कोरोनामुक्त तुरुंगांसाठी तळोजा पॅटर्न राबवावा!

कारागृहात येणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांचे तापमान आणि ऑक्सिजन लेव्हल तपासूनच त्याला आत घेतले जाते. तसेच प्रत्येक कैदी, न्यायबंदी आणि कर्मचारी अधिकारी यांना मास्क लावणे सक्तीचे केले गेले आहे. अश्या प्रकारे तळोजा कारागृहातील प्रशासनाने काळजी घेऊन तळोजा कारागृह कोरोनामुक्तीकडे आणला आहे.

तळोजा तुरुंग हा राज्यातील सर्वात सुरक्षित तुरुंग मानला जात आहे. कोविड काळात देखील हा तुरुंग कैद्यासाठी सुरक्षित ठरत असून राज्यातील इतर तुरुंगात कोरोनाचे रुग्ण वाढले, मात्र तळोजा तुरुंगात आजच्या घडीला एकाही कैद्याला कोरोनाची लागण झालेली नसल्याचे तुरुंग प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. कोरोनामुक्त तुरुंग म्हणून राज्यात तळोजा तुरुंग ओळखला जाऊ लागला. येथील तुरुंग अधिकारी आणि प्रशासनाने कोरोनामुक्तीसाठी राबवलेला पॅटर्न राज्यभरातील तुरुंगात राबवण्यात यावा यासाठी तुरुंग प्रशासन प्रयत्नात आहे. काय आहे तळोजा पॅटर्न जाणून घेऊया …

तळोजा कारागृह बनले महत्वाचे!

मुंबई, ठाण्यातील तुरुंगावरील भार कमी करण्यासाठी तळोजा तुरुंगाची स्थापना करण्यात आली होती. ९०च्या दशकात मुंबईत वाढत्या गुन्हेगारीसोबत गुन्हेगारांना मोठ्या प्रमाणात अटक करण्यात येत होती. न्यायालयीन कोठडीनंतर या गुन्हेगाराची रवानगी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात करण्यात येत होती. त्यामुळे आर्थर रोड तुरुंगात क्षमतेपेक्षा अधिक कैदी झाल्यामुळे या तुरुंगाचा भार वाढला होता. त्यात परस्पर टोळीतील गुंड एकाच तुरुंगात वाढल्यामुळे तुरुंगात देखील त्यांच्यात होणाऱ्या भांडणामुळे तुरुंग प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. आर्थर रोड तुरुंगाचा भार कमी करण्यासाठी अखेर तळोजा येथे नवीन तुरुंग बनवण्यात आले आणि आर्थर रोड तुरुंगातील भार कमी करण्यात आला आहे. तळोजा तुरुंगात आजच्या घडीला मोठं मोठे गुंड तसेच गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षा भोगत असून काही जण अंडरट्रायलमध्ये आहेत.

(हेही वाचा : कोरोनासारख्या आपत्तीवर ठाकरे सरकार निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडेंना साद घालणार का? )

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कैद्यांना संचित दिलेली रजा!

राज्यात कोरोनाने थैमान घेतले आहे, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरात हजारोंच्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. कोरोनाच्या विषाणूचा प्रवेश राज्यातील कारागृहात देखील झालेला आहे, राज्यभरातील कारागृहामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे कैद्यांना नातेवाईकांमध्ये तसेच तुरुंग प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अनेक तुरुंगातील कैद्यांची क्षमता अधिक असल्यामुळे न्यायबंदी कैद्यांना जामीन देण्यात यावा, तसेच शिक्षा झालेल्या कैद्यांना संचित रजेवर पाठवण्याचा निर्णय मागच्या वर्षी शासनाने घेतला होता. त्यानुसार मार्च २०२० आणि मे २०२० या कालावधीत राज्यभरातील तुरुंगातील जवळपास १० हजार कैद्यांना जामीन तसेच संचित रजेवर सोडण्यात आले होते. त्यामुळे तुरुंगावरील ताण कमी झाला होता. मात्र वर्षभरात तेवढेच आरोपी नव्याने तुरुंगात पाठवण्यात आल्यामुळे राज्यातील तुरुंगातील परिस्थिती पूर्वीप्रमाणेच झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यातील सर्व तुरुंगात जवळपास ३५ हजार कैदी आहेत. ही संख्या क्षमतेपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आणि राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. तुरुंगात देखील कोरोना रुग्णाची संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

