Vikram Savarkar: एक चैतन्यझरा !

211
Vikram Savarkar: एक चैतन्यझरा !
Vikram Savarkar: एक चैतन्यझरा !

आत्मविश्वास, बुद्धिमत्ता, भव्यदिव्य स्वप्ने पाहण्याची सवय. कधीही निराश न होणारा स्वभाव, उदार अंत:करण, राजकारण-समाजकारण यातील सातत्य आणि प्रसंगावधान, स्वभाव तापट असला, तरीही कार्यकर्त्यांना घडवताना सर्वतोपरी सहकार्य, प्रसंगी स्वत:जवळचे धन देऊनही संकटात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे कणखर, ध्येयवादी, अनेकांसाठी ज्यांचे कार्यक्रम आणि व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी आहे, असे विक्रम सावरकर ! दासनवमीच्या दिवशी २३ फेब्रुवारी २०१४ला दुपारी एक वाजता, विक्रम सावरकरांनी (Vikram Savarkar) अंतिम श्वास घेतला. त्यांच्या आठवणींना उजाळा आणि मनाला स्फूर्ती देणारा ‘विक्रम नारायण सावरकर’ अेक चैतन्यझरा, या पुस्तकातला संपादित अंश त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रसिद्ध करत आहोत. 

श्रद्धाफुलांची माला

  • विद्या रानडे

विक्रम सावरकरांची आणि माझी ओळख होण्याचं तसं काही कारण नव्हतं. पण ‘मी नथुराम गोडसे बोलतोय्’बघितलं आणि विक्रमरावांना दूरध्वनी केला. ते व्यवस्थित बोलले. नवीन ओळख म्हणून दडपणही आलं नाही. त्यावेळी ‘प्रज्वलंत’च्या अंकात मला नथुराम नाटकाबद्दल लिहायला सांगितलं. एखादा वेगळा मुद्दा आढळला असेल तर तो लिहा असंही ते म्हणाले.

मी पत्र लिहिलं. ‘प्रज्वलंत’ मध्ये ते छापूनही आलं. मग वर्तमानपत्रासाठी पत्रं लिहावीत, असं त्यांनी सुचवलं. पत्र मुद्देसूद आणि थोडक्या शब्दात कसं लिहावं याचंही त्यांनी मार्गदर्शन केलं. काही पत्रं छापून येत. काही येत नसत. पत्र पाठवलं तरी छापून येत, नाही मग वर्तमानपत्रासाठी पत्रं पाठवायची कशाला, असं म्हटलं तर त्याचं उत्तर असे. ‘पत्र छापायचं की नाही हे ठरवण्यासाठी तरी पत्र वाचावं लागतं. त्यामुळे वाचणारा एकजण तरी तुमचे विचार समजून घेतो. तुमचे विचार एकापर्यंत तरी पोचतातच.’

कामाला दाद
त्यांचं बोलणं परखड होतंच. समोरच्याला काय वाटेल अशा विचारात न गुंतता समोरच्याला योग्य दिशा दाखवण्याचं काम ते करत. एखादं साधं पत्र छापून आलं तरी दूरध्वनी करून त्या पत्राबद्दल ते आवर्जून बोलत. कौतुक करत. एवढ्या मोठ्या व्यक्तीनं आपल्या सामान्य कामाला दाद दिली म्हणून आनंद व्हायचा, ऊरही अभिमानानं भरून यायचा. अंगावर मूठभर नव्हे, तर दोन-चार किलो वजन चढायचं.

‘प्रज्वलंत’साठी वर्गणी गोळा करताना माणसं पैसा असूनही नकार कसा देतात, कोणी वर्गणी देतच नाही असं म्हटलं तर सावरकर म्हणायचे, वर्गणी मागताना असे अनुभव येतातच. पण चांगलं काम करताना असा विचार करायचा नाही. तुम्ही १० जणांकडे गेलात, त्यातील ९ जणांनी नकार दिला आणि दहाव्या व्यक्तीनं वर्गणी दिली, तरी आपलं काम झालं असं समजायचं. प्रत्येक वेळी बोलता बोलता असे विचार ते मांडत आणि मला नवीन दृष्टिकोन मिळत जाई. प्रत्यक्ष भेटीचा योग मात्र खूप उशीरा आला.

