Sharad Pawar : अजित पवार गटाची रणनीती, शरद पवार ‘बॉयकॉट’

184
Sharad Pawar : अजित पवार गटाची रणनीती, शरद पवार 'बॉयकॉट'
Sharad Pawar : अजित पवार गटाची रणनीती, शरद पवार 'बॉयकॉट'

सुहास शेलार

‘शरद पवार हेच आमचे दैवत’, यापासून सुरू झालेला अजित पवार गटाचा प्रवास आता शरद पवारांना ‘बॉयकॉट’ करण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. ‘परस्पर सामंजस्या’चे आवाहन मोठ्या पवारांनी धुडकावून लावल्यानंतर अजित पवार गटाने आपल्या रणनितीत बदल करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार, पक्ष कार्यालये, सभास्थळे आणि बॅनरवर यापुढे शरद पवारांचा फोटो लावला जाणार नाही. त्या जागी पवारांचे गुरू (Sharad Pawar)
स्व. यशवंतराव चव्हाण यांना स्थान दिले जाणार आहे.

४० आमदारांसह अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर काही दिवसांनी शरद पवार आपली भूमिका मान्य करतील, असा विश्वास ‘दादा’ गटाला होता, मात्र पवारांनी हेतूपुरस्सर पुतण्याला वेगळे पाडले. शरद पवारांशिवाय अजित पवार राजकारणात काहीच करू शकत नाही, असा नॅरेटीव्ह सेट केला. सहानुभूतीची लाट तयार करून कन्या सुप्रिया सुळे यांचा राजकीय प्रवास सुकर करण्याचा हेतू त्यामागे होता, मात्र काकांच्याच मुशीत घडलेले अजित पवार धोरणी निघाले. त्यांनी वेळीच सावध होत पवारांची तिरकी चाल ओळखली आणि त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवण्याचे नियोजन केले. निवडणूक आयोगात करण्यात आलेले दावे आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांतून शरदरावांना ‘बॉयकॉट’ करण्याचा निर्णयही त्याचाच एक भाग.
जवळपास ७० टक्के पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या बाजूला आहेत, याचा अंदाज घेतल्यानंतर अजित पवारांनी काकांना जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे. निवडणूक आयोगातील युक्तीवादाला चढलेली धार पाहता अजित पवार आता माघार घेणार नाहीत, हे निश्चित झाले. त्यामुळे खुद्द पवारांनी सुनावणीला हजर राहून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. आपण हजर असताना त्यांच्याकडून वैयक्तिक हल्ला केला जाणार नाही, अशी आशा पवारांना होती. परंतु, त्यांना अपेक्षित असे घडले नाही. शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरच अजित पवार गटाने आक्षेप घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाहीचा अभाव असून संघटनात्मक नियुक्त्या योग्य पद्धतीने झाल्या नाहीत, किंबहुना शरद पवार यांचीही नियुक्ती निवडणूक घेऊन करण्यात आली नाही. पक्षाच्या अंतर्गत कामात लोकशाहीचा अभाव आहे. एकच व्यक्ती पक्षावर अधिकार गाजवू शकत नाही, असा दावा करीत ‘दादा’ गटाने शरद पवारांच्या कार्यशैलीवरच आक्षेप नोंदवला.
त्यामुळे भेदरलेल्या पवारांनी पक्ष आणि चिन्ह हातातून जाण्याआधी दसऱ्याला मेळावा घेण्याची घोषणा केली. निवडणूक आयोगातील दाव्यांना ते या मेळाव्यातून उत्तर देणार आहेत. या माध्यमातून जनतेचा पाठिंबा आणि सहानुभूती मिळवण्याची त्यांची योजना आहे. मात्र, काकांचा डाव हाणून पाडण्यासाठी अजित पवारही मैदानात उतरणार असून, दसऱ्यानंतर ते राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. या दौऱ्यावेळी झळकावण्यात येणाऱ्या पोस्टर आणि फलकांमध्ये शरद पवारांऐवजी त्यांचे गुरू यशवंतराव चव्हाण प्रामुख्याने दिसतील. राष्ट्रवादीतील एकाधिकारशाही, २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपासोबत शरद पवारांनी केलेला छुपा समझोता, सरकारमध्ये सामिल होण्यासाठीच्या पत्रावर कोणकोणत्या आमदारांनी (सध्या शरद पवारांसोबत असलेल्या) सह्या केल्या होत्या, याबाबत अजित पवार उघडपणे भाष्य करतील, अशी माहिती राष्ट्रवादीतील एका वरिष्ठ नेत्याने दिली.

(हेही वाचा : Sharad Pawar : ‘आपले अध्यक्ष कधीच तुरुंगात गेले नाही आणि..’ शरद पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल)

पवारांचा नावडता ‘पार्थ’ आता पुणे आणि बारामती सांभाळणार

  • २०१९ च्या लोकसभेला अजित पवारांचे सुपुत्र पार्थ यांना उमेदवारी देताना शरद पवार यांनी विरोधी भूमिका घेतली होती; परंतु अजित पवारांनी हट्टाने पार्थसाठी उमेदवारी मागून घेतली. त्याचा राग आल्याने पवारांनी पार्थच्या पराभवासाठी विशेष मेहनत घेतली. याउलट रोहित पवारांना त्यांनी पक्षात महत्त्वाचे स्थान दिले. अजित पवारांच्या जागी रोहितला संधी देऊन सुप्रियाच्या हातात पक्षाची कमान देण्याचा त्यांचा इरादा होता. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर त्यांच्या इराद्यांवर पाणी फेरले गेले.
  •  आता शरदरावांचा नावडता पार्थ पुणे आणि बारामतीची कमान सांभाळणार आहे. येथील पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी पार्थवर देण्यात आली आहे. त्याच्या दिमतीला दादांनी आपली काही विश्वासू माणसे दिली आहेत. लेकाचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी अजित पवारांनी ३२ वर्षांच्या जबाबदारीचा त्याग केला असून, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी पार्थची वर्णी लावली जाणार आहे.
  •  बारामती तालुका ‘अ’ वर्ग मतदारसंघातून पार्थ पवार जिल्हा बँकेसाठी निवडणूक लढवणार आहे. येथे अजित पवारांचा होल्ड असल्यामुळे त्याला कोणतीही अडचण येणार नाही. त्यानंतर संचालक मंडळ मतदानाद्वारे पार्थची संचालकपदी निवड करतील. या माध्यमातून शरद पवारांना शह देण्यासह भविष्यात सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे कळते.

आता परतीचे दोर कापले – जयंत पाटील
शरद पवार आपला पक्ष वाचवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन बसतात, यातच सगळेच आले. आता परतीचे दोर कापण्यात आले आहेत. महाराष्ट्रात शरद पवारांचा करिष्मा, त्यांची ताकद, जनतेच्या मनातील आदराचे स्थान हेच आमचे भांडवल आहे. आज निवडणूक आयोगाच्या दारात आमची लढाई सुरू आहे. त्या सुनावणीत शरद पवारांच्या कार्यशैलीवर भाष्य केले जात आहे. २५ वर्षे शरद पवारांच्या कार्यशैलीमुळेच यांना पदे मिळाली, हे मंत्री झाले, वेगवेगळ्या पदांवर पोहचले. आज २५ वर्षांनंतर त्यांच्याच कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करता, मग २५ वर्षे तुम्हाला त्यांच्या कार्यशैलीमुळे संधी मिळाली त्याचे काय, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.