Raigad: धगधगत्या मशाली प्रज्वलित करून रायगडावर साकारला श्री शिवचैतन्य सोहळा

दिवाळीनिमित्त गडावरील श्री जगदीश्वर, शिरकाई देवी, व्याडेश्वर व इतर सर्व देवीदेवतांची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली.

317
Raigad: धगधगत्या मशाली प्रज्वलित करून रायगडावर साकारला श्री शिवचैतन्य सोहळा
Raigad: धगधगत्या मशाली प्रज्वलित करून रायगडावर साकारला श्री शिवचैतन्य सोहळा

श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड तर्फे आयोजित करण्यात येणारा श्री शिवचैतन्य सोहळा यावर्षी गोवत्स द्वादशी, वसुबारस (गुरुवार दिनांक, ९ नोव्हेंबर २०२३) च्या संध्येला मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने किल्ले रायगडावर (Raigad) पार पडला. यंदाचे या सोहळ्याचे १२वे वर्ष होते. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो शिवभक्त पारंपरिक वेषात किल्ले रायगडावर उपस्थित होते. या सोहळ्याचे महत्त्व असे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज आपण आपल्या घरी दिवाळी साजरी करत आहोत; परंतु आपल्या या राजाचा गड स्वराज्याची राजधानी, मात्र ऐन दिवाळीत अंधारात असते. हे शल्य जाणून समितीचे मावळे दिवाळी सणाचा पहिला दिवा रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी लावतात आणि आपल्या दिवाळी सणाची सुरुवात करतात. असे या समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले.

यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष असल्यामुळे यंदा ३५० मशाली प्रज्वलित करून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली. दिवाळीनिमित्त गडावरील श्री जगदीश्वर, शिरकाई देवी, व्याडेश्वर व इतर सर्व देवीदेवतांची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, मशालींच्या उजेडात छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी काढण्यात आली. मावळ्यांच्या वेशातील धारकरी, नववारी नेसलेल्या भगिनी, ढोल ताशांचा गजर, पणत्यांनी उजळलेला रायगड, धगधगत्या मशाली यांनी गडावरील वातावरणात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी गडावरील रहिवाशांना फराळाचे वाटप समितीमार्फत करण्यात आले.

 

दिवाळी सणावेळी महाराष्ट्रातील अनेक वास्तूंवर शासनामार्फत प्रकाशयोजना करण्यात येते; परंतु स्वराज्याची राजधानी असलेला दुर्गराज रायगडावर अशी कोणतीही प्रकाशयोजना करण्यात येत नाही. त्यामुळे दिवाळी सणात रायगड किल्ला अंधारात असतो. या कारणास्तव दिवाळी आणि इतर महत्त्वाच्या दिवशी रायगडावरसुद्धा भव्य प्रकाशयोजना शासनामार्फत करण्यात यावी, अशी मागणी समितीच्या वतीने महाराष्ट्र सरकारकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे सरचिटणीस समीर वारेकर यांनी सोहळ्यानंतर दिली.

Photo courtesy@Google 18

 

 

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विक्रोळी येथील दुर्गसृष्टि प्रतिष्ठान, बदलापूर येथील राजमुद्रा हायकर्स आणि बोरिवली येथील मावळ्यांचे सहकार्य लाभले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.