अवघ्या देशाला वेड लावणारे ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ हे गाणं तरुणाईच्या ओठांवर आहे. ‘श्रीवल्ली’ला पाहून आता लवकरच बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वाघही तिच्या तालावर नाचणार आहेत. ही ‘श्रीवल्ली’ कोणती अभिनेत्री नसून चंद्रपुरातून दाखल झालेली अडीच वर्षांची वाघीण आहे. उद्यानातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी तिला खास चंद्रपुरातून आणण्यात आले आहे.
( हेही वाचा : हापूसच्या आगमनाला होणार उशीर… )
शनिवारी १९ मार्च रोजी उद्यानातील वनाधिकारी चंद्रपुरात वाघिणीला आणण्यासाठी निघाले. मंगळवारी २२ मार्च रोजी अधिकाऱ्यांची टीम या नव्या वाघिणीसह उद्यानात दाखल झाली. ही वाघीण चंद्रपुरात ताडोबात मोहर्ली येथून वनाधिकाऱ्यांनी पकडली. ‘टी२४’ या प्रसिद्ध वाघिणीची दुसरी बछडी आहे. मात्र तिने सुरुवातीला गुरे मारल्यानंतर दोन माणसांचाही जीव घेतला. त्यामुळे तिला १२ फेब्रुवारीला वनाधिकाऱ्यांनी पकडले. तिला ‘टी२४-सी२’ असे नाव दिले गेले आहे. स्थानिक वनकर्मचारी आणि पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला ‘श्रीवल्ली’ असे नाव दिले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन वाघ आहेत. बजरंग (७), बाजीराव (८). श्रीवल्लीसोबत बाजीरावची जोडी जमेल. बजरंग (७) आणि उद्यानातील दुर्गा (२) ही जोडी उद्यान प्रशासन गुजरातच्या सक्करबाग प्राणिसंग्रहायाला पाठवणार आहेत. त्या बदल्यात एक सिंहाची जोडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला मिळेल. उद्यानात लक्ष्मी (१३) आणि बिजली (१२) या दोन वाघिणी आहेत.
Join Our WhatsApp Community