कुणी लस देता का हो लस…असे म्हणण्याची वेळ सध्या महाराष्ट्रावर आली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. लसीच्या तुटवड्यामुळे आज महाराष्ट्रात ५० हून अधिक लसीकरणाची केंद्रे बंद पडली आहेत. मुंबईतील ७२ केंद्रांपैकी ३० हून अधिक केंद्र बंद झाली आहेत. त्यात राज्यात कोरोना रुग्णाचे प्रमाण देखील वाढू लागले आहेत. आता तर हे आकडे रोज 60 हजारच्या घरात पोहोचले आहेत. आधीच मागील लॉकडाऊनमुळे जनता हैराण झालेली असताना आता पुन्हा लॉकडाऊनचे संकेत मिळत असताना पुन्हा लॉकडाऊन नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्य जनतेवर आली आहे. मात्र राज्यात इतके मोठे संकट असताना देखील राजकारण काही थांबलेले नाही. कधी विरोधक, तर कधी सत्ताधारी यांच्याकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत. आता तर या वादात केंद्राच्या मंत्र्यांनी देखील उडी घेतली आहे. त्यामुळे हे कोरोनाचे संकट की फालतूचे राजकारण, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडू लागला आहे. तसेच आता पुरे झाले ते राजकारण तुमच्यामुळे झाले सर्वसामान्यांचे मरण, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
…आणि राजकारणीही कोरोनाप्रमाणे ऍक्टिव झाले!
मागील वर्षभरात राज्यात सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, सचिन वाझे प्रकरण, पूजा चव्हाण यामुळे राज्यात राजकीय शिमगा सुरू होता. त्यात ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. रोज त्याच त्याच बातम्या, तेच तेच आरोप प्रत्यारोप यामुळे जरी मनोरंजन झाले, तरी या सर्वामुळे सर्वसामान्य जनता मात्र त्रस्त होती. राजकारणी राजकारण करत बसले आणि कोरोना संकटाला विसरले अशीच गत काहीशी झाली. कोरोनाचे संकट जणू काही कमीच झाले, या अविर्भावात सर्वच राजकीय पक्षाचे नेते वावरत होते. कुणी आंदोलने केली तर कुणी लग्न सोहळे केले, तर कुणी मेळावेच घेतले. राजकारणी जर असे आदर्श समोर ठेवत असतील, तर सर्व सामान्य तरी काय करणार? मग काय सगळंच आलबेल. राज्यात जणू काही कोरोना मेलाच असे सर्व सुरू होते. मात्र राज्यात मार्चपासून पुन्हा एकदा कोरोना रुपी राक्षसाने डोके वर काढले. आणि म्हणता म्हणता या राक्षसाने मागच्या वेळेपेक्षा रौद्ररूप धारण केले. दिवसागणिक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आज राज्यात ऑक्सिजन आणि बेड अभावी रुग्णाला आपला जीव गमवावा लागत आहे. आता तर राज्यात ना बेड ना लस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्वाला जबाबदार कोण हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. मात्र राज्यात इतकी भीषण परिस्थिती असताना राज्यातील राजकारणाने देखील तितकेच डोके वर काढले आहे. मागील वर्षभर सरकार पाडण्यासाठी आसुसलेले पुन्हा कोरोना सारखे ऍक्टिव झाले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
(हेही वाचा : भाजपचा ‘घर-घर झेंडा’! राज्यात कमळ पुन्हा ‘खुलणार’?)
भाजपवाल्यांना कोरोना संकटात सत्ता दिसू लागली!
