Ram Navami 2023: राम आमची राष्ट्रीय अस्मिता

121

मर्यादा पुरुषोत्तम राम, धर्मरक्षक राम. त्राटीका, मारीच, सुबाहू ते कुंभकर्ण रावण या अधमांपासून जनसामान्यांना मुक्त करणारा राम. वंचित अहल्येच्या जीवनात नवचैतन्य संचारून तिला समाजमान्य नवजीवन देणारा राम. ज्याच्या केवळ नामस्मरणाने पश्चातापदग्ध महापातका पासून मनाला मुक्ती मिळते. राम ही एक सभ्यता आहे, संस्कृती आहे. गदिमा लिहितात, राम चालले तो तर सत्पथ. म्हणूनच रामाचे मार्गक्रमण ते एका सभ्यतेचे मार्गक्रमण आहे. रामाची पावलं म्हणजे सुसंस्कृत विचारांचा तो ठसा आहे. त्या रामाची माझ्या वर्तमानाला नितांत गरज आहे.

काळ कोणताही असो, युग कोणतेही असो सत्ता सत्तेसारखीच असते. सत्ता या शब्दातच गुणांसोबत दोषही सामावले आहेत. सत्तेचा स्वतःचा असा एक स्वभाव आहे. पराक्रमी राजा दशरथाची सत्ता देखील याला अपवाद नव्हती. अनेक युद्धांमध्ये विजय संपादन केलेला मात्र वार्धक्यात केवळ राण्या, पुत्र व संसारात रममाण झालेला दशरथ अगतिक होता. वारसा हक्काने रामाला सत्ता मिळणारच होती. भरत, लक्ष्मणादी भावंडांनी आपापली जबाबदारी स्वाभाविकपणे पार देखील पाडलीच असती. परंतु समाजात अत्यंत जागरूकतेने वावरणारा समूह केवळ चिंतीत नव्हता, तर तो परिवर्तनाच्या दिशेने प्रयत्नशील होता. नव्या संघर्षाचा सारीपाट मांडला गेला होता. असूरी शक्तींवर मानवतेचा विजय, अधर्मावर धर्माचा विजय बघण्यासाठी साऱ्या भरत वर्षात एका योजनेला आकार दिला जात होता. याची कल्पना न रामाला होती न चक्रवर्ती सम्राट दशरथाला. राण्या पुत्रांच्या कौतुकात दंग होत्या. अयोध्या आपल्याच सुखात मग्न होती. वंचितांचे अश्रू कोणी पुसायचे? अधमांकडून भरडल्या जाणाऱ्या सज्जन शक्तीचा वाली कोण? अयोध्येतील कथित लोककल्याणकारी राज्यात सर्व समाज घटक समाधानी आहेत का? दशरथासारख्या चक्रवर्ती सम्राटाने केवळ अयोध्येत गुरफटले राहायचे का? अवती भोवती अमानवीय शक्तींनी उच्छाद मांडला असताना दशरथाला स्वतःच्या क्षात्र तेजाचे विस्मरण कसे काय होऊ शकते? अशा असंख्य प्रश्नांवर एका व्रतस्थ समूहाचे चिंतन सुरू होते. योजना आखली जात होती. कारण समग्र मानव समाजाची तशी आर्त हाक होती. मदांध असुरांचा कहर सर्वत्र माजला होता. दैत्यांच्या टाचेखाली जनता भरडली जात होती.

छोटी राज्ये आपापले अस्तित्व टिकवण्याच्या नादात असुरांना शरण जात होती. प्रतिकाराची भावना क्षीण होती. विविध वर्ण समूह कोणी एकत्र करायचे? समुद्रापल्याड असलेल्या असूरी महाशक्तीचा प्रतिकार कसा करायचा, असे सारेच प्रश्न अनाकलनीय होते.

