तुम्हाला प्रश्न पडला असेल की, वर्ल्ड रेडिओग्राफी डे (World Radiography Day) का साजरा केला जातो? खरं पाहता रेडिओग्राफीच्या विकासाची आणि महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी ८ नोव्हेंबरला ‘जागतिक रेडिओग्राफी डे’ साजरा केला जातो. पूर्वी एक्स-रे हाच एक मार्ग होता, मात्र वैद्यकीय तंत्रज्ञानात प्रगती झाल्यामुळे सीआर, एमआरआय, ऍंजिओग्राफी असा विकास झाला आहे. चला तर जाणून घेऊया रेडिओग्राफीबद्दल…
‘वर्ल्ड रेडिओग्राफी डे’ ची सुरुवात कशी झाली?
‘वर्ल्ड रेडिओग्राफी डे’ म्हणजेच जागतिक रेडिओग्राफी दिन साजरा करण्याची सुरुवात २०१२ पासून झाली. ८ नोव्हेंबर १८९५ रोजी जर्मनीच्या वॉरबर्ग विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक विल्हेम कॉनरॅड रॉएंटजेन यांनी क्ष-किरणांचा शोध लावला होता. मात्र, सुरुवातीला ही पद्धत वापरणे सोपे काम नव्हते. रेडिओग्राफरना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते, परंतु कालांतराने रेडिओग्राफीमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले. या बदलांमुळे सध्या कोणताही आजाराचे सहज निदान होते.
‘वर्ल्ड रेडिओग्राफी डे’ चे महत्त्व काय?
दर वर्षी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेब म्हणजेच एक्स-रे (क्ष-किरण) चा शोध लागला म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मेडिकल इमेजिंगबद्दल जागरुकता निर्माण केली जाते. एक्स-रे चे सर्वोत्तम फायदे म्हणजे टी.बी. चे निदान आणि डीएनए चा शोध. ग्रामीण भागातील लोकांचा रेडिग्राफीसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर विश्वास बसावा म्हणूनही हा दिवस पाळला जातो.
‘वर्ल्ड रेडिओग्राफी डे’चे उद्दिष्ट
कोणताही दिन जनमानसामध्ये रुजवण्यासाठी आणि जागृती करण्यासाठी साजरा केला जातो. त्याचप्रमाणे वर्ल्ड रेडिओग्राफी डे (World Radiography Day 2023) रेडिओग्राफीच्या फायद्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. कारण यामुळे अनेक रोगांवर त्वरित उपचार करता येतील आणि रोगातून मुक्तता मिळेल. आता तुम्ही म्हणाल की शहरात तर लोक जागरुक आहेत. मात्र आजही लहान शहरांमध्ये किंवा गावांमध्ये याबाबत जागरुकता निर्माण झालेली नाही. काही गैरसमजामुळे लो याद्वारे निदान करण्यास घाबरतात, म्हणूनच World Radiography Day साजरा केला जातो.