माझा कचरा – माझी जबाबदारी!

घरातील कचरा भिंती पलीकडे किंवा रस्त्यापलिकडे टाकला म्हणजे प्रश्न सुटला, असे नव्हे. त्यातून पसरणारी दुर्गंधी घरापर्यंत पोहचतेच.

641

स्वच्छ भारत मोहीम म्हणजे काय? केंद्र आणि राज्य सरकारने राबवायला घेतलेला एक अत्युत्तम उपक्रम. इथे कदाचित आपण सामान्य नागरिक म्हणून घाण करायची आणि प्रशासनाने साफ करायची, असे बहुतेक अभिप्रेत आहे. बऱ्याच (सन्माननीय अपवाद वगळून) अशा लोकांकरता हा पत्रप्रपंच.

सन्मानीय सामान्य माणूस,
साष्टांग नमस्कार!

तुझी दुःखे अनंत आहेत, तू केंद्रस्थानी असून दुर्लक्षित आहेस हे मान्य आहे. जमा-खर्चाचे तुझे गणित कधीच बसत नाही. त्यात अजून कोरोनाने तुझी पाठ मोडली आहे, इत्यादी इत्यादी…थोडक्यात तुझे रडणे 1947 पासून चालू आहे, ते चालूच राहणार आहे. तुझे स्वातंत्र्य तुझ्या जगाच्या निरोपाच्या दिवशीच ठरलेले आहे. बहुतांशी राजकारणी आणि संधीसाधूंनी खाण्यासाठी तुला जागाच ठेवली नाही. मूठभर अशा नकारात्मक लोकांनी जग व्यापले आहे, हे खरे आहे. त्यांच्या दहा पिढ्या जगतील इतकी कमाई त्यांच्याकडे आहे आणि तुला उद्याची भ्रांत आहे. म्हणून तू नाउमेद व्हायचे का? माझे म्हणणे आहे नाउमेद व्ह्यायचे नाही! ह्या नकारात्मक जगात तुझ्याकडून एक अपेक्षा आहे ती पुरी कर, अशी विनंती आहे. त्यात तुझे भले आहे. विषय आहे घनकचरा व्यवस्थापन. तू म्हणशील, अरे जगायला काय आता हाच विषय उरला आहे का? तर माझे म्हणणे आहे…सुदृढ आरोग्यासाठी हो!

(हेही वाचा : शून्य सांडपाणी व्यवस्थापन…आणि बरेच काही!)

घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय?

गावातील एकट्या दुकट्या घरासाठी आज हा शिस्तीचा आणि स्वयं व्यवस्थेचा भाग आहे. ते अगदी शिस्तीने आपले कचरा व्यवस्थापन करतात. ह्या बाबतीत शेतकरी तर सांगायलाच नको इतका जबाबदार आहे. असे काही अजून घटक आहेत त्यांना घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय हे काही सांगणे नको. अशा मंडळींकडून आपण शिकायला हवे. दुसरी बाजू लक्षात घे, घन कचऱ्याची मुख्य समस्या आहे ती गावठाण भागातील गाववस्तीची आणि त्याहून मोठा प्रॉब्लेम आहे शहरी वस्तीचा (इथे प्रॉब्लेम हा समस्येपेक्षा मोठा आहे.). कचरा ‘घाण’ झाला ह्याचे मुख्य कारण म्हणजे प्लास्टिक. त्याला सर्वप्रथम आपल्या आयुष्यातून किमान पातळीवर आणा. पुनर्वापर न करू शकणारे प्लास्टिक पूर्ण बंद करा. तुम्ही अर्धी लढाई इथेच जिंकाल. घनकचरा म्हणजे निव्वळ शिस्त आहे. ओला-सुका वेगळा केला, तर प्रशासनाचा भार 80 ते 90 टक्क्याने कमी होईल. ‘पण आपल्याला काय’, असे म्हणत किंवा ‘आम्ही कर भरतो सो प्रशासन बघून घेईल’, कचऱ्याचे असे विचार कृपया आता सोडा. आपली घाण आपली जबाबदारी आहे आणि ज्याला आपण घाण बनवतो ती आपणच करत असतो. घरातील शौचालय तुम्ही स्वीकारले ना! ते शौचघर साफ करतात ना, तसेच घनकचरा व्यवस्थापन पण आपण स्वीकारायला हवे. तुम्ही म्हणाल मी ज्ञान देतो पण असे नव्हे, आपले पूर्वज म्हणजे अगदी एक-दोन पिढ्या अगोदर प्रत्येक जण स्वतःचा कचरा स्वतः व्यवस्थापन करायचा. मग आता काय झाले? ह्या सर्वांस लोकसंख्या आणि त्यातून तयार झालेले शहरीकरण कारणीभूत आहे हे मान्य आहे, पण प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारल्यास हा प्रश्न लवकर सुटेल. तू फक्त ओला-सुका वेगळा कर, समस्या दूर होईल ह्याची खात्री आहे.