एका पहाटे महर्षी विश्वामित्र अयोध्येच्या राजदरबारात धडकले आणि त्यांनी दशरथाजवळ थेट मागणी केली रामाची. वार्धक्याकडे झुकलेला दशरथ हळवा झाला होता. कोवळे पोर अचानक दुसऱ्याच्या हाती द्यायचे तरी कसे! ऋषीवर, आपला माझ्या पराक्रमावर विश्वास नाही का? आपण आज्ञा करा, वाटेल तो संघर्ष करण्यास हा दशरथ सिद्ध आहे. दशरथाने विश्वामित्रांची मनधरणी केली. मात्र, ते ठाम होते. त्यांना रामच हवा होता. दशरथाला आपल्या जीवनातला राम गेल्यासारखे वाटू लागले. पण नाईलाज होता. कारण समोर विश्वामित्र होते. अखेर विश्वामित्र रामाला घेऊनच अयोध्येच्या बाहेर पडले. राम कधी एकाकी नसतोच. राम आहे म्हणजे सोबत लक्ष्मण आहेच. उलट जेव्हा रामासोबत लक्ष्मण नसतो किंवा लक्ष्मणासोबत राम नसतो, तो क्षण त्यांच्या आयुष्यातील खडतर क्षण असतो. राम लक्ष्मण, राम सीता, राम हनुमान अशा असंख्य अद्वैतातच संपूर्ण राम सामावला असतो.

विश्वामित्रांसह राम लक्ष्मणांचा प्रवास सुरू होतो. हा कंटाकाकीर्ण मार्ग आहे. विश्वामित्र हा साधनेचा मार्ग आहे. खडतर तपस्येचा मार्ग आहे. ही साधना स्वतःसाठी नाही. वैयक्तिक मोक्षाचा मार्ग त्यात नाही. जगातील प्राणिमात्रांच्या कल्याणाचा ध्यास त्या साधनेत आहे. रामाला सहप्रवासी करण्याची या मुनिवरांची क्षमता आपण ओळखली पाहिजे. विश्वामित्रांचा दुर्दम्य विश्वास आहे. त्यांची निवड अचूक ठरणार! प्रयोग करण्याची वेळ नाही. कारण पुढचे पाऊल हे समुद्रापालिकडे असलेल्या महाशक्तीला आव्हान देणार आहे. पुढच्या या पावलासोबतच उमटणाऱ्या प्रतिध्वनींचा चित्कार समग्र राष्ट्राच्या कानठळ्या बसवणार आहेत. एका निर्णायक युद्धाच्या दिशेने पडलेले हे पाऊल आहे. कदाचित याची कल्पना दशरथाला असती तर त्याने वेळप्रसंगी विश्वामित्रांचाही कोप ओढवून घेतला असता. मात्र, विश्वामित्रांचे येणे आणि रामाला घेऊन जाणे हा केवळ नियतीचा खेळ नव्हता. या मागे खूप काही दडले होते. तपश्चर्येतून लाभलेल्या दिव्यदृष्टीतून आकाराला आलेली ती योजना होती.

राम लक्ष्मण पायी निघाले. विश्वामित्रांनी त्यांना समाजाचे वास्तव दाखवले. यज्ञशाळा बेचिराख झालेल्या. ऋषी मुनींच्या हाडांचे सांगाडे पडलेले. राक्षसी अत्याचारांना बळी पडलेली भयभीत जनता. ओसाड पडलेल्या वस्त्या. अयोध्येच्या अवतीभोवती अनाचार, अत्याचार माजलेला. पण दशरथाला त्याचा मागमूसही नव्हता. कारण प्रशासकीय यंत्रणा मस्तवाल झालेली. सामान्यजन नागवले जातात पण कोणालाच फिकीर नाही. राजदरबारात मखमली गादीवर रामाला हे कळले नसते. त्याची बोच त्याला जाणवली नसती. जनकल्याणासाठी सिद्ध राजा घडवायचा असेल तर त्याला जाणीव हवी. गवतावर झोपण्याची सवय असावी. कंदमुळांवर त्याचे पोट भरावे. दगडधोंड्यातून त्याला चालता आले पाहिजे. भविष्यातील महासंग्राम बिकट आहे. वर्षानुवर्षे सतत संघर्षाला सामोरे जावे लागणार. त्याला पीडितांची कणव असावी. संघटकाचे गुण परिपूर्ण असावे. अजून राम पूर्ण तयार नाही. या प्रवासात विश्वामित्र रामाला विविध दिव्यास्त्रे प्रदान करतात. शस्त्र, शास्त्र, अस्त्र अनेक विद्यांचा अभ्यास करवून घेतात. राम एकाग्रतेने सर्व ग्रहण करतो आहे. आता तो संघर्षाला सिद्ध झाला आहे. त्राटीका, मारीच, सुबाहू यांचा त्याने सहज वध केला. हे सोपे काम नव्हते. जनमानसात विश्वास निर्माण झाला. होय, राम पराक्रमी आहे. आमच्या जीवनात आता राम आला आहे!