आपल्या हातात आता आणखी आयते कोलीत सापडले आणि अब नही तो कभी नही, अशी धारणा असलेले भाजपवाले राज्य सरकार कसे अपयशी ठरले, याचा जणू पाढा वाचायला सुरू झाले. कुणी म्हणाले हे सरकारचे अपयश आहे तर कुणी म्हणाले या सरकारला जनतेशी देणेघेणे नाही. विरोधकांना उत्तर न देणार ते सत्ताधारी कसले, त्यांनी देखील आपल्या तलवारी बाहेर काढल्या आणि शाब्दिक हल्ले करायला सुरुवात केली. आता तर राज्यातील या राजकीय महाभारतात थेट दिल्लीश्वरांनी एन्ट्री केली. मग काय राजकीय धुरळाच की राव. विशेष म्हणजे विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी थेट केंद्रावर हल्ला चढवला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तर राज्याला लस देण्यात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला आणि केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र सरकार कसे अपयशी ठरले आहे याचा पाढाच वाचून दाखवला. केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रात केवळ ८६ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचेच लसीकरण झाले असल्याचे म्हणत ठाकरे सरकारला खोटे पाडण्याचा प्रयत्न केला. लसीचा पुरवठा कमी असल्याचा आरोप हा निराधार असून, लसींच्या पुरवठ्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर लागलीच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीदेखील ठाकरे सरकारवर टीका केली. ठाकरे सरकारने कोविडवरील लसीचे पाच लाख डोस वाया घालवल्याचा आरोप केला आणि आरोपांची धार अधिकच वाढली. यानंतर शिवसेनेने थेट कोणत्या राज्यात किती डोस वाया गेले याची आकडेवारी दिली, तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना उत्तर दिले. एकूणच काय राज्यात कोरोनाने अनेकांना जीव गमवावा लागत असताना भाजप विरुद्ध ठाकरे सरकारमधील आरोप-प्रत्यारोपाने देखील डोके वर काढले आहे. आता या सर्वांचा त्रास भोगावा लागत आहे, तो सर्वसामान्यांना.
लॉकडाऊन नको, तर पर्याय सूचवा!
राज्यात सत्तेपासून दूर रहावे लागलेल्या भाजपकडून ठाकरे सरकारला प्रत्येक गोष्टीत उघडे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या सगळ्यात राज्याची बदनामी होत आहे हे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक विसरलेत का? किंवा यांना राज्याची बदनामी खरच होऊ द्यायची आहे का, असा प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांना एव्हाना पडला असेलच. असो राजकारण होतच राहील पण आता तर पुन्हा लॉकडाऊन झाले तर सर्वसामान्यांचे काय? याचा विचार कुणी केलाय का? विरोधक विरोध करत आहेत व त्यांचा तो विरोध स्वार्थी राजकारणासाठी आहे की सर्वसामान्यांच्या हितासाठी याचा देखील विचार होणे गरजेचे आहे. लॉकडाऊन झाले तर अनेकांचे वांदे होतील. आधीच असलेले नसलेले विकून वर्षभर कसेबसे लोक जगलेत. आता कुठे पुन्हा गाडी रुळावर येऊ लागली त्यात हे पुन्हा लॉकडाऊनचे झेंगाट…साहेब तुमचे राजकारण होतच राहील पण सर्वसामान्यांचे काय, याचा विचार कुणी केला आहे का? तसेच जे विरोधक लॉकडाऊनला विरोध करत आहेत त्यांनी सरकारला दुसरा काही पर्याय सुचवला आहे का?
(हेही वाचा : लसीकरण : महाराष्ट्राची हेळसांड! )
राजकारणात सर्वसामान्यांची माती करू नका!
आज राज्यातील जनतेची अशी भावना झाली आहे की, कोरोनाने सर्वसामान्यांपेक्षा राजकारणी मरायला हवेत म्हणजे आम्ही तरी सुटू. लोकांच्या मनात ही भावना का निर्माण झाली याचा विचार राजकारण्यांनी आधी करायला हवा. राजकारण्यांनी राजकारण जरूर करावे पण आपल्या राजकारणात सर्वसामान्यांची माती होऊ नये हीच अपेक्षा. बाकी तुम्हाला राजकारण करण्यासाठी आहेतच की निवडणुका, पण या काळात देखील राजकारण न करता थोडा सर्वसामान्यांचा विचार करा, हीच अपेक्षा. कोरोना संकट मोठे आहेच पण त्यापेक्षा सर्वसामान्य जनता हे तुमचे प्राधान्य आहे. जनता जगली तरी तुम्ही जगाल हे विसरू नका. म्हणूनच शेवटी जाता जाता राजकारण बाजूला ठेवून या संकटात तरी सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून काम करा, ही अपेक्षा!
Join Our WhatsApp Community