कोरोनाची दुसरी लाट इतकी विध्वसंक असेल याची कुणालाच कल्पना नव्हती. काही दिवसातच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या वाढली. रुग्णालये तुडूंब भरली. आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागली. त्यामुळे सरकार हजारो रुग्णांना ‘घरीच क्वारंटाईन व्हा आणि उपचार घ्या’, असे सांगू लागेल, पण यात असे अनेक रुग्ण आहेत, जे घरी एकटे आहेत किंवा कुणाच्या घरातील महिलाच बाधित झालेली आहे, अथवा कुणाच्या घरी पती-पत्नी दोघेही बाधित आहेत आणि प्रचंड अशक्तपणाने झोपून आहेत, घरात छोटी मुले आहे, अशा सर्वांसमोर महत्वाचा प्रश्न असतो, खायचे काय? कोरोना झाल्यावर त्यातून बरे होण्यासाठी पौष्टिक आहार गरजेचा असतो, तो देणार कोण? वास्तविक सरकारने याचा विचार करण्याची गरज होती. आज अशा शेकडो रुग्णांना ही समस्या भेडसावत आहे. अशा वेळी शिवडीत राहणारे भालचंद्र जाधव हे जेव्हा या रुग्णांना त्यांच्या घरी जाऊन दुपार आणि रात्र असा दोन वेळेचा गरमागरम जेवणाचा डबा देतात, तेव्हा ते त्या रुग्णांसाठी देवमाणूस ठरत आहेत.
…आणि संपूर्ण कुटुंब लागले समाजसेवेला!
१८-२० वर्षांपासून भालचंद्र जाधव यांचा शिवडीत कॅटरिंगचा व्यवसाय आहे. मात्र मागील वर्षांपासून व्यवसाय थंडावला आहे. कारण आहे कोरोना. पहिल्या लाटेत भालचंद्र जाधव आणि त्यांच्या पत्नीने कोरोनाचा अनुभव घेतलेला. या दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी हे दोघेही कोविड सेंटरमध्ये होते. मात्र कोरोनाने किती त्रास होतो, रुग्ण कसा निष्क्रिय बनतो हे त्या दाम्पत्यांनी अनुभवले होते. त्यामुळे दुसऱ्या लाटेत जेव्हा अवतीभवती शेकडो रुग्ण होम क्वारंटाईन आहेत, हे जेव्हा त्यांना समजले, तेव्हा भालचंद्र जाधव यांना पहिला प्रश्न पडला, त्यांच्या जेवणाचे काय? आणि मग सुरु झाली खटपट! अशा काही रुग्णांची विचारपूस केल्यावर त्यांची होत असलेली उपासमार त्यांच्या निदर्शनास आल्यावर कॅटरिंगच्या व्यवसायासाठी घरात असलेली मोठमोठी भांडी आता अशा रुग्णांची मोफत भूक भागवण्यासाठी शेगडीवर चढली. असा रीतीने भालचंद्र जाधव, त्यांची पत्नी, ७८ वर्षांची आई, सासूबाई, दोन मुले आणि २ कामगार असे सर्व जण अन्नदानासारखी महान समाजसेवा करू लागले. मागील महिनाभरापासून जाधव कुटुंब शिवडी, वडाळा, परळ या भागात दररोज किमान १००-१२५ जेवणाचे डबे पोहचवतात. तेही होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांच्या थेट घरी आणि तेही मोफत!
होम क्वारंटाईन रुग्णांना कोणी मदत करण्यास पुढे येत नाही. त्यांना पोटभर जेवणाची आवश्यकता असते. गरजूला मदत करता येत असल्याचे समाधान आहे. लोक डबा मिळाल्यानंतर हात जोडतात, ते पाहून डोळ्यात पाणी येते. इतर लोकांनी सुद्धा आपल्यापरीने मदत करायला हवी.
– भालचंद्र जाधव.
व्हाट्सअप नंबर बनले माध्यम!
डाळ, भात, भाजी, चपात्या आणि सलाड असा परिपूर्ण आणि सात्विक आहार देणारे जाधव कुटुंब आता या परिसरात प्रसिद्ध झाले आहे. भालचंद्र जाधव यांचा व्हाट्सअप नंबर आता या परिसरात अनेकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाला आहे. ज्या कुणा होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णाला जेवणाचे डबे पाहिजे असतील, ते जाधव यांना व्हाट्सअपवर कळवतात, त्याप्रमाणे कुणाला १-२-३ असे डबे पाहिजे असतात. जाधव त्याप्रमाणे वापरा आणि फेकून द्या आशा प्लेटमध्ये हे जेवणाचे डबे पॅकिंग करतात आणि ते त्या त्या रुग्णांपर्यंत पोहचवतात.
(हेही वाचा : आता कोविन-ॲप नोंदणीनुसारच लसीकरण)
पाहताच क्षणी पाया पडतात!
ज्यावेळी जाधव यांच्याकडील कामगार मुले डबे घेऊन रुग्णाच्या दारात पोहचतात, तेव्हा मात्र ते रुग्ण त्यांच्या अक्षरशः पाया पडतात. कारण जरी दुसऱ्या लाटेत कोरोना हा सगळीकडे घराघरात गेला असला, तरी आजही ज्या घरात रुग्ण आहे, त्या घराकडे कुणीही फिरकत नाही. मग जरी कुणी चांगले शेजारपाजारी असतील अथवा कुणी नातेवाईक असेल, कुणीही त्या घराला मदत करत नाही. अशा वेळी कुठला तरी अनोळखी व्यक्ती आपल्याला दिवसाच्या दोन वेळेचा डबा दरात येऊन फुकट देतो, हे पाहून ते रुग्ण गहिवरून जातात, असे भालचंद्र जाधव म्हणाले.
सरकारने ही समस्या समजून घ्यावी!
आधीच मागच्या वर्षांपासून व्यवसाय बंद आहे, मागील २-३ महिने पुन्हा सुरु झाला होता, मात्र लगेचच कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा सगळे ठप्प झाले आहे. व्यवसाय थांबलेला आहे. पैशाची अडचण आहे, तरीही केवळ समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेने पदरमोड करून ही अन्नदानाची समाजसेवा करत आहेत. याची सरकारने दखल घ्यावी आणि अर्थसहाय्य करावे, अशी इच्छा भालचंद्र जाधव यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community