देशभक्त श्यामजी कृष्ण वर्मा (Shyamji Krishna Varma) यांनी ‘इंडियन सोशियालॉजीस्ट’ पत्र काढले. हिंदुस्थानातील लोकांना त्यांच्या विषयीची माहिती मिळवावी, अशी उत्कंठा असेल म्हणून त्यांच्या व्यक्तीविषयक चरित्राबद्दल थोडीशी माहिती दिल्यास ती आपल्या वाचकांना शिक्षणप्रद झाल्यावाचून राहणार नाही. यासाठी हा लेखप्रंपच –
देशभक्त श्यामजी हे आपल्या विद्यार्थीदशेत असतानाच संस्कृत भाषेमध्ये फार प्रवीण झाले होते. त्यांच्या त्या गीर्वाण भाषा नैपुण्यावर लुब्ध होऊन श्री दयानंद स्वामी यांची त्यांच्यावर इतकी मर्जी बसली की, त्यांनी श्यामजींना जवळजवळ पट्टशिष्यच बनविले होते. निरनिराळ्या संस्कृत पंडितांशी वादविवादाचा प्रसंग आला म्हणजे श्री दयानंदांनी प्रथम आपल्या लाडक्या शिष्यांकडून त्यांचे खंडन करावे व मग जरूर लागल्यास स्वतः शस्त्र उपसावे. श्री दयानंदांच्या सहवासाने देशभक्त श्यामजींचे गीर्वाण-वाणीप्राबल्य इतके वाढले की, धर्मोपदेशकांचे व्रत घेऊन ते हिंदुस्थानभर संस्कृत भाषेत भाषणे करीत हिंडू लागले. पुणे, नाशिक, कलकत्ता वगैरेसारख्या संस्कृत विद्येच्या आद्यपीठस्थानी जाऊन देशभक्त श्यामजींनी आपल्या अस्खलित, मधुर व युक्तिप्रचुर भाषणांनी त्यावेळच्या जुन्या व नव्या विद्वानांवर आपल्री पूर्ण छाप बसविली होती. कै. कृष्णशास्त्री चिपळूणकर, रानडे वगैरे विद्वानांनीही पंडितांचा लौकिक व त्यांची विद्वत्ता यांची फार वाखाणणी करावी. श्री स्वामी दयानंद यांच्या आर्य समाजातर्फे हे धर्मोपदेशकांचे काम अधिकार युक्तत्वाने बजावीत असता पं. श्यामजींची संस्कृत भाषा नैपुण्याची किर्ती दूवीपान्तरीही जाऊन धडकली होती. दयानंदांच्या अनुमतीने व शिफारशीने त्यांची केंब्रिज कॉलेजच्या संस्कृताध्यापकत्वाच्या जागेवर नेमणूक होऊन ते इंग्लंडमध्ये आले. त्या वेळेस या तरुण हिंदी प्रोफेसरास संस्कृत भाषेचे शिक्षण देताना केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या व्यासपीठावर पाहून कित्येक इंग्रजांस फार चमत्कार वाटे व ते पंडितजींच्या कर्तृत्वाबद्दल फार धन्यवाद गात; परंतु त्या वेळेस कौतुकास्पद झालेले पंडित श्यामजी एकाएकी इंग्लिशांच्या नापसंतीला उतरून आज दोषास्पद झालेले आहेत! कारण त्या वेळेस जे “पंडित श्यामजी” होते ते आज ‘देशभक्त श्यामजी” आहेत! इंग्रजांच्या रक्तात औदार्य व निःपक्षपात हे गुण सदोदित खेळत असतात, असे वाटणाऱ्या मूर्ख लोकांनी हे उदाहरण सदोदित ध्यानात बाळगावे. पंडितजींची त्या वेळची विद्वत्ता व आजची विद्वत्ता यात जर काही भेद असला तर तो अधिकत्वातच आहे; परंतु इंग्रजांची प्रीतीही वरवर वाटते तशी खरोखर सद्गुणसंपन्नतेवर नसून त्यांच्या दास्यलोलुपत्वावर असते.