समाजाने वाळीत टाकलेल्या अहल्येच्या उद्धारासाठी राम पुढे पाऊल टाकतो. वर्षानुवर्षे वंचितांचे जीवन जगणारी अहल्या समाज जीवनात परतवण्याचे महत्कार्य राम करतो. तो वनवासिंमध्ये रमतो. लोकांच्या सुखदुःखाशी समरस होतो. शबरी भिल्लीणीचे उष्टे बोरं खातो. त्याला वर्णाची बंधने आड येत नाहीत. जनकाने वाढवलेल्या भूमीकन्येच्या गोत्राचा, मुळाचा विचार न करता राम सीतेला अर्धांगिनी करतो. म्हणूनच राम हा शब्द विश्वास, आशा, मंगळाचे जे मंगळ यासाठी पर्यायवाचक शब्द बनतो.

चौदा वर्षांचा वनवास ही रामाच्या जीवनात शिक्षा नाही. कारण रामाने या शिक्षेला व्रतात परिवर्तित केले. संकटाचे संधीत रूपांतर करण्याचे याहून अधिक समर्पक व देखणे उदाहरण जगाच्या इतिहासात नाही. दिव्य ध्येयाच्या प्राप्तीसाठी अविश्रांत व अविचल प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. रामाला वनवासात सोडायला आलेल्या अयोध्याजनांची समजूत घालून त्यांना परत पाठवल्याच्या क्षणापासून रामाच्या धेयप्राप्तीच्या कार्याला प्रारंभ होतो. या चौदा वर्षाच्या वनवासात कुठे जावे, काय करावे, कोणाकडे पहावे, असा एकही प्रश्न रामासमोर उद्भवत नाही. पुत्र म्हणून, युवराज म्हणून, शिष्य म्हणून, बंधू म्हणून रामाने आतापर्यंत आदर्श प्रस्थापित करून टाकले आहेत. आता रामाचे जीवन कोणासाठी आहे? वल्कले परिधान केलेला राम कोणासाठी जगणार? त्याचे लक्ष्य काय? अशा असंख्य प्रश्नाचे उत्तर एकच होते. आता राम राष्ट्रासाठी जगणार. भयमुक्त समाज, सुखी समाज, दहशत मुक्त समाज हेच कार्य.

असूरी शक्तींचा नायनाट म्हणजेच खलनिर्दालन हेच लक्ष्य. जन मनगटात शक्ती आहे. मात्र, मनगटाला प्रवृत्त करणारे मन दुर्बल झालेले. भेदांच्या भिंतींमध्ये बंदिस्त झालेला समाज बलाढ्य दैत्यांसमोर उभा करायचा. अचानक राजगादीला पारख्या झालेल्या या वल्कल धारी कोवळ्या राजकुमारांवर कोण विश्वास ठेवणार! यासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक परीक्षेला तोंड द्यावे लागणार. मैत्र जिवांचे हा रामबाण मार्ग. राम नावाच्या सभ्यतेचा प्रवास सुरु झाला. मैत्री, प्रेम, करुणा, विश्वास या आधारावर जनसमूह मिळवला की मग त्यांना होणाऱ्या आक्रमणांचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज करणे. वास्तव्य काळात समग्र समाजाचे मानसिक परिवर्तन करायचे आहे.

