रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया… देशाची मध्यवर्ती बँक. भारतातील सर्व बँकांची वडील बँक म्हणून RBI ची ओळख आहे. देशातील असंख्य आर्थिक उलाढाली या आरबीआयच्या माध्यमातून होतात. रोजच्या व्यवहारात ज्या नोटा आणि नाणी आपण वापरतो त्या आरबीआयच्या माध्यमातूनच बाजारात येतात. पण याच आरबीआयने भारत-पाक फाळणीनंतर आपला कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानसाठी सुद्धा काम केले होते, यावर आपला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे.
(हेही वाचाः नोटांवरच्या ‘या’ छोट्या अक्षरांमध्ये दडलंय मोठं ‘गुपीत’ )
आरबीआय होती पाकिस्तानची मध्यवर्ती बँक
रिझर्व्ह बँक कायदा, 1934(RBI Act,1934) नुसार 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. त्यावेळी सध्याचे पाकिस्तान आणि पूर्वेकडील म्यानमार(ब्रह्मदेश) हे देश भारताचे अविभाज्य भाग होते. त्यामुळे तेव्हा रिझर्व्ह बँक ही अखंड भारतासाठी काम करत होती.
(हेही वाचाः रेपो रेट वाढला की सर्वसामांन्यांची कर्ज का महागतात? वाचा सोप्या शब्दांत)
1947 साली फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन वेगळे देश तयार झाले. पण तरीही ऑगस्ट 1947 ते जून 1948 असे एकूण 10 महिने भारताच्या रिझर्व्ह बँकेनं पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून काम केलं होतं. नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानमधील आर्थिक व्यवहार चालू ठेवण्यासाठी हे काम करण्यात आले. त्यानंतर स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने 1 जुलै 1948 पासून पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून कामकाज करायला सुरुवात केली.
(हेही वाचाः तुमच्या खिशातली नाणी कुठून आली आहेत, हे कसं ओळखाल? ही आहे ‘ट्रिक’)
म्यानमारसाठीही केले 10 वर्ष काम
त्याचप्रमाणे भारत आणि पाकिस्तान फाळणीच्या दहा वर्ष आधी म्हणजेच 1937 साली भारताच्या पूर्वेकडील देश म्यानमार(तेव्हाचा ब्रह्मदेश) भारतापासून वेगळा झाला होता. पण तरी एप्रिल 1947 पर्यंत आरबीआयने ब्रह्मदेशसाठी सुद्धा कामकाज केले होते. 3 एप्रिल 1948 पासून सेंट्रल बँक ऑफ म्यानमारची स्थापना झाली, तेव्हापासून ही बँक म्यानमारची मध्यवर्ती बँक म्हणून काम पाहत आहे.