मातृभूमीविषयी अत्युत्कट प्रेम व्यक्त करणारं ‘ने मजसी ने परत मातृभूमीला…’

1049
मातृभूमीविषयी अत्युत्कट प्रेम निर्माण करणारे 'ने मजसी ने परत मातृभूमीला...'
मातृभूमीविषयी अत्युत्कट प्रेम निर्माण करणारे 'ने मजसी ने परत मातृभूमीला...'
  •  नमिता वारणकर 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावर लिहिलेल्या ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला…’ या अजरामर काव्याला शुक्रवार, १० डिसेंबर २०२३ला ११४ वर्षे पूर्ण झाली, असं म्हटलं जातं. वीर सावरकर यांनी ते कधी लिहिलं या वादात न अडकता ते कधीही लिहिलं असलं तरीही या गीताचं काव्यमूल्य अबाधितच राहणार आहे. या गीताच्या ११४व्या वर्षपूर्तीनिमित्त मातृभूमीविषयी मनात अत्युत्कट प्रेम व्यक्त करणाऱ्या या गीताला वाहिलेली ही भावपूर्ण आदरांजली !!! 

२१-२२ वर्षांचे स्वातंत्र्यवीर सावरकर. घरात पत्नी, लहान मुलगा, भाऊ, वहिनी…या सगळ्यांना सोडून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी विलायतेत लंडनला शिकायला गेले. इकडे भारतात वीर सावरकरांचे मोठे भाऊ बाबाराव सावरकर आणि त्यांचे लहान भाऊ बाळाराव सावरकर या दोघांनाही ब्रिटिश सरकारने अटक केली. त्यावेळी त्यांच्या घरात फक्त पत्नी (माई), वहिनी आणि लहान प्रभाकर. लंडनलाही त्यांचे देशकार्य सुरूच होते. एक दिवस लंडनपासून जवळच असलेल्या ब्रायटनला सावरकर गेले. तिथे त्यांचे मित्र निरंजन पाल त्यांच्या सोबत होते. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मनात समुद्रकिनाऱ्याकडे पाहून कल्पना आली की, एकाच वेळेस हा समुद्र मला आणि पलीकडे माझ्या मातृभूमीला स्पर्श करतो, पण मला मात्र आता माझ्या मातृभूमीकडे जाता येत नाही. काय वेळ आलीय माझ्यावर. यावेळी वीर सावरकरांच्या अंत:करणातून ‘हे’ शब्द उमटले…’ ने मजसी ने परत मातृभूमीला…सागर प्राण तळमळला’

हळूहळू ते समुद्राशी बोलू लागतात. ते समुद्राला म्हणतात, ‘तू मला वचन दिलं होतस लहानपणी की, मी तुला दूरवर घेऊन जाईन, पण परत आणेन. तुझ्या वचनाला मी भुललो. इकडे आलो आणि अडकलो.’…”शुक पंजरिंवा हरिण शिरावापाशी ही फसगत झाली कैशी…” पोपट पिंजऱ्यामध्ये अडकावा…हरिण पाशामध्ये शिरावा त्याप्रमाणे तुझ्या शब्दांना भुलून हे सागरा, मी इथे आलो आणि अडकलो. विलायतेत स्वातंत्र्य, पैसा, संपत्ती…कशाचीही कमी नाही..तरीही मातृभूमीची लागलेली ओढ आपल्या ओजस्वी शब्दात त्यांनी मांडली आहे. या गीतातच ते पुढे लिहितात, ‘नभी नक्षत्रे बहुत एक परि प्यारा…मज भरतभूमीचा तारा…!! ‘

आकाशात अनेक नक्षत्रे असतील, पण मला मात्र एकच प्रिय आहे. तो म्हणजे ‘भरतभूमीचा तारा!’ वीर सावरकर आपली भावना व्यक्त करतात. त्यावेळी समोरून समुद्रावरील लाटांचा फेस उचंबळून येतोय. त्या लाटांकडे बघून त्यांना असं वाटलं की, फेसांच्या रुपाने हा समुद्र आपल्या भावनांना हसतोय. म्हणून वीर सावरकरांनी सागरालाच ठणकावून सांगताना हे अलौकिक शब्दकाव्य लिहिलं.

मातृभूमीच्या विरहाची अत्युत्कट वेदना, जाज्वल्य देशभक्ती आणि देशप्रेमाचं स्फुल्लिंग अंतर्मनात जागृत करणारे हे गीत कितीही वर्षे कधीही ऐकले तरी अंगावर रोमांच उभे राहतात. देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि विशेष म्हणजे फक्त मन नाही, तर वीर सावरकर यांनी पंचप्राणातून मातृभूमीची तळमळ या गीतातून व्यक्त केली आहे. इतकं अगाढ मातृभूमी प्रेम व्यक्त करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आणि या ओजस्वी काव्याला शतश: नमन !!!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.