राजकीय पक्षांना नाही कोरोनाचं सोयरसुतक!

येनकेन प्रकारेण मुंबई महापालिकेची निवडणूक वेळेवर घेण्याचा जो काही प्रयत्न सुरु आहे, ते कोरोनाला निमंत्रणच देणारे आहे. पण त्याबरोबरच जे मनुष्यबळ आहे, त्यावरही ताण पडणार आहे.

सध्या मुंबईतील प्रत्येक राजकीय पक्षांना महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागले आहेत. कोरोनाचे सावट डोक्यावर असले तरी निवडणूक लांबणीवर नको. ती वेळेवरच व्हायला पाहिजे. असा पावित्रा घेत काही राजकीय पक्ष आता गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. जणू काही विरोधी पक्षाचे डिपॉझिट जप्त करण्यासारखीच परिस्थिती आहे आणि आता जर निवडणुका झाल्या, तर समोरच्यांना व्हाईट वॉश आम्ही देवू, असंच त्यांना वाटत आहे. राजकीय पक्षांना निवडणुका तर घ्यायचाच आहेत. त्यांना तसंही कोरोनाचं सोयरसुतक नाहीच. पण या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून मुंबई महापालिकेची तयारी आहे का? निवडणूक वेळेत घेतल्या, तर पुन्हा कोरोनाची भीती नाही ना? पण इथे कुणीही याचा विचार करताना दिसत नाही. कोरोनामुळे सरकारात असलेल्या पक्षांविरोधात जे काही वातावरण तापले आहे, त्यावर आपली पोळी भाजून घ्यायची, एवढाच काय तो एककलमी कार्यक्रम राजकीय पक्षांचा दिसून येत आहे.

काँग्रेसचे निवडणुकीसाठी वॉर्म अप 

सध्या तरी नियोजित वेळेनुसारच निवडणूक घेतल्या जातील, असाच कार्यक्रम दिसतोय. त्यामुळे प्रत्येक पक्ष रस्त्यावर उतरुन आंदोलन करत वॉर्म अप करताना दिसत आहे. मागील आठवड्यापासून काँग्रेस पक्ष हा आंदोलनांमध्ये सक्रीय झाला आहे. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक विभागात लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे मागील काही दिवसांपासून काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात लसीकरणाबाबत तीव्र आंदोलन करत मुंबईचे वातावरण पेटवून टाकले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याने संपूर्ण तालुक्यांमध्ये आंदोलन केले. एका बाजुला केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत असताना दुसरीकडे मुंबईतील नालेसफाईविरोधातही त्यांनी पाहणी करून महापालिका प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. खरे तर काँग्रेस पक्ष राज्यातील महाविकास आघाडीतील मित्र पक्ष. महाविकास आघाडीत एकत्र बसून ज्या पक्षाबरोबर सरकार चालवतात, तोच पक्ष महापालिकेत सत्ताधारी पक्ष आहे. प्रशासनावर काँग्रेस भ्रष्टाचाराचे आरोप करते. शिवसेनेने काही दिवसांपूर्वी नाल्यांची पाहणी करून त्याबाबत समाधान व्यक्त केले होते. तसेच ७६ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता. काँग्रेसला, सत्ताधारी शिवसेनेचा समाचार घ्यायला शरम वाटली. जेव्हा काँग्रेसला सर्व नाले गाळ आणि कचऱ्याने भरलेले दिसले, तेव्हा शिवसेनेने हेच नाले कोणत्या चक्षुतून पाहिले होते, एवढा जरी सवाल केला असता तरी काँग्रेसच्या हेतूबाबत शंका आली नसती. तसेच भाई जगताप यांनी जेव्हापासून मुंबई अध्यक्षपदाचा भार स्वीकारला आहे, तेव्हापासून संघटनात्मक बांधणी किती केली आहे, हा संशोधनाचा विषय आहे.

(हेही वाचा : वाईट काळात युती टिकली, मग चांगले असतानाच का तुटली? मुख्यमंत्र्यांचा सवाल )

काँग्रेस – राष्ट्रवादीतील काटशह!

काँग्रेससाठी सर्व अनुकूल वातावरण असतानाही हा पक्ष शिवसेनेच्या जोखडाखाली वावरु लागला आहे. आज काँग्रेसची महापालिकेतील संख्या किती तर २९ एवढी आहे. पण सन २०१२मध्ये काँग्रेसचे ५२ नगरसेवक होते, तर २००७मध्ये ७१ एवढे नगरसेवक निवडूण आले होते. म्हणजे एकेकाळी याच महापालिकेत काँग्रेसची सत्ता असायची. परंतु १९९६ नंतर काँग्रेसला महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवता आलेली नाही. आज काँग्रेस पक्ष एवढा मागे का पडला? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची निवडणुकीत वारंवार आघाडी झाली, तरी दोघांनीही एकमेकांचे पायच ओढण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाच्या बाजूने असेल हे माहित नसले, तरी काँग्रेसने महाविकास आघाडीसोबाबत फरफरटच जायचे की स्वतंत्र निवडणूक लढवायची याबाबत अजूनही मनाचा पक्का निर्धार नाही. कारण आज सर्व सोयीचे राजकारण आहे. आपल्या पक्षाचे अस्तित्व किती, यापेक्षा अमरवेलीप्रमाणे आपण दुसऱ्यावर परावलंबून कशाप्रकारे राहू, याचाच विचार प्रत्येक पक्ष करताना दिसत आहे.

