सावरकरांचा इतिहास लेखनाविषयीचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ‘भारताच्या इतिहासातील सहा सोनेरी पाने’ आपला इतिहास कशाप्रकारे लिहायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा ग्रंथ. सशस्त्र क्रांतीचा केतू उभारताना सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवला आहे आणि सावरकर शिवरायांचा उल्लेख ‘हिंदूनृसिंह’ असा करतात. इतिहासाकडे पाहण्याची सावरकरांची दॄष्टी हिंदूराष्ट्रवादी होती.
सावरकर लिहितात, ‘आमच्या महाशालेय काळातच आम्ही त्या वेळच्या मराठी इतिहासाच्या विस्तृत पण विस्कळित पसार्यावर हिंदुराष्ट्र दृष्टीच्या विद्द्युल्लतेचा प्रकाशझोत टाकताच आमचे मनही अकस्मात प्रकाशमय झाले.’ सावरकरांनी जे ऐतिहासिक लेखन केलेले आहे, त्यामागचा दृष्टीकोन हाच आहे. पूर्वी हिंदुंचा इतिहास हा पराभवाचा आहे असा समज होता. सावरकरांनी आपल्या हिंदुराष्ट्राच्या दृष्टीकोनातून सर्वात आधी हा समज दूर केला आणि हिंदुंचा इतिहास शौर्याचा आहे हे अधोरेखित केले.
‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथातून त्यांनी ५७चे बंड किंवा सामान्य उठाव नसून ते स्वातंत्र्यसमर आहे हे पटवून दिले. हिंदुपदपादशाही, नेपाळी आंदोलनाचा इतिहास, सोनेरी पाने या ग्रंथात हिंदुराष्ट्रवादी दृष्टीकोन दिसतो. या स्पष्ट दृष्टीकोनामुळे सावरकरांच्या विचारांत कोणत्याही प्रकारचा गोंधळ दिसून येत नाही. म्हणूनच हिंदू-मुस्लिम ऐक्य हा सावरकरांच्या क्रांतीकार्याचा मुख्य कार्यक्रम नव्हता. या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जरी सावरकरांचा ऐतिहासिक अभ्यासाचा दृष्टीकोन हिंदुत्ववादी असला तरी त्यांनी ओढून ताणून इतिहास वळवला नाही आणि आपली मूळ बुद्धिवादाची भूमिका सोडलेली नाही. त्यांनी जी तथ्ये मांडली ती ऐतिहासिकदृष्ट्या मांडली आहेत.
इंग्रजांनी हिंदूंकडून सत्ता घेतली असली तरी सावरकरांच्या मनात इंग्रजांबद्दल त्याविषयी मत्सर वाटत नव्हता. उलट हिंदू-मराठे काही गुणांत इंग्रजांच्या तुलनेत कमी पडले हे ते स्वीकारतात. याबाबत ते इंग्रजांचे कौतुक देखील करतात. सावरकरांच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास इतिहासातील चूका आपण दुरुस्त केल्या पाहिजेत आणि आपला राजकीय सूड घेतला पाहिजे. ‘संगीत उत्तरक्रिया’ हे नाटक त्यांच्या या विचारांवर आधारित आहे. इंग्रजी सत्तेमुळे भारतीयांच्या मनात आपल्या इतिहासाविषयी खूप गैरसमज होते.
आपला इतिहास पराभवाचा आहे, आक्रमकांचा आपण प्रतिकार केला नाही. या चूका सावरकरांनी आपल्या इतिहास लेखनातून दुरुस्त केल्या आणि हिंदुंमध्ये स्वाभिमान जागवला. आजही हिंदुंविषयी असा अपप्रचार करण्यात येतो. म्हणून आजही सावरकरांचे ग्रंथ उपयुक्त ठरतात. सावरकर लिहितात, ‘हिंदूंचा इतिहास म्हणजे हिंदूंच्या पराभवाचीच काय ती जंत्री आहे. या धडधडीत असत्याचे अप्रतिकार करणे स्वराष्ट्राभिमानाच्या दॄष्टीने नव्हे, तर ऐतिहासिक सत्याच्या दृष्टीनेही अत्यंत आवश्यक आहे.’
आजच्या घडीला देखील हिंदुंवर अनेक वैचारिक आघात होत आहेत. हिंदुंचे वैचारिक, ऐतिहासिक, अध्यात्मिक, आर्थिक व राजकीय खच्चीकरण करण्याचे षडयंत्र आजही रचले जात आहे. बागेश्वर धाम ते अदानी यांच्यावरील वैचारिक हल्ला ही ताजी उदाहरणे आहेत. त्यामुळे हिंदूंनी आपली भूमिका मांडताना स्पष्टपणे सावरकरी दृष्टीकोन आत्मसात करायला हवा. आपण आपल्या इतिहासाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले तर आपले वर्तमान आणि परिणामी भविष्य उज्वल होऊ शकेल.
Join Our WhatsApp Community