शाम शर्मा
भारतातील ‘न्यूज क्लिक’ या स्वतंत्र ‘ऑनलाईन’ ‘न्यूज पोर्टल’च्या कार्यालयावर ९ फेब्रुवारी २०२३ या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) धाड घातली. त्यानंतर पुन्हा ३ ऑक्टोबर रोजीही छापे मारले आणि त्यावेळी ५ जणांना अटक केली. ज्यामध्ये अभिसार शर्मा आणि अन्य वामपंथी विचारांचे पत्रकार होते. विशेष म्हणजे सुरुवातीला जेव्हा साम्यवादी नेते प्रकाश करात आणि सिंघम यांच्यातील संबंध उघडकीस आले तेव्हा लगेच गलवान येथे चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत भारताचे २० सैनिक ठार झाले. राहुल गांधी यांनी गलवान येथील संघर्षानंतर पंतप्रधानांवर टीका केली; परंतु लगेच ते चीनच्या राजदूतांना ‘नाईट क्लब’मध्ये जाऊन भेटले. (News Click )
नेव्हल रॉय सिंघम सूत्रधार
अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्राने एक मोठा खुलासा केला की, अमेरिकेतील एक मोठे उद्योजक नेव्हल रॉय सिंघम यांचे चीनमधील कम्युनिस्ट पक्ष आणि भारतातील ‘न्यूज क्लिक’ या प्रसिद्धीमाध्यमाशी संबंध आहेत. ‘न्यूज क्लिक’च्या संकेतस्थळावरून त्यांचे चीनशी संबंध असल्याचे दिसून येते. ‘न्यूज क्लिक’ला विदेशातून ३८ कोटी रुपयांचा निधी पुरवला गेला आहे’, असे ‘ईडी’ने शोधून काढले आहे. हे पैसे सिंघम याने पुरवल्याचे दिसून आले आहे. सिंघम ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका या देशांमध्ये चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा प्रसार करत आहेत. अलीकडे विविध देशांमध्ये प्रसिद्धीमाध्यमांना संपर्क करून निधी पुरवायचा आणि त्यांचा वापर करून त्याच देशात चीनच्या तत्त्वांचा प्रचार करायचा, असे धोरण चीनने अवलंबले आहे. सिंघम हा ‘अमेरिकी तंत्रज्ञान उद्योजक’ आहे. त्याने ‘थोट वर्क’ नावाची ‘टेक्नॉलॉजी कन्सल्टन्सी’ आस्थापन चालू केले होते. ती वर्ष २०१७ मध्ये त्याने एका ब्रिटीश कंपनीला ७८५ अब्ज डॉलर्सना (६५ लाख १५ हजार कोटी रुपयांहून अधिक) विकली.
गेली कित्येक वर्षे सिंघम यांचे चीनमधील कम्युनिस्ट पक्षाशी संबंध आहेत. ते नेहमीच साम्यवादाला पाठिंबा देत आले आहेत. त्यांच्या कंपन्यांमध्ये कर्मचारी एकमेकांना ‘कॉम्रेड’ असे संबोधत होते. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार सिंंघमचे चीनच्या सरकारशी घनिष्ठ संबंध आहेत. त्याने शांघाय, लोवेशिंग आणि गोंडवाना फूड या चीनमधील कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे तसेच तो ‘शांघाय शिनॉन’ या कंपनीचा कायदे सल्लागार होता. सिंघमची पत्नी एवन्स हिने ‘कोर्ट पिंक’ ही स्त्री संघटना सिद्ध केली होती. या संघटनेने वर्ष २०२१ मध्ये ‘चीन हा आमचा शत्रू नाही’, या नावाने मोहीम राबवली होती. या माध्यमातून तिने अमेरिकेत चीनचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. पैसा, इतर स्रोत आणि विविध संघटना यांच्या माध्यमातून या लोकांनी चीनचा प्रचार जगभरात केला. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तामध्ये चीनमधील साम्यवादी पक्ष सिंघमच्या माध्यमातून भारतात ‘न्यूज क्लिक’ या प्रसिद्धीमाध्यमाला निधी पुरवत होता आणि सिंघमचे ‘न्यूज क्लिक’चे सहसंस्थापक गौतम नवलखा यांच्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे.
