चंद्र, सूर्य, तारे, तू म्हणशील तिथे वाहतील वारे… आपल्या प्रेयसीला खूश करण्यासाठी आजवर अनेकांनी अशा (अर्थहीन) विधानांचा सर्रासपणे उपयोग केला आहे. आता हे तिला पटो किंवा न पटो, पण आपल्यासाठी ती ‘पटणं’ महत्त्वाचं असतं. पण पुण्यातील एका तरुणाने चंद्र, सूर्याच्या काल्पनिक गप्पा मारण्यापेक्षा, ख-या चंद्राला गवसणी घालून अनेकांना प्रसन्न करत आपली चांद्र मोहीम यशस्वी केली आहे. सोळावं वर्ष धोक्याचं म्हणतात, पण या वयात या तरुणाने आपली जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तब्बल 50 हजार क्लिकनंतर चंद्राची प्रतिमा टिपली आहे. आणि त्याच्या या जिद्दीला खुद्द चंद्र आहे साक्षीला…
तब्बल 55 हजार क्लिक्स
16 वर्षीय पुणेकर तरुण प्रथमेश जाजू याने चंद्राचे अप्रतिम असे छायाचित्र(तोच तो सो कॉल्ड फोटो) आपल्या कॅमे-यात टिपत लोकांची वाहवा मिळवली आहे. प्रथमेशच्या या छायाचित्राला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली आहे. हे छायाचित्र टिपण्यासाठी प्रथमेशने तब्बल 55 हजार पेक्षा जास्त क्लिक्स आणि 186 जीबीचा डेटा वापरला आहे.
अशी होती मोहीम
3 मे रोजी रात्री 1 वाजल्यापासून प्रथमेशने चंद्राचे फोटो काढण्यास सुरुवात केली. जवळपास चार तास त्याची ही चांद्र मोहीम सुरू होती. या वेळात त्याने चंद्राचे 50 हजार पेक्षा जास्त फोटो क्लिक्स केले. चंद्राची जास्तीत-जास्त सुंदर प्रतिमा टिपता यावी, म्हणून आपण इतके परिश्रम केल्याचे प्रथमेशने सांगितले. तसेच थ्रीडी इफेक्ट देण्यासाठी दोन वेगळ्या फोटोंचे एचडीआर कंपोसाइट करुन, त्याने थर्ड क्वार्टर मिनरल मून चा करिश्मा साधला आहे.
अॅस्ट्रोफोटोग्राफी हा आपला छंद
या छंदाबाबत सांगताना प्रथमेश म्हणाला की, यासाठी त्याने काही लेख वाचले, तसेच युट्यूबवरील काही व्हिडिओचा अभ्यास केला. त्यानंतर चंद्राचे फोटो काढण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले. अॅस्ट्रोफिजिसिस्ट होणे हे आपले स्वप्न असून, अॅस्ट्रोफोटोग्राफी हा आपला छंद असल्याचे प्रथमेशने सांगितले.