स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) आणि त्यांच्या बंधूंच्या त्यागाचा इतिहास साऱ्या जगाला ज्ञात आहे, मात्र भारतमातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वातंत्र्यवीर अंदमानात गेल्यानंतर यशोदाबाई गणेश सावरकर (येसूवहिनी), यमुनाबाई विनायक सावरकर (माई) आणि शांताबाई नारायण सावरकर (ताई) या सावरकर घराण्यातील तीन धीरोदात्त स्त्रियांनी आपल्या पतींच्या राष्ट्रकार्याची धुरा निष्ठेने सांभाळली. या तीन वीरांगनांची शौर्यगाथा उलगडणारा ‘त्या तिघी…स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ हा एकपात्री नाट्यप्रयोग स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता.
डॉ. शुभा साठे लिखित ‘त्या तिघी’ या कादंबरीवर ‘त्या तिघी…स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ हे नाटक आधारित आहे. हा एकपात्री नाट्यप्रयोग अभिनेत्री अपर्णा चोथे यांनी रंगवला. या नाटकाला सावरकरप्रेमी रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. क्रांतिकार्यात हालअपेष्टा सहन करताना हार न मानता राष्ट्रकार्य पुढे नेणाऱ्या या तीनही व्यक्तिरेखा एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून पाहताना रसिक प्रेक्षक भारावून गेले. वीर सावरकर यांच्या घराण्यातील यशोदाबाई गणेश सावरकर, यमुनाबाई विनायक सावरकर आणि शांताबाई नारायण सावरकर या तीनही व्यक्तिरेखा त्यांनी समरसून साकारल्या. या तिघींनी पतीविरह, हालअपेष्टा, उपासमार सहन करत असतानाही आपल्या पतींच्या राष्ट्रकार्याची धुरा निष्ठेने सांभाळली. अशा या वीरांगनांची शौर्यगाथा आजच्या तरुण पिढीला माहिती असणं आवश्यक आहे. याकरिता या नाटकाचं सादरीकरणं ठिकठिकाणी होणं आवश्यक आहे.
(हेही वाचा – Vijay Vadettiwar : चंद्रपूर-बल्लारपूर-बामणी-खैरी गोंडपिपरी रस्त्यांचा दर्जा सुधारा)
‘त्या तिघी…स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ या एकपात्री नाट्यप्रयोगाला ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर आणि ज्येष्ठ सावकरप्रेमी, रंगकर्मी माधव खाडिलकर, यांची विशेष उपस्थिती लाभली तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, शिवसृष्टीचे श्रीनिवास विरकर, स्मारकाचे कार्यकारिणी सदस्य हेमंत तांबट हेही यावेळी उपस्थित होते. ‘एकपात्री प्रयोगातून तीन स्त्रिया साकारणं हे अतिशय कठीण काम होतं. हे शिवधनुष्य अपर्णा चोथे यांनी उत्तमरित्या पेललं. खूप उत्तम काम केलंय. हे नाटक ‘त्या तिघींनी’ खरी श्रद्धांजली ठरेल.’ , अशा शब्दात कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी अभिनेत्री अपर्णा चोथे यांचं कौतुक केलं.
एकपात्री नाट्यप्रयोगाचे वेगळेपण…
या प्रयोगाची संकल्पना, संहिता लेखन आणि सादरीकरण अपर्णा चोथे यांचे असून सावरकर घराण्यातील या तीनही व्यक्तिरेखा त्यांनी समरसून साकारल्या. त्यांनी १९०० पासूनचा तो रोमांचक काळच रसिकांसमोर उभा केला. कष्टाचे आयुष्य अनेकींच्या वाट्याला येते, पण आनंदी मन, उदात्त विचार आणि दु:खाचे हलाहल पिऊनही न ढळणारी देशनिष्ठा ही गुणवैशिष्ट्ये या तिघींमध्येही होती. त्यामुळेच त्यांनी आपल्या पतींच्या राष्ट्रकार्याची धुरा निष्ठेने सांभाळली. त्यांची शौर्यगाथा या एकपात्री नाट्यप्रयोगाद्वारे साकारून अभिनेत्री अपर्णा चोथे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळच रसिकांपुढे उभा केला.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रविचार सन्मान’ पुरस्कार जाहीर…
ज्येष्ठ रंगकर्मी माधव खाडीलकर यांनी ‘नाटकाची संहिता अप्रतिम झाली आहे. तुम्ही नाटकाला योग्य न्याय दिला आहे. नेपथ्य सुटसुटीत, रेखीव असून दिग्दर्शनही उत्तम झालं आहे, असं सांगितलं. ‘उत्तुंग सांस्कृतिक परिवार’ या त्यांच्या संस्थेकडून त्यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रविचार सन्मान’ हा पुरस्कार अभिनेत्री अपर्णा चोथे यांना जाहीर केला. २७ जानेवारीला विलेपार्ले येथे लोकमान्य सेवा संघाच्या पु. ल. देशपांडे सभागृहात हा पुरस्कार देऊन अभिनेत्री अपर्णा यांचा सत्कार केला जाणार असल्याचे यावेळी सावकरप्रेमी आणि ज्येष्ठ रंगकर्मी माधव खाडिलकर यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community