जोपर्यंत तुम्ही त्यांची गुलामगिरी करण्यास कंटाळले आहात हे त्यांच्या नजरेस आले नाही तोपर्यंत ते तुमच्या संस्कृतप्रावीण्याची स्तुती करतील व तुमच्या वक्तृत्वाची तारीफ करतील परंतु हे सर्व त्यांच्या जोखडाला मान देण्यास तयार आहात तोपर्यंत! गाडी सुरळीतपणे ओढीत आहेत तोपर्यंत गाडीवाल आपल्या बैलांना कुरवाळतो, थोपटतो, त्यांची स्तुती करतो परंतु बैलाने जरा मान चोरण्यास आरंभ केला की, त्याचे इतर सद्गुण एका क्षणात दुर्गुण होऊन त्यांच्या पाठीवर गाडीवानाचे चाबूक उडू लागतात! फक्त नवल हे की, मानवी बैलांना हे रहस्य अजून कळू नये व त्याने आपल्या पाठीवर चाबूक उडविणाऱ्यास निःपक्षपाती म्हणून संबोधू लागावे! पंडित श्यामजींनी अध्यापकत्व करीत असतानाच तेथील एम् .ए.ची पदवी घेतली व बॅरिस्टरची परीक्षाही दिली. नंतर ते हिंदुस्थानात परत गेले व रतलाम, उदेपूर वगैरे कित्येक संस्थानात दिवाणगिरीची कामे करून काही दिवस बॅरिस्टरीचे कामही करीत होते. ते काठेवाडात दिवाण असता त्यांच्याच शिफारशीने तेथे आलेला एक गोरा आपल्या जातिस्वभावास अनुसरून त्यांच्यावरच कित्येक आरोप आणू लागला. त्या संस्थानातच नव्हे, तर कोणत्याही संस्थानात काम करण्यास ते नालायक आहेत असे सिद्ध करण्याचा मेक्यानकी नावाच्या फिरंग्याने घाट घातलेला पाहून देशभक्त श्यामजींनी त्यांचे खरे स्वरूप उघड करण्यास आरंभ केला. हिंदुस्थान सरकारपर्यंत ते भांडण जाऊन देशभक्त श्यामजी पूर्ण रीतीने निर्दोष होऊन बाहेर आले. नंतर त्यास उदेपूरच्या महाराजांनी पुन्हा दिवाणगिरीची वस्त्रे दिली. हे काम काही दिवस केल्यानंतर देशभक्त श्यामजी हे इंग्लंडात आले व प्रसिद्ध तत्त्वज्ञानी हर्बट स्पेन्सर यांच्या ग्रंथाध्ययात कालक्रमण करू लागले. त्यावेळेस त्यांच्या मनात हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यप्राप्तीबद्दल जबरदस्त उत्कंठा उत्पन्न होऊन त्यांना आपल्या राष्ट्राच्या दास्याची शरम वाटू लागली. रात्रंदिवस हिंदुस्थान व त्याचे स्वातंत्र्य याची तळमळ लागलेल्या या स्वदेशभक्ताने अखेर १९०५ च्या जानेवारी महिन्यात आपल्या राजकीय चरित्राला आरंभ केला व हिंदुस्थानातील राजकीय वातावरणात ज्याने महत्त्वाचा फरक पाडलेला आहे त्या ‘इंडियन सोशियोलॉजिस्ट’ मासिक पत्रकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