सामान्य माणसा, तुझे आरोग्य बऱ्याचदा प्रत्यक्षपणे घाण दुर्गंधीशी जोडले गेलेले आहे. घरातील कचरा भिंती पलीकडे किंवा रस्त्यापलिकडे टाकला म्हणजे प्रश्न सुटला, असे नव्हे. त्यातून पसरणारी दुर्गंधी घरापर्यंत पोहचतेच. तेथे तयार झालेल्या मच्छर, माश्या सहज तुमचाही घास घ्यायची तयारी ठेऊन असतात. थोडक्यात घाण आणि दुर्गंधीला सीमा नाहीत.

(हेही वाचा : फाटके कोण? शेतकरी कि समाजमन??)

कचरा व्यवस्थापन म्हणजे काय?

  • मुळात कचराच कमी तयार होईल, अशी जीवनशैली असावी.
  • कचरा जरी तयार झाला, तरी तो विघटन होणारा किवा रिसायकल होणारा असावा.
  • पुनर्वापर न होणारे प्लास्टिक पूर्णतः बंद करावे. दुकानदार, मटण-कोंबडी तथा भाजी विक्रेत्याने काळी-पिवळी पिशवी दिल्यास स्वतःहून नाकारावी. अर्थात अपेक्षित आहे विक्रेत्याने किमान मायक्रोनच्या पिशव्या वापरू नयेत.
  • ओला-सुका कचरा वेगळा करावा.
  • ओला कचरा व्यवस्थापन स्वतःच्या पातळीवर शक्यतोवर करावे.
  • ओला कचरा व्यवस्थापन कचरा जर प्रशासन करीत असेल, तर शास्त्रोक्त पद्धती वापरावी.
  • ओला कचरा व्यवस्थापन केंद्रावर वाहतूक करताना ओला आणि सुका कचरा वेगळा नेण्यात यावा.
  • कचरा, प्लास्टिक पेटवू नका.
  • कचरा व्यवस्थापन शक्यतो नैसर्गिक पद्धतीवर आधारित असावे.
  • कचरा नियोजन करताना अधिकचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी.

(हेही वाचा : कोरोना काळातील ‘अनावश्यक चिंतना’चा मानसिक आजार आणि उपाय!)

एक ना अनेक नियमावली आहेत. या नियमावली न संपणाऱ्या पण स्वयंशिस्तीच्या जास्त आणि प्रशासकीय पातळीवरील कमी आहेत. नैसर्गिक प्रक्रियेवर आधारित भर असावा, हे अपेक्षित आहे. बरीच भुते मार्केटमध्ये फिरतात आणि म्हणतात आमच्याकडे असे मशीन आहे ’24 ते 72 तासांत कचऱ्यापासून खत बनवतो’. अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. इलेक्ट्रिक मशीनमध्ये कचरा टाकून फक्त राख होऊ शकते आणि प्रदूषण निर्मिती होऊ शकते. जे चुकीचे आहे ते टाळा. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी किमान 30-45 दिवस किंवा इतर पद्धतीने अधिक दिवस लागू शकतात. कचरा खत प्रकल्प म्हणून काही लोक खड्डे मारून मोठाल्या टाक्या बांधून उकीरडा तयार करण्यात आणि धन्यता मानतात ते सुद्धा चुकीचे आहे. नैसर्गिक प्रक्रिया असावी, पण शास्त्रोक्त असावी. गावचे शहरीकरण होताना कचरा-ढिगारा ही कीड गावाकडे सरकतेय. शहराचे मोठाले कचऱ्याचे ढिगारे गावात होणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. शहरात नियमानुसार ओला घनकचारा व्यवस्थापनासाठी प्रत्येक बिल्डिंगमध्ये व्यवस्था केलेली असते. शहरी बाबू, तुम्ही वापरतात का, ही कचऱ्यापासून खत निर्मिती पद्धती? अपवादात्मक पातळीवर होत असेल, पण सर्वत्र बाकी आनंदी आनंद आहे. कोंबडी दाखवायला पाळायची, पण घाण नको, असा कारभार आणि अंडी या विषयावर चर्चा करायची, अशी तऱ्हा आहे.

ही न संपणारी गोष्ट आहे. सर्व नकारात्मक बाबी जाऊ द्या, सकारात्मक विचार रुजविण्यासाठी काम करा. सामान्य माणसा ‘माझा कचरा आणि कमी कचरा’ असा विचार प्रबळ कर! घन कचरा व्यवस्थापन सहज शक्य आहे. आजच्या लहान पिढीला जाण आहे. त्यांचे ऐका. फक्त वेंगुर्ला, कर्जतच्या स्वच्छ पॅटर्नची चर्चा नको…तो पॅटर्न राबवणारे नागरिक ग्रेट आहेत. त्यांचा कप्तान म्हणजे आधुनिक प्रशासकीय निसर्ग संत, रामदास कोकरे हे तर महानच आहेत. त्यांचा आदर्श ठेऊन आपणही वाटचाल करूया. स्वच्छ भारत मोहीम सहज शक्य आहे…सुरुवात स्वतःपासून करूया.

(समस्त खाजगी आणि सरकारी स्वच्छता कर्मचारी/सेवक तसेच चांगल्या प्रकारे घनकचरा व्यवस्थापन करणारे अनेक डोकी आणि हात आहेत त्या सर्वांचे आभार!)

(हेही वाचा : केरळचा ‘1 टक्का डोसिंग पॅटर्न’!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.