स्वामी विवेकानंद यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांना कोण ओळखत नाही… १९ व्या शतकात बंगाल येथे एक संत होऊन गेले. आधुनिक भारतीय धर्मप्रबोधन करण्यात रामकृष्ण परमहंसांचा (Ramakrishna Paramhansa) खूप मोठा वाटा होता. त्यांचे शिष्य त्यांना देवाचाच अवतार मानायचे. रामकृष्ण परमहंस यांचा जन्म बंगालच्या (Bengal) एका गावामध्ये झाला. त्यांचे कुटुंब वैष्णव ब्राह्मण होते. त्यांच्या वडिलांचं नाव क्षुदिराम चटोपाध्याय आणि आईचं नाव चंद्रमणी असं होतं.
असं म्हटलं जातं की, त्यांच्या जन्माच्या आधी त्यांच्या वडिलांना स्वप्नात गदाधारी विष्णूने दर्शन दिलं होतं तसंच असंही मानलं जातं की, त्यांची आई त्यांच्यावेळी गरोदर असताना शिवलिंगातून एक दिव्य ज्योत बाहेर पडली आणि त्या ज्योतीने त्यांच्या आईच्या गर्भाशयात प्रवेश केला होता. गदाधर विष्णूचं दर्शन झाल्यामुळे वडिलांनी त्यांचं नाव गदाधर असं ठेवलं.
लहानपणी अभ्यासात त्यांची अजिबात रुची नव्हती. ते सहा-सात वर्षांचे असल्यापासूनच त्यांच्यामध्ये अध्यात्माची भावना रुजत गेली; पण मूर्ती घडवण्यात ते खूप हुशार होते. याव्यतिरिक्त त्यांनी गायन, वादन आणि कथा निरुपणातही प्राविण्य मिळवलं होतं. कलकत्ता येथील प्रसिद्ध दक्षिणेश्वर काली मंदिरात रामकृष्ण परमहंस हे पौरोहित्य करायचे. रामकृष्ण परमहंस यांनी गावातल्या संतजन, संन्यासी, तिथे येणारे यात्री आणि पुराणिकांकडून महाभारत, रामायण, आपली वेद-पुराणे, भागवत यांसारख्या अनेक ग्रंथांची माहिती लहानपणापासूनच करून घेतली होती. त्यांची मातृभाषा म्हणजेच बंगाली भाषा त्यांना वाचता येत होती. त्यांना संस्कृत भाषाही समजत होती पण बोलता येत नव्हती.
१८४३ साली त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्यावेळी ते खूप खचले. ते भावनिकदृष्ट्या आपल्या आईच्या जास्त जवळ गेले. त्यांचा जास्तीत जास्त वेळ घरची कामं करण्यात आणि देवपूजा करण्यात जायला लागला. त्यांचे मोठे भाऊ रामकुमार यांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा भार सांभाळला. ते कलकत्ता येथे पौरोहित्य करायला लागले. पुढे कालांतराने १८५२ साली रामकृष्ण परमहंससुद्धा आपल्या भावाला मदत करण्यासाठी कलकत्त्यात आले.
(हेही वाचा –PM Modi Jammu Visit : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी जम्मूमध्ये ड्रोन आणि इतर हवाई उपकरणांच्या वापरावर तात्पुरती बंदी )
परमहंसांचे भाऊ रामकुमार हे दक्षिणेश्वर काली मंदिराचे मुख्य पुजारी होते. कलकत्त्यात आल्यानंतर परमहंसांनी आपल्या भावाचा सहकारी म्हणून काली मातेच्या साजसज्जेचे काम आनंदाने स्वीकारले. १८५६ साली परमहंसांचे भाऊ रामकुमार यांचं निधन झालं. त्यानंतर रामकृष्ण परमहंस यांनी आपल्या भावाच्या कामाची सगळी जबाबदारी घेतली.
काली मातेची सेवा करता करता ते मनाने आणखीनच ईश्वरभक्तीमध्ये लीन झाले. त्यांना काली मातेच्या दर्शनाचा ध्यास लागला. एक दिवस असेच, काली मातेने दर्शन दिले नाही तर त्यांनी प्राणत्याग करण्याचा निर्णय घेतला. असं मानतात की, त्यावेळी एक चमत्कार घडला आणि मंदिराचा गाभारा दिव्य प्रकाशाने भरून गेला. ते स्वामी विवेकानंदांचे गुरु होते.