देशभक्त श्यामजींच्या प्रयत्नांचे विशिष्टत्त्व हे आहे की, प्रथमपासूनच त्यांनी स्वराज्याचे निशाण उभारलेले आहे. इंग्लंडच्या गुलामगिरीला पूर्णपणे झुगारून देऊन हिंदुभूमी सर्वांग स्वतंत्र झाल्याशिवाय तिचा उद्धार होणे अशक्य आहे, हे राजकीय सत्य निर्भेळ रीतीने व सुप्रसिद्धपणे उपदेशिण्याचे प्रथम श्रेय ज्या थोड्या महात्म्यांना आहे त्यात दे. श्यामजींची गणना आहे. ‘इंडियन सोशियालॉजिस्ट’ पत्राबरोबरच त्यांनी ‘होमरुल सोसायटी” स्थापन केली. त्या सोसायटीचे मुख्याध्यक्षत्व श्यामजींकडे आहे व त्यांचेकडे आहे म्हणून त्या सोसायटीची स्वातंत्र्यप्रीती व स्वराज्यनिष्ठा जाज्वल्य रीतीने कायम आहे. इंग्लंडमध्ये इंग्रजांच्या व विशेषतः मानभावी इंग्रजांच्या दाबाखाली चाललेल्या हिंदी चळवळीचा धिक्कार करून स्वतंत्र व म्हणूनच खरी हिंदी चळवळ इंग्लंडमध्ये प्रथमतः देशभक्त श्यामजींनी सुरू केल्यापासून हिंदी राजकारणाची दुसरी व सत्य बाजू जगाच्या निदर्शनास येऊ लागली. हेन्री कॉटनला वंशपरंपरेने संपादकत्व देणारे इंडिया व स्वराज्याची पवित्र पताका उभारणारे ‘इंडियन सोशियालॉजिस्ट’ आणि हिंदुस्थानच्या गुलामगिरीवर पोसलेल्या कॉटन वेडरबर्नच्या मुठीतील ब्रिटिश काँग्रेस कमिटी व स्वदेशाचे स्वातंत्र्य संपादण्यासाठी जन्म घेणारी व केवळ हिंदी लोकांनीच चालविलेली होमरुल सोसायटी, या दुकल्रीतील ध्रुवविरोधावरून हिंदुस्थानच्या राजकारणाचे स्वरूप दे. श्यामजींनी कसे बदलून टाकले हे सर्वांच्या ध्यानी येईल.
याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे येणाऱ्या हिंदी विद्यार्थ्यांचे मनःसंक्रमण ही होय. आजपर्यंत जे जे हिंदी तरुण इकडे आले ते ते नेमस्तांच्या अमलाखाली ‘ब्रिटिश न्यायबुद्धी व नेभळेपणा’ शिकून परत जात व हिंदुस्थानात इंग्लंडच्या लोकांबद्दल अद्वातद्वा स्तुतिस्तोत्रे गाऊन लोकांना भिक्षांदेहीकडे नेत; परंतु आता देशभक्त श्यामजींच्या ‘सोसायटी’ ने व मासिक पत्राने मानभावी कॉटनाची कृत्ये कळू लागतात व ते स्वराज्यनिष्ठ होऊन स्वदेश स्वातंत्र्यार्थ प्रयत्न करू लागतात. या विद्यार्थ्यांच्या मनःसंक्रमणासाठी श्यामजींनी काढलेल्या ‘इंडिया हाऊस” या संस्थेची उपयुक्तता फार आहे. या इंडिया हाऊस चा इंग्रजांना इतका वचक बसला आहे की, एखाद्या लायब्ररीत वगैरे हा इंडिया हाऊसचा पत्ता दिला की एखादा अँग्लो-इंडियन चटकन् विचारतो की, ‘Then you belong to the Revolutionary Party!’ मग आपण राज्य क्रांतिकारक असालच! या लहानशा प्रसंगावरूनही देशभक्त श्यामजींची इंग्रजांना किती दहशत बसली आहे हे दिसून येईल. या निरनिराळ्या संस्था काढून इंग्लंडात स्वातंत्र्याचे उपदेश केंद्र काढल्यानंतर देशभक्त श्याम्जीनी तरुण लोकांस स्वतंत्र देशात राहून स्वातंत्र्याची प्रत्यक्ष महती कळावी म्हणून ‘ल्लरेक्चर शिप्स” ठेवल्या व प्रत्येकी २००० रुपयांच्या ‘राजा प्रतापसिंह’, ‘शिवाजी’, ‘अकबर’, ‘दयानंद’ फेलोशिपही दिल्या. या कामी त्यांना