अकोला जिल्ह्यातील कौलखेड येथील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या सात वर्षांच्या मुलीने ५ तासांत ५१ पर्यावरणपूरक गणपती बनवून नवा विक्रम केला आहे. तिच्या या उपक्रमाची इंडिया बुक रेकॉर्डने नोंद घेतली आहे. त्यामुळे तिचे कौतुक होत आहे. पूर्वा प्रमोद बगळेकर असे या चिमुकलीचे नाव आहे.
अकोल्याचे नाव देशपातळीवर कोरले
कौलखेड येथील म्हाडा कॉलनीमध्ये राहणाऱ्या पहिल्या वर्गात शिकणाऱ्या या सात वर्षाच्या पूर्वा प्रमोद बगळेकर या मुलीने पाच तासात ५१ पर्यावरणपूरक गणपती बनवले आहेत. ही कला तिच्या वडिलांकडून पाहून शिकली आहे. वडील हे शिल्पकार आहेत आणि आई ममता चित्रकार आहे. त्यामुळे तिच्यामध्ये हे गुण आपसूकच आले आहे. तिच्या या कलेमुळे तिने अकोल्याचे नाव देशपातळीवर कोरले आहे.
( हेही वाचा : दैनंदिन आयुष्यात वापरला जाणारा Cotton Swab कसा तयार झाला, जाणून घ्या इतिहास! )
लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचे उद्दिष्ट
पूर्वाच्या या कार्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डने घेतली आहे. १७ जानेवारी रोजी तिच्या या कामगिरीची इंडिया बुकने रेकॉर्डने नोंद केली. यासंदर्भात कुटुंबीयांना मेलद्वारे सांगण्यात आले आहे. तिने इतरही स्पर्धेत पारितोषिक मिळविले आहे. तिला तिचा हा विक्रम आता लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये कोरायचा आहे. यासाठी ती आणखी परिश्रम करणार असल्याचे पूर्वा हिने सांगितले आहे.