अवघ्या ४० दिवसांत उलगडला खुनाचा गुन्हा!

इम्रान आणि दीपालीचे मागील दोन वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. इम्रानने दीपालीकडून ६ ते ८ लाख रुपये उसने घेतले होते. ते पैसे परत करण्यासाठी दीपालीने त्याच्या मागे तगादा लावला होता.

प्रेयसीने उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावल्यामुळे प्रेयसीचे पैसे परत करण्यासाठी २६ वर्षीय तरुणाने एका वृद्धेची हत्या केली, हत्येनंतर या वृद्धेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करून प्रेयसीच्या ताब्यात देऊन तीचे कर्ज फेडणाऱ्या तरुणाला ४० दिवसांनी उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याची माहिती असून ती दडवून ठेवल्याप्रकरणी या तरुणाच्या ३६ वर्षीय प्रेयसीला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

एकट्या राहणाऱ्या रतन बेन जैन (७०) या वृद्धेची १५ एप्रिल रोजी अज्ञात मारेकऱ्याने गळा चिरून हत्या केली होती. त्यानंतर मारेकऱ्याने या वृद्धेच्या अंगावर असलेले साडे तीन लाख रुपये किंमतीचे दागिने चोरी करून पसार झाला होता. भांडुप पश्चिमेतील क्वारी रोड, फुगावाला कंपाउंड या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडवून दिली होती. भांडुप पोलिसांनी हत्या आणि चोरीचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याचा शोध सुरू केला होता, मात्र जवळपास सीसीटीव्ही अथवा कुठलाही पुरावा मिळून येत नसल्यामुळे मारेकऱ्याचा शोध लावणे कठीण होऊन बसले होते. दरम्यान परिमंडळ ७ चे पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांनी विशेष पथक गठीत करून संपूर्ण परिमंडळातील पोलिस ठाण्याचा गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी यांचे विशेष पथक गठीत केले.

(हेही वाचा : आरोपी महिलेचा पळून जाण्याचा फसला प्रयत्न! रेल्वे ट्रॅकवरच पकडले!  )

९००पेक्षा जास्त जणांकडे केला तपास!

या पथकात १४ अधिकारी आणि तेवढेच अंमलदार यांचे पथक या गुन्ह्याची उकल करण्यासाठी कामाला लागले. रतन बेन जैन या खाकरा विकायच्या, तसेच गरजवंताना व्याजाने पैसे देखील पुरवत होत्या. त्या अनुषंगाने तपास पथकाने रतन बेन यांच्याकडून व्याजाने पैसे घेणारे, तसेच परिसरात राहणारे असे एकूण ५०० पेक्षा अधिक जणांची चौकशी केली, तसेच चोरीचे दागिने सोनाराला विकले असेल यासाठी भांडुप, मुलुंड परिसरातील ९८ सोनार, १८ आंबेविक्रते, रतन बेन यांच्या घरासमोर वाहन पार्क करणारे २४० वाहन धारक आणि ३०पेक्षा अधिक अभिलेखावरील गुन्हेगार यांच्याकडे चौकशी करण्यात आली होती. मात्र त्यातूनही पोलिसांच्या हाती लागले नाही.

पोलिसांचा तपास सुरू असताना त्याच परिसरात राहिला!

इमरान मलिक हा (२६) हा तरुण सतत पोलिसांच्या पुढे पुढे करून मागोवा घेत असल्याचे तपास पथकाच्या लक्षात आले. पोलिसांनी इमरान मलिक याची माहिती काढण्यास सुरुवात केली. इमरान हा रतन बेन राहत असलेल्या घरापासून काही अंतरावर भाड्याच्या खोलीत राहत होता. सलोनमध्ये काम करणारा इम्रान हा लॉकडाऊननंतर बेकरीत कामाला लागला होता. पोलिस त्याची माहिती मिळवत असल्याचे बघून इम्रान हा अचानक गायब झाला. इम्रान हा गायब झाल्यामुळे तपास पथकाचा त्याच्यावरील संशय अधिकच बळावला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आजूबाजूला विचारपूस केली, मात्र त्याच्या बाबत कुणाकडेही अधिक माहिती मिळून येत नव्हती.

