राष्ट्रीय विज्ञान दिन 2024 (national science day 2024) भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. हा दिवस भारतीय विज्ञानासाठी खूप मोठा आहे. या दिवशी १९२८ मध्ये भारतीय भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रमण यांनी ’रमण प्रभाव’चा (The Raman Effect) चा शोध लावला होता. या अभूतपूर्व शोधासाठी त्यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचा उद्देश भारतामध्ये विज्ञानाप्रती जागरुकता निर्माण करुन वैज्ञानिक दृष्टी बळावणे असा आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनामुळे मानवजातीची भौतिक प्रगती होत असते. त्याचबरोबर आर्थिक आव्हानांना देखील तोंड देता येते आणि जीवनाचा दर्जा सुधारला जातो. त्यामुळे वैज्ञानिक दिन साजरा करुन विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल जागरुकता निर्माण केली जाते.
देश स्वतंत्र होत होता तेव्हा भले भले महात्मे ’यंत्राचा’ विरोध करत होते. त्यांचा वैचारिक मागासलेपणा स्पष्ट दिसत होता. पण सावरकरांनी मात्र यंत्राचे स्वागत केले. या सो-कॉल्ड महात्म्यांना न जुमानता देशाने वैज्ञानिक प्रगती करून दाखवलीच. आज भारत देश तंत्रज्ञान व विज्ञानाच्या बाबतीत खूप पुढे गेला आहे. कोरोनाकाळात आपण जगाला लस दिली आहे, हे विसरता कामा नये.
विज्ञान दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण
त्यामुळे विज्ञान दिन साजरा करुन संशोधन आणि विकासामध्ये सतत गुंतवणूक करण्याच्या गरजेवर भर दिला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिन हा भारताच्या वैज्ञानिक प्रवासाचा उत्सव आहे. एखाद्या राष्ट्राच्या विकासात आणि प्रगतीमध्ये वैज्ञानिक प्रगती महत्त्वाची भूमिका बजावते. वाचकांनो, या विज्ञान दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण केले जाते. जसे की राष्ट्रीय विज्ञान आणि उद्योजकीय व संचार पुरस्कार, एसईआरबी महिला उत्कृष्टता पुरस्कार, आर्टिक्युलेटिंग रिसर्च असे अनेक पुरस्कार प्रदान करुन वैज्ञानिक विचारांना आणि कृत्यांना चालना दिली जाते.
या दिवशी शाळेतही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शालेय विद्यार्थी विविध वैज्ञानिक प्रयोग करतात आणि त्या प्रयोगांचे प्रदर्शन ठेवले जाते. यामुळे शालेय जीवनापासूनच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण केला जातो.
विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान
राष्ट्रीय विज्ञान दिन 2024 ची थीम आहे “विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान.” मेक इन इंडिया या प्रकल्पाला प्राधान्य देण्यासाठी ही थीम ठेवलेली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पना याद्वारे सर्वांगीण विकासासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे धोरणात्मक कार्यावर लक्ष केंद्रित करणे हा उद्देश आहे. यामुळे भारतीय नवोद्योगाला देखील चालना मिळणार आहे. विज्ञानाच्या माध्यमातून भारताला स्वावलंबी बनवण्याच्या महत्त्वावर देखील भर दिला जाणार आहे.