वैद्यकीय क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने रोबोटकडून शस्त्रक्रिया करण्याचा प्रयोग दिल्लीत यशस्वी झाल्यानंतर आता पश्चिम भारतात मुंबईतील वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयातही हा प्रयोग यशस्वी झाला आहे. रोबोटच्या मदतीने रुग्णालयाती ऑर्थोपॅडीक विभागाचे प्रमुख डॉ प्रमोद भोर यांनी सीवूड्स येथे राहणा-या ७२ वर्षीय रुग्णाची उजव्या पायावरील संधीबंध (वैद्यकीय भाषेत क्रूशिएट रिटेनिंग नी रिप्लेसमेंट) शस्त्रक्रिया यशस्वी करुन दाखवली. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची तब्येत झपाट्याने पूर्ववत झाली आणि शस्त्रक्रियेनंतरच्या जाणवणा-या वेदनाही लक्षणीयरित्या कमी झाल्या. अशा पद्धतीच्या शस्त्रक्रियेनंतरच्या देखभाल आणि औषधांचाही खर्च कमी होतो, असा दावा रुग्णालय प्रशासनाने केला.
( हेही वाचा : तिसरे अपत्य: १७ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेतील नोकरीचे दरवाजे बंद! )
रुग्णाची समस्या
७२ वर्षीय सेवानिवृत्त शरद चाळके हे योगशिक्षक आहेत. त्यांनी निवृत्तीनंतरही आपला योगाभ्यास सुरुच ठेवला. वयोमानानुसार त्यांच्या दोन्ही गुडघ्यांच्या रचनेमध्ये दोष निर्माण झाला. परिणामी, त्यांना चालणे, काही विशिष्ट योगासने करणे कठीण होऊन बसले. गेल्या आठ महिन्यांत हा त्रास असह्य झाल्याने त्यांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्याचा निर्णय घेतला.
गुडघ्यावरील (नी रिप्लेसमेंट सर्जरी) तब्बल साडेचार हजार शस्त्रक्रियांचा अनुभव असलेल्या ऑर्थोपॅडीक डॉ प्रमोद भोर यांनी याआधी ८० रोबोटीक गुडघ्यासंबंधित शस्त्रक्रियांमध्ये सहभाग घेतला होता. या अनुभवानंतर त्यांनी वाशीतील फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शरद चाळके यांच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रिया (क्रूशिएठ रिटेनिंग नी रिप्लेसमेंट) करण्यासाठी रोबोटची मदत घेण्याचे ठरवले. या शस्त्रक्रियेची कल्पना तसेच फायदे याबाबत रुग्णालाही त्यांनी अगोदर माहिती दिली.
अशी पार पडली शस्त्रक्रिया –
शस्त्रक्रियेअगोदर रुग्णाची कंबर, गुडघा आणि संबंधित भागांची सिटी स्कॅन तपासणी करण्यात आली. यातून गुडघ्याचे हाड किती खराब झाले आहे, याची कल्पना येते. सामान्यतः मानवी शस्त्रक्रियेतही गुडघ्यात कोणते इम्पान्ट बसवायचे आहे, हे अगोदरच ठरलेले असते. शस्त्रक्रियेपूर्वी गुडघ्या पुन्हा जोडण्याचे पोईंट्सचीही कल्पना अगोदरच घेतली जाते.
रोबोटविरहीत केवळ डॉक्टरांच्या उपस्थितीत या शस्त्रक्रियांना दीड ते पावणे दोन तासांचा वेळ लागतो. मात्र रोबोट्सच्या मदतीने हा वेळ अजून वाचतो, अशी माहिती ऑर्थोपॅडीक सर्जन डॉ प्रमोद भोर यांनी दिली. हा वेळ भविष्यात अजून कमी होईल, असेही ते म्हणाले. रुग्ण २ मार्च रोजी रुग्णालयात अॅडमिट झाले. दुस-या दिवशी ही शस्त्रक्रिया पार पडली. दोन दिवसांनी रुग्णाला डिस्चार्जही दिला गेला.
रोबोट्सची नेमकी काय मदत होते
हाडांवर पारंपरिक पद्धतीने केल्या जाणा-या या शस्त्रक्रियांच्या तुलनेत रोबोट्सच्या मदतीने केल्या जाणा-या शस्त्रक्रियांमध्ये नेमकेपणा आणि अचूकता येते. रोबोट्स हाडांमधील नेमका भाग कापण्याचे काम करतो. तेवढ्या भागांत इम्पाल्ट लावण्याचे काम आणि तो भाग शिवण्याचे काम डॉक्टर करतात. रोबोटीक पद्धतीतील शस्त्रक्रियेत सर्जनला उपकरणे हातात धरावी लागत नाहीत. कारण अगदी सबमिलीमीटरच्या अचूकतेने, हाडाची कमीतकमी हानी होईल अशा पद्दतीने छेद देण्याचे काम यंत्र करते. या यंत्रामध्ये मानवी हस्तक्षेप कमी असतो.
रोबोटिक शस्त्रक्रियेचे चांगले परिणाम रुग्णाच्या उपचारपद्धतीत दिसून येतात. शस्त्रक्रियेनंतर होणा-या वेदनेचे प्रमाण अतिशय कमी असते. खूप कमी रक्तस्त्राव होतो. शिवाय पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची गरज भासत नाही. शस्त्रक्रिया कमीत कमी वेळेत पार पडली जात असल्याने गुंतागुती उद्भवण्याचा धोकाही कमी असतो.
– डॉ प्रमोद भोर, ऑर्थोपॅडीक सर्जन, फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी
या शहरांत शस्त्रक्रियेसाठी रोबोट्स दाखल झालेत
मात्र दिल्लीत सर्वोदय रुग्णालयात जगातील पहिले गुडघ्यावरील शस्त्रक्रियेच्या (नी रिप्लेसमेंट सर्जरी) यशस्वी कामगिरीचा शोधनिबंध प्रसिद्ध झाल्यानंतर देशात अशा पद्धतीने ठाणे, गुजरात, बेंगलुरु येथील रुग्णालयांनीही आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने रोबोटकडून शस्त्रक्रिया करुन घेण्याचा विचार सुरु केला.
Join Our WhatsApp Community