे जवान अधिकारी हे पावसात भिजतच मानवंदना देत होते. आता कुणी म्हणेल की याची आणि त्या घटनेची सांगड कशी घालता आपण. परंतु प्रश्न हाच आहे की गणवेशधारी जवानांसाठी मानवंदना ही राष्ट्रीय कर्तव्यासारखीच आहे. परेड करताना ते कर्तव्य थांबू नये, असा शिष्टाचार आहे. मग तो स्वातंत्र्यदिन, प्रजाकसत्ता दिन असो वा अन्य कार्यक्रम असो.

‘त्या’ व्हिडिओमागे राजकरण!

मुळात या व्हिडिओमागे आता राजकारणाचा वास येऊ लागला आहे. ज्या कामगार संघटनांना आता आपली डाळ शिजणार नाही असे वाटते, अशांनी तर हा प्रकार केला नसेल ना? कारण मागील काही वर्षांपासून अग्निशमन दल अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडेच आहे. परंतु ते खाते आता कडक शिस्तीच्या आणि नियमांनुसारच काम करणाऱ्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे भिडे यांच्याकडे या विभागाची जबाबदारी सोपवल्यामुळे काहींच्या पायाखालची वाळू आतापासूनच सरकू लागली की काय, असा प्रश्न आता पडू लागला आहे. सध्या अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील हेवेदावे आणि एकमेकांचे पाय ओढण्याचे प्रकार समोर येत आहेत. मागील काही महिन्यांमधील प्रमुख अग्निशमन दलाच्या पदावरील अधिकाऱ्यांची ज्या प्रकारे वर्णी लागली आणि त्यांचे अधिकारी ज्याप्रकारे पायउतार होतात, हा प्रकार या विभागाला शोभनीय नाही. हे विभाग एक संवेदनशील आहे. या विभागातील अधिकारी राजकारण खेळण्यावरच अधिक भर देत असतील, तर मुंबईत घडणाऱ्या आपत्कालीन घटना नियंत्रणात आणण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होणार. त्याचा परिणाम या शहरावर होऊ शकतो. त्यामुळे आपले कर्तव्य तथा जबाबदारी ओळखून या विभागाच्या जवानांनी आणि अधिकाऱ्यांनी काम करायला हवे. पण जर तसं होत नसेल तर या विभागाचा चार्ज हाती घेतल्यानंतर या विभागाला आता अश्विनी भिडे यांनी अधिक चार्ज करायला हवं. आपण आपत्कालीन सेवेत आहोत आणि आपल्याला राष्ट्रीय कर्तव्य निभावायचे आहे, याचा ज्यांना विसर पडला असेल, त्यांना याची जाणीव करुन द्यावी लागेल. आज अग्निशमन दलांमधील जवान तसेच अधिकाऱ्यांमध्ये असंतोषाचा धूर जोरात पसरत आहे. पण त्या धुराचे रुपांतर आगीच्या लोटांमध्ये होण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवायला हवं. नाहीतर अग्निशमन दलातील अधिकारी राजकारण करत बसतील आणि त्यात मुंबई होरपळून निघेल, असा प्रकार होणार नाही याची अधिक काळजी आता महापालिकेतील सक्षम अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे यांना घ्यावी लागणार आहे. तूर्तास तरी एवढंच!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here