बॅरिस्टर राणा ह्या स्वातंत्र्यनिष्ठाचे फार साह्य झाले. देशभक्त श्यामजी येथेच थांबले नाहीत. हिंदुस्थान स्वतंत्र कसे करावयाचे हा जितका महत्त्वाचा मुद्दा आहे तितकाच स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानात स्वराज्य रचना कशी ठेवावी हा मुद्दाही महत्त्वाचा असल्यामुळे त्या विषयावर एक उत्तम व विद्वत्तायुक्त निबंध जो लिहील त्यास रु. ७५० चे बक्षिसही त्यांनी लावलेले आहे. त्या बक्षिसाची जाहिरात येऊन पुरे दोन महिनेही झाले नाहीत तोच परवा होमरुल सोसायटीच्या द्वितीय वार्षिक संमेलनाच्या प्रसंगी हिंदुस्थानात स्वराज्योपदेशक प्रांतोप्रांती धाडण्यासाठी त्यांनी १०,००० रुपये दिल्याचे जाहीर केले. स्वराज्याचा उपदेश करीत सर्व हिंदुस्थानभर संचार करण्यास जे राजकीय संन्यासी तयार होतील त्यांना १०,००० रुपयांतून साहाय्य होणार आहे. स्वराज्याची उदात्त कल्पना प्रथम प्रभू रामदासांच्या व श्री शिवछत्रपतींच्या मनात व तरवारीत प्रादुर्भूत झाली. ‘स्वराज्य’ हा शब्द प्रथम छत्रपतींनी महाराष्ट्र देशात रुढविला. त्या वेळेपासून या पवित्र तेजोमय शब्दाने मराठ्यांचा जरीपटका अटकेपर्यंत नेला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात स्वराज्य व सरदेशमुखी या ओजस्वी शब्दद्वायाचा शिक्का प्रत्येक पानावर व ओळीवर पडलेला आहे. महाराष्ट्राच्या अंगात चैतन्य ओतणारा तोच हा ‘स्वराज्य’ शब्द आता हिंदुस्थानात फिरून दुमदुमू लागला आहे. हा ऐतिहासिक तेजाने दीप्तिमान झालेला शब्द, हा शिवछत्रपतींनी उच्चारलेला शब्द- सर्व हिंदुस्थानाचे अंतिम लक्ष्य म्हणून आता समुद्रवलयांकित भरतखंडाचे कंठातून ध्वनित होत आहे. नकळत का होईना; परंतु ज्या क्षणी दादाभाईंनी हा शब्द राष्ट्रीयसभेच्या अध्यक्षपीठावरून तीस कोटी लोकांचे अंतिम लक्ष्य म्हणून उच्चारला तो क्षण खरोखरीच दैविक होय! आता पूर्व परंपरागत व ऐतिहासिक स्मृतिपूर्ण ‘स्वराज्या’ चा ‘सरदेशमुखी’ चा हक्क आर्यभूपासून दूर ठेवण्याची कोणाची छाती आहे? स्वराज्याच्या झेंड्याखाली सर्व हिंदुस्थान जमू लागले आहे व तो जमाव लवकर व्हावा म्हणून स्वराज्योपदेशक धाडण्यासाठी १०,००० रुपये देशभक्त श्यामजींनी दिले आहेत; कारण त्यांची अत्यंत उत्कट इच्छा आहे की, ‘मी माझ्या डोळ्यादेखत माझे परमप्रिय हिंदुस्थान स्वतंत्र व स्वराज्ययुक्त झालेले पहावे!
देशभक्त श्यामजी! तुम्ही आपल्या भाषणाच्या शेवटी दर्शविलेली ही इच्छा शीघ्र फलदायी होवो! त्या स्वराज्यासाठी ३० कोटी आत्मे तळमळत! तीस कोटी मने झुरणीस लागोत! विशेषतः त्या स्वराज्यासाठी ६० कोटी हात कार्यास लागोत!
हेही पहा –
Join Our WhatsApp Community