सुमारे 88 टक्के तरुण त्यांच्या सध्याच्या कामावर नाखूश आहेत, असे एका नव्या अहवालात समोर आले आहे. 2023 या नवीन वर्षात त्यांना नोकरी बदलायची आहे. लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मने 2023 वर्षांसाठी नवीन अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार, पाच जणांपैकी चार जणांना त्यांच्या सध्याच्या कामातून आनंद मिळत नसून त्यांना नोकरी बदलायची आहे. रिपोर्टनुसार, 18 ते 24 वयोगटातील सुमारे 88 टक्के तरुणांना नवीन वर्षात नोकरी बदलायची आहे. कर्मचा-यांच्या झालेल्या पगार वाढीवर ते खूश असल्याचेही समोर आले आहे.
5 पैकी 4 जणांना बदलायचीय नोकरी
लिंक्डइनने 2023 साठी एक अहवाल जारी केला आहे. ज्यात अनेक लोक आपल्या सध्याच्या नोकरीवर खुश नसल्याचे समोर आले आहे. अहवालात असेही समोर आले आहे की, 2021 च्या तुलनेत गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर 2022 मध्ये भारतात नोकर भरतीमध्ये 23 टक्क्यांनी घट झाली आहे.
( हेही वाचा: WhatsApp वर करता येणार काॅल रेकाॅर्ड; ‘या’ स्टेप्स करा फाॅलो )
30 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत लिंक्डइनने 18 वर्षे त्याहून अधिक वयाच्या दोन हजारांहून अधिक कर्मचा-यांवर संशोधन करुन हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार, 18 ते 24 वर्षे वयोगटातील सुमारे 88 टक्के तरुणांना त्यांची नोकरी बदलायची आहे. तर 45 ते 54 वयोगटातील 64 टक्के लोकांना नोकरी बदलण्याची इच्छा आहे. म्हणजेच वयस्कर लोकांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग 2023 वर्षांत नोकरी बदलण्याच्या विचारात आहे.
नोकरी सोडण्याचे ‘हे’ आहे कारण
या संशोधनानुसार, सुमारे तीन चतुर्थांश कर्मचा-यांनी सांगितले की, जर त्यांना नोकरी सोडावी लागली तर ते अधिक आत्मविश्वासाने नवीन नोकरीसाठी अर्ज करतील. वाढता खर्च आणि कमी पगार यामुळे कर्मचा-यांना नवीन नोक-या शोधाव्या लागत आहेत. सर्वेक्षणातील 35 टक्के लोक आहेत जे जास्त पगाराच्या शोधात आहेत.
Join Our WhatsApp Community