कोरोनामुळे जगभरातील लाखो लोकांना जिवाला मुकावे लागले आहे. त्यामुळे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी ही कधीच भरुन न निघणारी पोकळी आहे. सांगलीतील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रावसाहेब कोरे यांचा कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या मुलाने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ म्हणून त्यांचा सिलिकॅानचा पुतळा बनवला आहे. महाराष्ट्रातील सिलिकॉनचा हा पहिला पुतळा आहे. अरुण कोरे यांनी त्यांचे स्वर्गीय वडील रावसाहेब शामराव कोरे यांच्या स्मरणार्थ हा सिलिकॉनचा पुतळा बनवला आहे.
वडिलांची पोकळी भरून काढण्यासाठी बनवला पुतळा!
सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रावसाहेब कोरे यांचे मागील वर्षी ऑन ड्युटी असताना कोरोना झाल्याने निधन झाले होते. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. कोळी समाजाचे ते नेते होते. त्यांनी अनेक तरुणांना नवनवीन उद्योग सुरू करण्यासाठी मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन केले होते. कोरे यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. वडिलांची पोकळी कशी भरून काढायची याचा विचार करत असताना, सिलिकॉन पुतळ्याची संकल्पना अरुण कोरे यांना सुचली. त्यातून हा पुतळा उभारण्यात आला. राज्यातील सिलिकॉनचा हा पहिला पुतळा आहे, तर देशातील हा दुसरा सिलिकॉनचा पुतळा आहे.
(हेही वाचा : अमरिंदर सिंग नक्की आहेत कोण? नेटकरीही झाले संभ्रमित)
ही आहेत पुतळ्याची वैशिष्ट्ये!
सिलिकॉन पुतळ्याची लाईफ तीस वर्षे असते. दररोज पुतळ्याचे कपडे बदलता येतात, रोज हेअर स्टाईल चेंज करता येते. सर्व सामान्य माणसासारखाच हा पुतळा दिसतो. त्वचा, रंग, रूप, केस, भुवया, चेहरा, डोळे आणि शरीराचे अवयव हे जिवंत माणसासारखे हुबेहूब दिसतात. समोर असणारा हा पुतळा आहे की जिवंत व्यक्ती असा प्रश्न बघणाऱ्या व्यक्तीला पडतो. बंगळुरूमधील श्रीधर मूर्ती या मूर्तीकाराने तब्बल पाच महिने परिश्रम घेऊन हा पुतळा बनवला आहे. आपल्या वडिलांचे निधन झाल्याचे दुःख आहे पण वडील हे पुतळ्याच्या रूपाने सदैव आपल्या कुटुंबासोबत राहावे आणि त्यांची उणीव भासू नये हा पुतळा बनवण्यामागचा उद्देश असल्याचे अरुण कोरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community