महापालिका निवडणुकीत सेनेच्या मनात मात्र महाआघाडीच!

काँग्रेस पक्ष भलेही महापालिकेवर तिरंगा फडकवू म्हणून राणा भीमदेवी थाटात वल्गना करत असले, तरी त्यांना त्यांचाच अंदाज नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेसला आपली नगरसेवक संख्या दुप्पट करायची आहे. खरं तर आजवर राष्ट्रवादी काँग्रेसला १४च्या पुढे आपले नगरसेवक मुंबईत निवडूण आणता आलेले नाही. आता तर ही संख्या ०८वर आली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील आपले नगरसेवक दुप्पट कसे होतील, याचाच विचार करायचा आहे. परंतु ज्याप्रकारे या पक्षाच्या नगरसेवकांच्या कार्यक्रमांना शिवसेनेचे नेते व पालकमंत्री उपस्थिती लावत आहेत. ते पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेने विलिन केला की काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. आज शिवसेनेचे नेते एकवेळ स्व:पक्षातील नगरसेवकांच्या कार्यक्रमाला वेळ देत नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस पक्षातील नगरसेवकांच्या कार्यक्रमांना ज्याप्रकारे हजेरी लावत आहे, ते पाहता शिवसेनेने महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडीच्यावतीनेच लढण्याचा विचार केला आहे, यावरही शिक्कामोर्तब होत आहे.

(हेही वाचा : धक्कादायक! केरळमध्ये लसीकरणासाठी मुसलमानांना ‘फ्रंट लाईन वर्कर’ घोषित!)

भाजपासमोर मोठे आव्हान!

मागील निवडणुकीत भाजपने मुंबईत जे यश मिळवले आहे, त्याला रोखणे हा एकमेव कार्यक्रम शिवसेनेचा आहे. मागील निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये केवळ दोन नगरसेवक संख्येचा फरक होता. पण यावेळी भाजप सत्तेवर नाही, तर शिवसेनेचे ठाकरे सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती भाजपची नगरसेवक संख्या कमी करण्यावर त्यांचा भर आहे. मग यासाठी तोडाफोडीचे राजकारण, आरक्षण बदलून धक्का देणे असे प्रकार केले जाणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ही शिवसेना आणि भाजपसाठी अटीतटीचीच राहणार आहे. त्यामुळे शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेवून भाजप समोरील आव्हान वाढवणे हेच योग्य ठरणार आहे. मागील १९९६ नंतर सलग महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. तर त्यापूर्वीची चार वर्षे वगळल्यास शिवसेनेचीच सत्ता होती. परंतु एक गोष्ट महत्वाची आहे. आजवर शिवसेनेचा भगवा ध्वज महापालिकेवरून उतरला नाही. मागील निवडणुकीत तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेशी जुळवून घेतल्याने हा भगवा कायम राहिला. अन्यथा भाजपला, या सत्तेवरुन खाली खेचता आले असते. भाजपची ही चूक आता त्यांना फार महागात पडल्याचे दिसून येत आहे. त्यांना त्याचा पश्चातापही होत आहे. परंतु शिवसेनेने आपला स्वार्थ साधला. पण पुढची पाच वर्षे भाजपच्या नगरसेवकांना पश्चातापाच्या आगीत ढकलून दिले आहे. आज या पश्चातापाचा बदला घेण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असला, तरी शिवसेना पक्ष हा राज्य सरकारमधील प्रमुख पक्ष आहे. त्यामुळे सत्तेचा वापर शिवसेना करणारच आहे. त्यामुळे भाजप किती यशस्वी ठरतो हे काळच सांगेल. परंतु येनकेन प्रकारेण ही निवडणूक वेळेवर घेण्याचा जो काही प्रकार सुरु आहे, तो पाहता कोरोनाला निमंत्रणच देणारे आहे. पण त्याबरोबरच जे मनुष्यबळ आहे, त्यावरही ताण पडणार आहे. कोरोनाच्या काळात नियमांचे पालन करुन जर निवडणूक घ्यायची झाल्यास दुप्पट मतदान केंद्र आणि दुप्पट मनुष्यबळ लागणार आहे. हे मनुष्यबळ सरकार कुठून उपलब्ध करणार आहे? असो, प्रत्येक गोष्टीत राजकीय पक्षांची पोळी भाजून घेण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांचा बळी दिला जातो. तसाच प्रकार आगामी सार्वत्रिक निवडणुकीत दिला जाणार आहे, हे निश्चित!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here