फास्टटॅग प्रणाली लागू केल्यानंतर केंद्र सरकार देशातील टोलनाक्यांसाठी एका मोठ्या योजनेवर काम करत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत ही माहिती दिली. या योजनेंतर्गत राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व टोल बंद करण्यात येणार आहेत. यामुळे वाहतुक कोंडी थांबण्यास मदत होणार आहे. पण टोल वसुलीत कोणतीही सवलत मिळणार नाही, टोलची वसुली ही नियमित सुरू राहणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
एका वर्षात लागू होणार प्रणाली
अमरोहा येथील बहुजन समाजवादी पक्षाचे खासदार कुंवर दानिश अली यांनी संसदेत टोलनाक्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना गडकरी बोलत होते. ९३ टक्के वाहने फास्टटॅग वापरत असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील एक वर्षात सर्व टोलनाके हटवण्यात येऊन त्याजागी स्वयंचलित टोल प्रणाली लागू करण्यात येणार असल्याचे, गडकरी यांनी सांगितले.
(हेही वाचाः आता कोरोना डॉग स्क्वॉड, थायलँडमध्ये कुत्रे सेकंदात ओळखतात कोरोना रुग्ण!)
अशी होणार वसुली
देशात सुलभ आणि वेगवान वाहतूक प्रवास करण्यासाठी या स्वयंचलित प्रणालीत सर्व वाहनांना जीपीएसद्वारे जोडण्यात येईल. याद्वारे प्रवासाच्या वेळी होणा-या टोलचा खर्च थेट ग्राहकांच्या बॅंक अकाऊंटमधून वजा करण्यात येणार आहे, असे गडकरी यांनी लोकसभेत सांगितले. तसेच फास्टटॅग प्रणालीचा वापर न करणार्या वाहनांसाची पोलिस तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाहनाला फास्टटॅग न लावल्यास टोल चोरी आणि जीएसटी चोरीच्या घटना नोंदविण्यात येतील. टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडीच्या तक्रारी दूर करण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे टोलनाक्यांवरील लांबच लांब रांगा आणि होणारी वाहतूक कोंडी यापासून सुटका होण्यास मदत होते.
रशियातील तंत्रज्ञान
प्रस्तावित स्वयंचलित टोल प्रणाली ही सध्या रशियामध्ये लागू असून, तिथे या प्रणालीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. टोलच्या अंतरानुसार ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे वजा केले जातात. ही प्रणाली आपल्या देशात वर्षभरात लागू होईल. येत्या पाच वर्षांत टोलवसुली १.३४ लाख कोटींवर जाईल, असा विश्वास वाहतूक व महामार्ग मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community