(हेही वाचा : दगडी चाळीचे पोलिसांनी सांगितलेले किस्से)

प्रेयसीच्या माहितीवरून लागला आरोपीचा शोध

अखेरीस तपास पथकाने तांत्रिक तपास सुरू केला त्याच्या मोबाईल क्रमांकावरून सीडीआर (कॉल डिटेल्स) मागवण्यात आले. त्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीचीचे मोबाईल क्रमांक तपास पथकाने मिळवले. त्यात एका मोबाईल क्रमांकाने पोलिसांचे लक्ष वेधून घेतले, त्या क्रमांकावर इम्रान सतत संपर्कात होता. पोलिसांनी त्या क्रमांकाची माहिती काढली असता तो क्रमांक दिपाली अशोक राऊत (३६) या महिलेचा होता. ही महिला भांडुप परीसरातच राहणारी असून अंधेरी येथील एका बड्या रुग्णालयात ती डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नोकरीला होती. पतीपासून विभक्त राहणारी दीपाली ही आपल्या ४ वर्षांच्या मुलीसोबत राहत होती. दीपालीचे इम्रान सोबत प्रेमप्रकरण सुरू होते, अशी माहिती तपास पथकाच्या हाती लागली होती. अखेर तपास पथकाने दीपाली राऊत हिला चौकशीसाठी बोलवले, मात्र तिने येण्याचे टाळले, अखेरीस तिला ताब्यात घेऊन तिची उलटतपासणी केली असता इम्रान यानेच रतन बेन हिची हत्या करून तिच्याकडील दागिने चोरी करून आपल्याला आणून दिल्याची कबुली तिने दिली.

यूपीच्या बीजनौरमधून इम्रानला अटक

तपास पथकाने दोन वेळा दीपालीला फोन करून देखील ती आली नव्हती, त्या वेळी तिने इम्रानला संपर्क साधून पोलिसांना तुझा संशय आला आहे, असे सांगितले होते. तपास पथकाने दीपालीला ताब्यात घेतल्यानंतर इम्रानच्या गावचा पत्ता मिळवून पोलिसांचे एक पथक यूपीला रवाना झाले आणि बीजनौरमध्ये लपून बसलेल्या इम्रान मलिक याला अटक करून मुंबईत आणण्यात आले.

(हेही वाचा : …आणि ‘हिंदू डॉन’ झाला ‘आमदार’!)

गुन्ह्याची कबुली दिली!

इम्रान आणि दीपालीचे मागील दोन वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. या कालावधीत इम्रानने दीपालीकडून ६ ते ८ लाख रुपये उसने घेतले होते. ते पैसे परत करण्यासाठी दीपालीने त्याच्या मागे तगादा लावला होता. इम्रान हा पैसे देत नसल्याचे बघून तिने इम्रान याच्याविरुद्ध भांडुप पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार देखील दिली होती. दीपालीकडून उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी अखेर त्याने घराशेजारी राहणारी रतन बेन जैन या महिलेच्या हत्येची योजना आखली. रतन बेन या वृद्धेकडे भरपूर दागदागिने, पैसा अडका असल्याच्या माहितीवरून १४ एप्रिल रोजी रात्री घराचे भाडे देण्याच्या निमित्ताने तो रतन बेनच्या घरात घुसला व स्वत: जवळ असणाऱ्या चाकूने रतन बेनचा गळा चिरून तिची हत्या केली. त्यानंतर तिच्या जवळील दागिने घेऊन ते दागिने दीपालीकडे आणून दिले होते, अशी कबुली इम्रानने पोलिसांना दिली. ४० दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर या गुन्ह्याची उकल करण्यासाठी परिमंडळ ७ च्या विशेष पथकाला यश आले असून तपास पथकाच्या या कामगिरीचे कौतुक वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here