अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बुधवारी, संसदेत अर्थसंकल्प २०२३-२४ सादर केला. यावेळी क्रीडा मंत्रालयासाठी भरीव तरतूद घोषित केली. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक मानला जात आहे. केंद्र सरकारने युवा आणि क्रीडा मंत्रालयासाठी ३३९७.३२ कोटींची तरतूद जाहीर केली आहे, जे गेल्या वर्षीच्या तरतुदीपेक्षा ७२३.९७ कोटी रुपये अधिक आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारतीय खेळाडू जगभरात चमकत आहेत. ऑलिम्पिक असो किंवा राष्ट्रकुल स्पर्धा भारताची पदकतालिका वाढली आहे. यामध्ये केंद्र सरकारकडून क्रीडा आणि खेळाडूंवर करण्यात येत असलेल्या खर्चाचा मोठा वाटा आहे. अशा परिस्थितीत यंदाही क्रीडा मंत्रालयाला देण्यात आलेल्या तरतुदीत वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षीही क्रीडासाठी देण्यात आलेल्या तरतुदीत ४२३.१६ कोटींची वाढ केली होती.
खेलो इंडियासाठी मोठी तरदूत
‘खेलो इंडिया – नॅशनल प्रोग्रॅम फॉर डेव्हलपमेंट ऑफ स्पोर्ट्स’ हा क्रीडा मंत्रालयाचा प्रमुख कार्यक्रम आहे. यासाठी मागील आर्थिक वर्षातील ६०६ कोटींच्या सुधारित वाटपाच्या तुलनेत यंदा १,०४५ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत.
(हेही वाचा – Budget 2023: पॅनकार्ड धारकांसाठी अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा)
भारतीय क्रीडा प्राधिकरणासाठी मिळालेल्या तरतूदीत वाढ
भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI)ला मिळालेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीमध्ये ३६.०९ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सुधारित खर्च ७४९.४३ कोटी करण्यात आला होता. २०२३-२४साठी त्याचे वाटप ७८५.५२ कोटी रुपये करण्यात आले होते.
NADA आणि NDTL मिळणार इतका निधी
नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (NADA) आणि वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA)शी संलग्न नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरी (NDTL)साठी तरतूद, ज्यांना आधी SAIकडून निधी मिळाला होता, आता तो थेट मिळेल. यंदाच्या अर्थसंकल्पात NADAसाठी २१.७३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर चाचण्या घेणाऱ्या NDTLला १९.५० कोटी रुपये मिळणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय क्रीडा विज्ञान आणि संशोधन केंद्रासाठी १३ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community