भेदभाव नाही
मी आणि माझा मुलगा बाळकृष्ण मुद्दाम त्यांना भेटायला गेलो. स्वामिनीताई आणि विक्रमराव यांनी आमचं स्वागत असं केलं की आम्ही प्रथमच एकमेकांना भेटतो आहोत असं वाटलं नाही. त्यानंतर मात्र जमेल तेव्हा मुद्दाम आम्ही त्यांना भेटू लागलो. स्मारकात काही कार्यक्रम असेल तर दूरध्वनीवरून कळवलं जाऊ लागलं आणि आम्ही जाऊ लागलो.
खरं तर नामवंत व्यक्ती आणि सामान्य व्यक्ती असा भेदभावच त्यांच्याकडे नव्हता. मी एक भेटपत्र बनवलं होतं. त्यात शुभेच्छाजनक चार शब्द लिहिले होते. मला ते पत्र सावरकरांच्या हातात द्यायचं होतं. त्यांच्याबरोबर नितीन गडकरी होते. तरीही मी व माझा मुलगा समोर गेलो. पत्र दिलं. नमस्कार केला. तेही दोन शब्द बोलले. माणूस मनानं मोठा असण्याचं याहून कोणतं दुसरं उदाहरण देता येईल? खऱ्या अर्थानं विक्रमराव आणि स्वामिनीताई आमचे सुद्बुद झाले.

विक्रमरावांना बरं नव्हतं. डॉक्टरांनी जास्त बोलण्यास मनाई केली होती. पण तरीही ते लहान मोठ्या कार्यक्रमांना जात. बरं नसलं तरी स्वतःच्या तब्येतीबद्दल ते बोलत नसत. आपल्या त्रासाबद्दल शब्दही काढत नसत. पण वय झालं आहे. प्रकृती साथ देत नाही. कामं खूप पडली आहेत आणि आपल्याकडून ती होत नाहीत याचंच त्यांना वाईट वाटत असे.

वंश परंपरा
अखंड काम, अव्याहत मेहनत हेच त्यांचं जीवनध्येय होतं. देशाचे नेते, घोटाळे, भ्रष्टाचार यामुळं ते फार व्यथित होत. कारण स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते काम करत होते. देशासाठीच जगणं ही तर वंशपरंपरेनं आलेली देणगी होती. म्हणूनच तर ते आम्हाला सांगत, जिथं आणि ज्या परिस्थितीत आपण आहोत त्याही परिस्थितीत काम करत रहायला हवं. विक्रमरावांनी हेच तत्व स्वतः पाळलं. वैयक्तिक अडचणी होत्याच, पण प्रज्वलंत चालवणं, सैनिकी शाळा चालवणं अशा अनेक गोष्टी करताना आलेल्या अडचणींचा अडसर दूर करून त्यांनी जन्मभर काम आणि कामच केलं.

मोदी निवडून आले आणि विक्रमरावांची तीव्रतेनं आठवण झाली. ते असते तर या दोन मोठ्या नेत्यांची भेट नक्कीच झाली असती. “की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने” या तत्त्वानुसार सावरकरांनी देशासाठी काम केलं.

विक्रमरावांसाठी श्रद्धाफुलांची छोटीसी माला वहाते.

एखाद्या ऋषींप्रमाणे । रूप रंग लाभलेले
तेजस्वी अन् करारी दिसणारे ।
उत्तम राज्यकर्त्याचे गुण अंगी असणारे ।
कीर्ती आणि संपत्तीच्या मागे न धावणारे ।
विपरित परिस्थितीतही तत्वांशी तडजोड न करणारे ।
प्रकृती बरी नसताना कामं खूप आहेत आणि
प्रकृती साथ देत नाही याचीच खंत बाळगणारे ।
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांच्या प्रसारासाठी
आणि हिंदुत्वासाठी आयुष्य वेचणारे
त्या विक्रम सावरकरांना ।
श्रद्धाफुलांची वाहते माला ।

(हेही वाचा – Mahasanskrit Mahotsav 2024 : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ‘बौद्ध’ आणि ‘शबरी’ महोत्सवाचे शनिवारी आयोजन)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.