मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उघडलेल्या पहिल्या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर आत मध्य रेल्वे मुंबई विभागातील लोकमान्य टिळक टर्मिनस, नेरळ, लोणावळा आणि इगतपुरी स्थानकांवर आणि पुणे विभागातील आकुर्डी, बारामती, चिंचवड आणि मिरज आदी स्थानकांवर अशाच प्रकारची रेस्टॉरंट्स सुरू करणार आहे. या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ थीममुळे प्रवाशांना सेवा तर मिळतेच शिवाय रेल्वेच्या महसुलातही भर पडत आहे.
(हेही वाचाः रेल्वे स्थानकांभोवतीचा फेरीवाल्यांचा विळखा सुटतोय! जे चहल यांना जमले नाही, ते पांडेंनी करून दाखवले)
कसे आहे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’?
‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू करणारी मध्य रेल्वे ही एकमेव रेल्वे आहे. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उघडलेले मध्य रेल्वेचे पहिले ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १८ च्या समोरील, हेरिटेज गल्ली येथे सुरू करण्यात आले आहे. यामध्ये रूळांवर बसवलेले सुधारित कोच आहेत. हेरिटेज गल्लीमध्ये नॅरो गेज लोकोमोटिव्ह, जुन्या प्रिंटिंग प्रेसचे काही भाग इत्यादींसह रेल्वेने कलाकृती बनवली आहे. ‘बोगी-वोगी’ असे नाव दिलेले हे एक उत्तम जेवणाचे ठिकाण प्रवाशांसाठी आकर्षण ठरले आहे. या कोचमध्ये १० टेबलांसह ४० ग्राहकांची व्यवस्था आहे. या रेस्टॉरंट ऑन व्हील्समध्ये आजवर सुमारे ६० हजार प्रवाशांनी जेवणाचा आनंद लुटला आहे.
नागपूरमध्येही ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’
यानंतर नागपूरला ३ फेब्रुवारी २०२२ रोजी रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू करण्यात आले. यात रेस्टॉरंटच्या डब्याला रेल्वे कोचचा हुबेहूब देखावा बनवण्यात आला. या रेस्टॉरंटमध्ये १० टेबल आणि ४० ग्राहक व्यवस्था असून आजवर सुमारे ३० हजार जणांनी हजेरी लावत जेवणाचा आस्वाद घेतला आहे.
(हेही वाचाः केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता आधार कार्डला लिंक करावे लागणार व्होटिंग कार्ड! कधीपासून होणार नियम लागू?)
या सर्व रेस्टॉरंटमध्ये उत्तर, दक्षिण, खंडीय आणि इतर पाककृती उपलब्ध आहेत. येथील दर रेल्वेने मंजूर केलेले बाजार दरानुसार आहेत. मुंबई विभागातील लोकमान्य टिळक टर्मिनस, नेरळ, लोणावळा आणि इगतपुरी स्थानकांवर आणि पुणे विभागातील आकुर्डी, बारामती, चिंचवड आणि मिरज स्थानकांवर अशाच प्रकारची रेस्टॉरंट्स सुरू करण्याची रेल्वेची योजना असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.