मागे सोडलेला भूभाग, जोडलेले मित्र, ठिकठिकाणी विविध प्रयोग करणाऱ्या यज्ञशाळा, आपले वर्तमानातील वास्तव्य यात संपर्क यंत्रणा प्रस्थापित करणे. शत्रूवर पाळत ठेवणे. ठिकठिकाणी एकाचवेळी शत्रूला नामोहरम करणे. मदांध, क्रूर शत्रूचा आपल्या प्रभावक्षेत्रात शिरकाव न होऊ देणे अशा सर्व आघाड्यांवर वनवासातील प्रत्येक क्षण व्यतीत होत होता. निषाद, भिल्ल, वानर, गिद्ध या सह सर्व लढवय्या जातीसमूहांमध्ये जननी जन्मभूमीसाठी लढण्याची सिद्धता करणे. विविध भाषा, विविध बोली, विविध वेशभूषा, विविध परंपरा या सर्वांचा सुवर्णमध्य साधून सर्वांची तोंडं शत्रूच्या दिशेने उभे करणे, यात राम लक्ष्मण व सीता तिघांनाही उसंत नव्हती. भगवती सीतेच्या हरणानंतर हा संघर्ष उभा नाही झाला. उलट अधर्मावर धर्माचा विजय संपादन करण्यासाठी पहिला संघटित व सशक्त प्रयत्न झाला म्हणून सीतेला या संकटाला सामोरे जावे लागले.

समुद्रापल्याड स्वर्णमयी लंकेतील रावण, कुंभकर्ण, मेघनाथ, अहि – मही रावण या अतुलनीय, प्रचंड शस्त्रसाठा आणि सैन्यसाठा असलेल्या राक्षसांशी युद्ध हे काही अतेंद्रिय शक्तीच्या आधारे नव्हते. सागर पार करायचा म्हणून लागणारया युद्ध नौका, आवश्यकता भासल्यास सेतूबंधन अशी पूर्वतयारी. प्रतिकुलतेत प्रवाहाविरुद्ध पोहण्यासाठी लागणारी सर्व ताकद एकवटून केलेला हा शंखनाद किती कठीण असेल!

रामाने याही काळात मर्यादांचे तंतोतंत पालन केले. अन्यायाविरुद्ध लढा दिला. सुग्रीवाला राज्य परत मिळवून दिले. सज्जनशक्तीचे रक्षण केले. हनुमान, नल, निल, जाम्बुवंत, जटायू, सुग्रीव यांच्यासह एकीकडे सर्व जनजाती एका सूत्रात बांधल्या तर दुसरीकडे राष्ट्रातील सर्व ऋषीकुळांची अतूट संपर्क व्यवस्था उभी केली. निशीचर हीन करऊ मही, ही विश्वासपूर्ण प्रतिज्ञा पूर्ण केली. अशक्य ते शक्य झाले. मुकं करोती वाचालम् चा प्रत्यय समाजमनाने घेतला. खरोखरच भूवरी रावणवध झाला. आज आम्ही ज्याला रामलीला म्हणतो, ती अवतारी पुरुषाची चमत्कारी कथा नाही. ते यश आहे एका आदर्श संघटकाचे. ते यश आहे संकल्पाचे. प्रयत्नांच्या पराकाष्ठेचे. मानवी मूल्यांचे. असूरी शक्तींना गाडून टाकण्याच्या संघटित समाज मनाच्या हुंकाराचे ते यश आहे.

रामाने पुत्र, पिता, पती, बंधू म्हणून आदर्श प्रस्थापित केलेच. पण माझ्या वर्तमानाला गरज आहे, वनवासी रामाच्या ध्येयनिष्ठ जीवनाची. आजही मारीच, शुफणखा, सुबाहू, त्राटीका डोकावल्या की गरज भासते ती रामाची. म्हणूनच राम आमची राष्ट्रीय अस्मिता आहे. स्वर्णमयी लंका न मिले माँ, अवधपुरीकी धूल मिले, सोने मे काटे चुभते है, मिट्टी मे है फुल खिले, सांगणारा राम या राष्ट्राची कायम गरज राहणार आहे.

लेखक – शिवराय कुळकर्णी

(हेही वाचा – Ram Navami 2023: जाणून घ्या रामनवमीचे महत्त्व)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.