स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या ५८व्या आत्मार्पण दिवसानिमित्त दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात शनिवारी ‘संगीत उत्तरक्रिया’ नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग सादर झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित आणि अनंत वसंत पणशीकर निर्मित हे नाटक महाराष्ट्र शासन आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, दुर्मिळ नाटक जतन आणि संवर्धन योजना २०२३-२४ अंतर्गत संग्रहित करण्यासाठी या नाटकाची निवड करण्यात आली आहे.
दुसऱ्या पानीपतच्या युद्धात मराठ्यांनी अब्दालीच्या सैन्याचा पराभव करून पानिपतच्या पराभवाचे उट्टे काढले. त्या वीरगाथेची कहाणी ‘संगीत उत्तरक्रिया’ नाटकात रंगवण्यात आली आहे. नाटकाच्या सादरीकरणानंतर निर्माते अनंत वसंत पणशीकर यांनी सांगितले की, नाट्यसंपदा कला मंचाने उत्साहाने या नाटकात सहभाग घेतला. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, दुर्मिळ नाटक जतन करण्याचा उपक्रमात ‘संगीत उत्तरक्रिया’ नाटकाची निवड झाली. या नाटकाचं १२ फेब्रुवारीला महाराष्ट्र शासनातर्फे रेकॉर्डिंग करण्यात आलं. हे नाटक यूट्युबवर कायमस्वरुपी रसिकांना पाहता येणार आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.
तसेच जुन्या आठवणींना उजाळा देत ते म्हणाले की, २५ फेब्रुवारीला ‘माझी जन्मठेप’ नाटकाचा शुभारंभाचा प्रयोगही स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातच झाला होता. ‘संगीत उत्तरक्रिया’ हे नाटक वीर सावरकर यांनी लिहिलंय. त्यांच्या राष्ट्रीय स्मारकात आम्ही इथे दीड-दोन महिने तालमी केल्या. त्यामुळे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग इथे करताना अतिशय आनंद होत आहे. नाटकातील कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शन डॉ. अनिल बांदिवडेकर, सुहास सावरकर, संगीत दिग्दर्शक मयुरेश माळगावकर, नेपथ्यकार आणि म.टा. सन्मान नामांकनप्राप्त सचिन गावकर, महाराष्ट्र शासन, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे समन्यवयक शुभंकर करंडे या सर्वांच कौतुक आणि केदार बापट, रामदास भटकळ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी वेळ देऊन नाटक पाहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
‘संगीत उत्तरक्रिया’ नाटकाचे अनेक ठिकाणी प्रयोग करण्याचे आवाहन
नाटकातील कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांचं हार्दिक अभिनंदन करताना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर म्हणाले की, ‘संगीत उत्तरक्रिया’ हे नाटक रंगभूमीवर येणं आवश्यक होतं. यामध्ये सावरकरांचा एकही शब्द बदललेला नाही. राष्ट्रीय अपमानाचा सूड उगवलाच गेला पाहिजे. तो कसा उगवला गेला, हे दाखवणारं हे नाटक आहे. ५० वर्षांपेक्षा अधिक काळ मराठे दोन तृतीयांश भारतावर राज्य करत होते. दिल्ली आमच्या ताब्यात होती. हा इतिहास आम्हाला आणि आमच्या शाळांमध्ये शिकवलाच नाही. हा खरा इतिहास आम्हाला कळला पाहिजे. महादजी शिंदेंचा इतिहास ज्यांनी दिल्लीवर ५० वर्षे पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून राज्य केलं. ज्याला आजच्या काळात ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’ म्हणतात, ती दिल्ली आपल्या ताब्यात होती. पूर्ण देशावर आपली सत्ता होती. हे आपल्या शाळांमध्ये शिकवलं जात नाही, हे दुर्दैव आहे. आज सरकारचे प्रमुखही शिंदेच आहेत. त्यांना ‘संगीत उत्तरक्रिया’ नाटक पाहण्याची प्रेरणा व्हावी आणि खरा इतिहास नाटकाच्या माध्यमातून जनतेसमोर यावा, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली, तसेच यावेळी त्यांनी ‘संगीत उत्तरक्रिया’ नाटकाचे अनेक ठिकाणी प्रयोग व्हावेत, असे आवाहनही केलं.
नाटकाच्या रुपाने खरा इतिहास सगळ्यांसमोर येतोय
यावेळी स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी निर्माते अनंत पणशीकर यांचे अभिनंदन केले आणि नाटकातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांनी शुभेच्छा देताना त्या म्हणाल्या की, व्यावसायिक नाटक करत असताना एका टप्प्यावर अशा स्वरुपाचं सादरीकरण करायचं जे राष्ट्रहिताचं असेल, हा विचारच खूप मोठा आहे. ‘माझी जन्मठेप’चे प्रयोग त्यांनी केले. तेही अवघडच होतं आणि आता नाटक ‘संगीत उत्तरक्रिया’. आपल्याला फक्त पानिपतचा पराभव एवढंच माहीत असतं. माधवराव पेशव्यांनी आपला सूड घेतला हे आपल्याला शिकवलेलंच नाही. वीर सावरकरांनी असं म्हटलं होतं की, ‘जे काम व्याख्यानांनी होणार नाही, ते एका नाटकाने होतं.’ त्यासाठी त्यांनी ‘नाटक’ हे माध्यम निवडलं होतं. या नाटकाच्या रुपाने खरा इतिहास सगळ्यांसमोर येतोय.