भेटी-गाठीचे राजकारण

एकूणच या गाठी-भेटी पाहिल्या तर येत्या काळात बऱ्याच घडामोडी नाकारता येत नाही.

86

राजकारण… या राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो किंवा मित्रही नसतो. आज जे एकमेकांना शिव्या घालतात, तेच उद्या एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसले तर नवल वाटायला नको. राज्यातच नाही तर देशपातळीवर सध्या हीच परिस्थिती आहे. पण यात सध्या अग्रभागी आहे, ते महाराष्ट्राचे राजकारण. आता तर राज्यातल्या नेत्यांचे भेटी-गाठीचे राजकारण सुरू आहे. जरी या राजकीय भेटी साध्या असल्या, तरी यावरील चर्चांना मात्र कमालीचा जोर आला आहे. नेमके भेटी-गाठीचे राजकारण आहे तरी काय, याचा आढावा आपण घेऊयात.

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा

राज्यात एकेकाळी एकमेकांचे सोबती असलेले शिवसेना-भाजप हे दोन पक्ष सध्या एकमेकांचे कट्टर वैरी झाली आहेत. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर तर, ही दुश्मनी इतकी वाढली की, शिवसेनेचे नेते तर थेट दिल्लीतील मोदी सरकारवरच टीका करू लागले आहेत. कोरोना काळात ठाकरे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील वादाला आणखीनच जोर मिळाला. मात्र एकीकडे गल्लीत गोंधळ असला, तरी दिल्लीत मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंनी अर्धा तास पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीच्या वेळी त्यांनी त्यांच्यासोबत गेलेल्या अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना लांब ठेवले. त्यांच्या या भेटीनंतर मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट राजकीय तडजोडीसाठीच घेतली असून, या भेटीतून सत्तांतर होऊन देवाण-घेवाण होणार असल्याचा आरोप उदयनराजेंनी केला. आता उदयनराजेंनी म्हटल्या प्रमाणे खरच या भेटीत सत्तांतर करण्याची चर्चा झाली, की आणखी कसली तडजोड? याचे उत्तर फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच देतील. पण रोखठोकमध्ये तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘पाच वर्ष मुख्यमंत्री’ हा शब्द असल्याची आठवण आघाडीसह सगळ्या नेत्यांना करुन दिली आहे. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असं जरी वारंवार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं असलं, तरीसुद्धा उद्धव ठाकरेच पाच वर्ष मुख्यमंत्री असतील हे कुणीही उघडपणे सांगताना दिसत नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री आणि मोदी भेटीनंतर संजय राऊत यांची येणारी विधाने मात्र संभ्रम वाढवणारी असल्याचे तरी सध्या चित्र आहे.

(हेही वाचाः आता बंद दाराआड मोदी-मुख्यमंत्र्यांची चर्चा, नेमकं काय घडलं?)

पवारांच्या मनात काय दडलंय?

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची चर्चा रंगलेली असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या देखील मनात काही तरी शिजत असल्याचे बोलले जात आहे. पवार कधी काय करतील, याचा ठावठिकाणा कधीच कुणाला लागत नाही. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र आणत त्यांनी ती किमया करुन देखील दाखवली. मात्र आता पुन्हा त्यांच्या सिल्व्हर ओक या निवास स्थानावर भेटींचा सिलसीला वाढत चालला आहे. आधी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतल्याने, राजकारण तापले असताना, आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पवारांची भेट घेतल्याने पवारांच्या घरी काही राजकीय गणिते ठरवली जात आहेत का? असा अंदाज लावला जात आहे.

(हेही वाचाः राज्यातील सरकार पाच वर्षे टिकेल! शरद पवारांचा आत्मविश्वास )

पवार राजकीय व्हिजन आखत आहेत?

राष्ट्रवादीने नुकताच आपला २२वा वर्षापन दिन साजरा केला. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी प्रशांत किशोर सिल्व्हर ओकवर पोहोचले. त्यामुळे राष्ट्रीय नेतृत्व आणि राज्यातील नेतृत्वाबाबत पवारांच्या मनात काही वेगळच सुरू आहे का? असे एक ना अनेक तर्क-वितर्क मात्र आता लढवले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी कोणते कार्यक्रम आखले पाहिजेत, जेणेकरुन राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीमध्ये थेट फायदा होऊ शकेल, याबाबत देखील या भेटीत महत्त्वाची चर्चा झाली असली, तरी भविष्यात मुख्यमंत्री पदावर पवारांच्या राष्ट्रवादीचा डोळा तर नाही ना? मोदींना टक्कर देणारा चेहरा कोण याची माहिती प्रशांत किशोर यांच्याकडून घेऊन, पवार आपले राजकीय व्हिजन तर ठरवत नसतील ना? असे एक ना अनेक अंदाज सध्या राजकारणात बांधले जात आहेत.

(हेही वाचाः पवार-किशोर यांच्या भेटीत नेमकं काय शिजलं? वाचा…)

काय होणार भविष्यात?

देशातील इतर राज्यांत पश्चिम बंगाल मॉडेल राबवले जाऊ शकते का? या मुद्यावर शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना स्पष्ट बहुमत मिळाले होते. या निकालामागे प्रशांत किशोर आणि शरद पवार यांनी महत्त्वाची रणनीती आखली होती. ममता बॅनर्जी यांच्या मागे रणनीती उभी करण्याचे काम प्रशांत किशोर यांनी केले होते. तर, पश्चिम बंगाल मध्ये विरोधकांची मते विभागली जाऊ नयेत, याची खबरदारी शरद पवार यांनी घेतली होती. ते स्वतःही ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालला जाणार होते, मात्र त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्यांना पश्चिम बंगालला प्रचारासाठी जाता आले नव्हते. तरीही शरद पवार आणि प्रशांत किशोर यांनी संपूर्ण ताकद ममता बॅनर्जी यांच्या मागे उभी करुन, त्यांना बहुमत मिळवून देण्यास मदत केली होती. तीच पद्धत आता इतर राज्यांमध्ये येणा-या विधानसभा निवडणुकांसाठी देखील राबवता येऊ शकेल का? याची चाचपणी या बैठकीमध्ये झाली. विशेषतः पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यातील निवडणुकीवर शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे सध्या एकूणच या गाठी-भेटी पाहिल्या तर येत्या काळात बऱ्याच घडामोडी नाकारता येत नाही.

(हेही वाचाः ज्यांना पुतण्याने पाडले, त्यांना ‘काका’ भेटले! काय आहे (राज)कारण?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.