चीनच्या दिमतीला डाव्यांची फौज
सिंघम यांनी चीनवर आधारित ‘रेडस्टार ओव्हर चायना’ आणि ‘द सिक्रेट ऑफ चायना’ या दोन चित्रपटांचे ‘डबिंग’ अन् संकलन करण्यासाठी चीनशी संपर्क केला होता. ‘न्यूज क्लिक’चे अभिसार शर्मा आणि तिस्ता सेटलवाड यांच्या कुटुंबाला निधी पुरवला गेला होता. तिस्ता सेटलवाड यांच्यावर गुजरातच्या गोध्रा दंगलीनंतर मोदी आणि भाजप यांची बदनामी करण्यासाठी काँग्रेसकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे तसेच गोध्रा दंगलीतील साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याविषयी त्यांना अटकही करण्यात आली होती. हे लोक निःपक्षपाती पत्रकार आहेत का? ‘न्यूज क्लिक’ला जो अवैधपणे पैसा मिळाला, त्याचा परिणाम काय झाला? जेव्हा गलवानवर चीनने आक्रमण केल्यावर ‘टीक टॉक’ प्रणालीवर बंदी आणण्याचा विचार भारत करत होता, तेव्हा ‘न्यूज क्लिक’ने चीनला पाठिंबा दिला. त्या वेळी त्याने म्हटले, ‘गाणे आणि नृत्य यांसाठी २० वर्षे काम करणारे ‘टीक टॉक’ हे सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक कसे ठरू शकते?’ ‘टिक टॉक’ वर बंदी आणल्यावर भारत आणि चीन यांच्यामध्ये संपर्क असणारे एकमेव माध्यम बंद झाले.
काँग्रेसचा पाठिंबा
‘न्यूज क्लिक’वर ‘ईडी’ने धाड टाकली, तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनीही ‘न्यूज क्लिक’ला पाठिंबा देत ‘ट्वीट’ केले होते. याखेरीज काँग्रेसवर चीनच्या साम्यवादी पक्षाशी संबंध असल्याचे आरोप आहेत. राजीव गांधी फाऊंडेशनला चिनी दूतावासाकडून १ कोटी ३५ लाख रुपयांचे अनुदान मिळाल्याचा आरोप आहे. वर्ष २००८ मध्ये काँग्रेसचे चीनच्या साम्यवादी पक्षाशी संबंध होते. त्या वेळी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, ज्यामध्ये सोनिया आणि राहुल यांचा सहभाग होता अन् ते बीजिंगला गेले होते. गलवान चकमकीनंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना प्रश्न केले; परंतु स्वतःच चीनच्या राजदूताशी चर्चा केली. चीनचा भारतामधील हस्तक्षेप एवढाच नाही, तर याहून अधिक धोकादायक आहे. आपली अशी प्रसिद्धीमाध्यमे जी चीनच्या खिशात आहेत, ती खरोखरच प्रामाणिकपणे सरकारला प्रश्न विचारत आहेत, यावर कसा विश्वास ठेवावा? आम्ही आमच्या देशातील प्रसिद्धीमाध्यमांवर का विश्वास ठेवावा? अशा प्रकारची माहिती आपल्या देशातील प्रसिद्धीमाध्यमांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. त्यामुळे आपल्या देशात दुसऱ्यांनी दत्तक घेतलेली प्रसिद्धीमाध्यमे कोणती आहेत? जी प्रसिद्धीमाध्यमे इतरांवर असा आरोप करत आहेत, ती स्वतःच चीनने दत्तक घेतली आहेत, असे दिसून येते. भारतीय प्रसिद्धीमाध्यमे चीनच्या बाजूने असतील, तर कुणावर विश्वास ठेवावा? चीनच्या या हस्तक्षेपाला थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो? यावर विचार करणे आवश्यक आहे.