३०० कैद्यांना कोरोनाची लागण, ९ जणांचा मृत्यू   

राज्यभरात छोटे मोठे असे एकूण ४७ तुरुंग आहेत, या सर्व तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी भरले गेले आहेत. सद्याच्या स्थितीला या कारागृहामध्ये जवळपास ३५ हजार कैदी आहेत, या सर्व कैद्यांना दाटीवाटीने बॅरेक रहावे लागत असल्यामुळे कारागृहात कोरोनाचे संक्रमण होऊन रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील ४७ कारागृहांपैकी मुंबईतील आर्थर रोड, भायखळा महिला कारागृह, ठाणे येथील मद्यवर्ती कारागृह, कल्याण येथील आधारवाडी, नाशिक, येरवडा, कोल्हापूर जिल्हा कारागृहात सर्वात अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. या कारागृहात जवळपास ३०० कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

(हेही वाचा : मोठी बातमीः माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल!)

तळोजा कारागृह ‘कोविड फ्री’!

मात्र सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे नवी मुंबईत असलेले तळोजा मध्यवर्ती कारागृह हे कोरोनमुक्त कारागृह झाले आहे. या कारागृहात सध्या स्थितीला एकही कोरोनाचा रुग्ण नाही, परंतु गेल्या वर्षी या कारागृहात कोरोना रुग्नाची संख्या मोठी होती. तळोजा कारागृहातील अधिकारी, कर्मचारी यांनी घेतलेली काळजी तसेच बाहेरून येणाऱ्या नवीन कैदी अथवा न्यायबंदीला कोरोनाचा चाचणीच्या अहवाल शिवाय कारागृहात प्रवेश दिला जात नव्हता. तळोजा कारागृह प्रशासनाने कारागृहापासून दूर अंतरावर एका शाळा ताब्यात घेऊन शाळेचे रूपांतर कोविड सेंटर आणि विलगीकरण कक्ष अश्या दोन भागात केले होते.

तळोजा कारागृहात अशी घेतली खबरदारी! 

बाहेरून येणारे नवीन कैदी अथवा न्यायबंदी (न्यायालयीन कोठडीतील आरोपी) यांचा कोरोना चाचणीचा अहवाल तपासला जात होता, ज्या कैद्यांचे अथवा न्यायबंदी चे अहवाल पॉझिटिव्ह असतील त्यांची रवानगी कोविड सेंटरमध्ये केली जायची आणि ज्याचे अहवाल निगेटिव्ह असतील त्यांची रवानगी विलगीकरण कक्ष येथे १४ दिवसांसाठी केली जायची, १४ दिवसानंतर विलगीकरण कक्षेतील कैदी अथवा न्यायबंदीला कारागृहात प्रवेश दिला जात होता. तेथेही काही दिवस त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जात होते. पॉझिटिव्ह असलेल्या कैद्यावर शाळेतील कोविड सेंटरमध्ये उपचार करून त्याचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत ठेवले जायचे, त्यानंतर त्याला पुन्हा विलगीकरण कक्ष येथे काही दिवस ठेवून त्यालाही कारागृहात प्रवेश दिला जायचा. कारागृहात येणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांचे तापमान आणि ऑक्सिजन लेव्हल तपासूनच त्याला आत घेतले जात होते. तसेच प्रत्येक कैदी, न्यायबंदी आणि कर्मचारी अधिकारी यांना मास्क लावणे सक्तीचे केले गेले आहे. अश्या प्रकारे तळोजा कारागृहातील प्रशासनाने काळजी घेऊन तळोजा कारागृह कोरोनामुक्तीकडे आणला आहे. मात्र इतर तुरुंगात एवढी काळजी घेतली जाते का? किंवा तळोजा कारागृह पॅटर्न राज्यातील सर्व कारागृहात राबवल्यास राज्यातील कारागृहे कोरोनामुक्त होतील. तळोजा पॅटर्न वापरण्याबात कारागृह प्रशासनातील अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता आम्ही तळोजा पॅटर्न सर्व कारागृहात वापरता येईल का याचा विचार करीत असल्याचे अधिकारी यांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here