शिवशक्ती-भिमशक्तीच्या युतीची टाळी वाजली, पुढे काय?

    154

    अखेर प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीशी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे सूत जुळले. पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळीतील नेत्याशी आणि पक्षाशी शिवसेनेने जुळवून घेतले. तसे शिवसेनेला आता स्वतःचे अस्तित्व राखण्यासाठी जुळवून घ्यावेच लागेल. सन २००९ मध्ये जेव्हा रिपाइंच्या रामदास आठवले यांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी संबंध तुटले होते, तेव्हा त्यांनी असाच शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग करत शिवसेनेशी युती केली होती. तेव्हा शिवसेनेशी रिपाइंने युती केली हाती. पण आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वंचितशी युती केली. दोन्ही युतीमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. तेव्हा आठवले यांना शिवसेनेशी युती करण्याची गरज होती आणि आत शिवसेनेला वंचितशी युती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

    जर आपण या युतीची पत्रकार परिषद पाहिली असेल तर त्या पत्रकार परिषदेचे ठिकाण आणि व्यासपीठावर लावलेला नावाचा फलक हा खूप काही सांगून जात होता. यापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना झालेल्या शिवशक्ती भिमशक्तीच्या प्रयोगात कुणाचे भले झाले? दलित बांधवांना या शिवशक्ती भिमशक्तीचा काय उपयोग झाला जो आता होणार आहे? तेव्हाही दलित बांधव उपेक्षितच होते आणि आताही राहतील. मतांच्या जोगव्यापुढे दलित बांधवांच्या उत्कर्षाचा आणि प्रगतीचा तसेच विकासाचा कोणताही प्रयत्न आजवर शिवसेनेने केला नाही, जो आता शिवशक्ती व भिमशक्ती एकत्र आल्यावर होईल. मुळात शिवसेनेने दलित बांधवांना एकत्रच कधी केले होते? हा प्रश्न आहे. हिंदुत्वाच्या मुद्दयावरुन लढणाऱ्या शिवसेनेला दलितांना कधी आपल्यासोबत घ्यावेसे वाटले नाही आणि दलित बांधवांनाही त्यांच्याकडे जावेसे वाटले नाही. त्यामुळे ही मते दलित नेत्यांच्या पाठिशी राहिली आणि या मतांच्या जोरावर नेते त्यांना विविध पक्षांसोबत वारी घडवून आणत आहे. एकप्रकारे दलित बांधवांना गृहीत धरून त्यांचे नेते वावरत आहेत, हे आजच्या प्रगत समाजातील बांधवांनाही पक्के ठाऊक आहे.

    एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाजूला होत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची स्थापना केली, त्यामुळे बुडत्याला काडीचा आधार उक्तीप्रमाणे आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बहुजन वंचितचा आधार वाटू लागला आहे. खरे तर शिवसेना या पक्षाची दोन शकले पडली असली तरी त्याची पाळेमुळे एवढी मजबूत आहेत की ज्याच्या जोरावर अनेक पक्षांना आपण शिवसेनेशी युती करून आपल्या पक्षात ऑक्सिजन भरु शकतो असे वाटत आहे. त्यामुळेच तर राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच शिवसेनेशी युती असल्याचे जाहीर केले. ज्याप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेच्या अमरवेलवर मोठे व्हायचे आहे, तसेच काहीसे स्वप्न वंचितचे सुद्धा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या टाळीला टाळी देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केली. ज्या उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंच्या मनसेला टाळी देता आली नाही, मनसेवर विश्वास नाही,पण ‘वंचित’वर विश्वास आहे, हेच दिसून येते.

    आज ‘वंचित’चे मुंबईत योगदान काय? मुंबईतील मागील महापालिका निवडणुकीत एकही उमेदवार निवडून आणता आलेला नाही. वर्षभर झोपायचे आणि निवडणुका आल्यावर जागे व्हायचे असे या पक्षाचे आहे. केवळ दलित मतांच्या शिदोरीवर हा पक्ष जिवंत असून महापालिका निवडणुकीत पक्ष नव्हेतर उमेदवारांच्या व्यक्तीगत जनसंपर्कावर मते वळली जातात, हेही पक्षांना ज्ञात असावे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या मदतीने आपली नगरसेवक संख्या वाढवण्याचा विचार मनात बांधला असला तरी प्रत्यक्षात याचा फायदा शिवसेनेला कमी आणि वंचितला अधिक होईल,असे दिसते. आजच्या घडीला ‘वंचित’चा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. मागील निवडणुकीतही या पक्षाचा एकही नगरसेवक दुसऱ्या क्रमांकावर निवडून आला नव्हता. त्यामुळे जर त्यांचे चार पाच निवडून आले तर त्यात ‘वंचित’चा लाभ होईल, पण शिवसेनेला युती करून काय मिळणार?

    ‘वंचित’शी शिवसेनेने अधिकृत युतीची घोषणा केली असली तरी प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच काँग्रेसवर टीका सुरुच आहे. आमची युती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी असल्याचे आंबेडकर यांनी सांगून टाकले. त्यामुळे ही युती महाविकास आघाडीशी नसल्याने आगामी निवडणुकीत तर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शिवसेनेशी आघाडी झाल्यास ‘वंचित’ राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करेल का, हाही प्रश्न आहे. जर ही युती शिवसेनेशी आहे, असे प्रकाश आंबेडकर बोलत असतील तर त्यांच्या पक्षासाठी शिवसेनेला आपल्या कोट्यातून जागा सोडाव्या लागतील. शिवसेना भाजप युती असताना आठवले यांच्या रिपाइं पक्षाला २०१२च्या निवडणुकीत २९ जागा सोडण्यात आल्या होत्या. त्यामध्ये धारावीमध्ये नगरसेवक निवडून आला होता. उलट त्या आधी युती न करता रिपाइंला जास्त आकडा गाठता आला होता. त्यामुळे जर महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढल्या गेल्यास शिवसेनेच्या वाट्याला आधीच जागा कमी येणार आहेत आणि त्यातूनही जर ‘वंचित’ला जागा सोडाव्या लागल्या तर पक्षाचे आजवरचे महापालिकेतील अस्तित्वच संपुष्टात येईल, अशी भीती आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून लढल्यास ‘वंचित’ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यापूर्वी भाजपला सोडल्या जाणाऱ्या ६५ ते ७० जागांएवढ्या जागा सोडून त्यांचे समाधान होणार नाही. कारण आताची उद्धव ठाकरेंची शिवसेना ही आता पहिल्यातील शिवसेना राहिली नसून सध्या संकटात सापडलेल्या या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस व ‘वंचित’ चांगलेच कोंडीत पकडून जास्तीत जास्त जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा प्रयत्न करतील, हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे आज जरी युती दिसली तरी भविष्यात जागा वाटपाचा तिढा सुटत नाही तोवर या युतीचे अमंगलच आहे.

    (हेही वाचा – उद्धव ठाकरे यांचं आता फक्त MIM शी युती करणं बाकी; भाजपचा उद्धवसेनेवर निशाणा)

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.