मुलांच्या लसीकरणाला सहा महिन्यांचा अवधी! नवीन शैक्षणिक वर्षही विनाशाळेचे जाईल!

लहान मुलांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी चाचण्या सुरु झाल्या आहेत. त्या पूर्ण करू लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार होऊन ती बाजारात येण्यासाठी ६ महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शिक्षणाचा अक्षरशः खेळखंडोबा केला आहे. मागील दीड वर्षे शाळा बंद आहेत. राज्य सरकारने सुरुवातीला १ली ते ९वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी १०वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून त्यांचा निकाल शैक्षणिक मूल्यांकनाद्वारे घेण्याचा निर्णय घेतला. सध्या हे प्रकरण उच्च न्यायायलात गेले आहे. तरीही १०वीची परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम आहे. अशा प्रकारे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने कसेबसे मागील वर्षीच्या शैक्षणिक वर्षाचा हिशेब केला असला, तरी नवीन शैक्षणिक वर्षालाही कोरोनाचे ग्रहण लागणार आहे. नेमके जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे आणि मुलांसाठीची लस यायला अजून सहा महिने लागणार आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून सुरु होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात शाळांची घंटा वाजणार नाही, हे निश्चित आहे.

जोवर मुलांचे लसीकरण होत नाही तोवर सरकारच शाळा सुरु करणार नाही, त्यामुळे शाळांचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच मागील वर्षांपासून शाळा बंद होत्या. त्या काळात शाळांची ऑनलाईन वर्ग घेण्याची यंत्रणा तयार आहे. त्यामुळे तसेही शाळांना काही अडचणी येणार नाही. फक्त पालकांनी मुलांचे नवीन वर्षाचे प्रवेश शाळांना संपर्क करून निश्चित करावेत.
– अशोक साळवे, अध्यक्ष, होली रोझ इंग्लिश स्कूल.

तिसरी लाट मुलांसाठी घातक! 

केंद्र सरकारने आतापासूनच राज्यांना तिसरी लाट येणार आहे, असे सूचित केले आहे. आणि त्यामध्ये सर्वाधिक लहान मुलांना लागण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशा वेळी मुलांची प्रतिकारक्षमता कमी असते. त्यामुळे त्यांना गृहीत धरून चालणार नाही, म्हणून सरकारला जून महिन्यात नवे शैक्षणिक वर्ष सुरु करता येऊ शकणार नाही. अन्यथा शाळाच तिसऱ्या लाटेत कोरोनाच्या हॉटस्पॉट ठरतील, अशी भीती पालक वर्गामध्ये व्यक्त होत आहे.

(हेही वाचा : अमेरिकेच्या नागरिकांना गायींच्या सहवासात मिळते मनःशांती! तासाला २०० डॉलर मोजतात! )

लसीकरणाला ६ महिन्यांचा अवकाश! 

लहान मुलांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी आता कुठे चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. भारत बायोटेक यासाठी चाचण्या करणार आहे. या चाचण्या पूर्ण करून लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार होऊन ती बाजारात येण्यासाठी ६ महिन्यांचा अवधी लागणार आहे. या दरम्यान शाळा सुरु केल्या, तर पालकच मुलांना शाळेत पाठवणार नाहीत. जोवर लस येणार नाही, तोवर मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता पालकांची होणार नाही.

कोरोनामध्ये मुलांच्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. सध्याची स्थिती पाहता कोरोना अजून गेलेला नाही, त्यातच पुढच्या महिन्यात नवे शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे, अशा वेळी माझे व्यक्तीगत मत आहे कि, शासनाने अजून तरी ४-५ महिने शाळा सुरु करू नयेत. शेवटी मुलांचा जीव अधिक महत्वाचा आहे.
– डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, माजी उपाध्यक्ष, राष्ट्रीय बालरोग तज्ज्ञ संघटना.

लहान मुले सर्वाधिक कोरोना सुपरस्प्रेडर! 

लहान मुलांना कोरोना झाल्यावर बहुतांश मुलांमध्ये लक्षणे जाणवत नाहीत, असे दिसून आले आहे. त्यामुळे मुले कोरोनाचे सुपर स्प्रेडर आहेत, असा माझा अनुभव आहे. सरकारनेही यासाठी त्रिसूत्री कार्यक्रम राबवला पाहिजे, यामध्ये समाजात जनजागृती करणे, आरोग्य सेवक, आशा वर्कर यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना लहान मुलांच्या आरोग्याविषयी प्रशिक्षण देणे या त्रिसूत्रीचा अवलंब केला, तरच आपण ग्रामीण भागात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना सुरक्षित ठेवू शकतो, असे राष्ट्रीय बालरोग तज्ज्ञ संघटनेचे माजी उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर दाभाडकर म्हणाले.

(हेही वाचा : कोरोना ‘मेड इन चायना’! जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल! )

कोरोनाची औषधे सहन करण्याची क्षमता नाही! 

कोरोनावर औषधे ही अँटिबायोटिक असतात. त्यात स्टिरॉईड असते. ही औषधे मोठ्यांना सहन होत नाहीत, तिथे लहान मुलांना कुठून सहन होणार. त्यामुळे शाळा सुरु करून लहान मुलांना याचा संसर्ग वाढवून त्यामध्ये मृत्यू दर वाढवण्याऐवजी आधी मुलांना कोरोनापासून प्रोटेक्शन देणे केव्हाव्ही चांगले, असे तज्ज्ञांचे मत आहे.

सध्या मुलांना कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसीचा आग्रह धरण्याबरोबर आधी पालकांनी मुलांना अन्य आजारावरील लसी देऊन त्यांची प्रतिकारक्षमता वाढवणे गरजेची आहे. हगवण आणि सर्दी-ताप-खोकला याकरता एन्फ्लून्झा सारख्या लसी आहेत, निदान त्या लसी देऊन तरी मुलांना सुरक्षित करावे. त्यामुळे किमान या आजारांचा संसर्ग होणार नाही.
– डॉ. कल्पना शेट्ये, बालरोग तज्ज्ञ.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here