चिखलदरा तालुक्यातील आमझरी हे ‘मधाचे गाव’ म्हणून विकसित करण्यासाठी सर्व विभागांनी काटेकोर अंमलबजावणी करावी. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल, असा विश्वास राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा यांनी बुधवारी व्यक्त केला.
( हेही वाचा : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमात राज्य सरकारने केली सुधारणा)
‘मधाचे गाव’ म्हणून विकसित होणार
राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत आमझरी येथे मधाचे गाव संकल्पना राबविण्यात येत आहे. सिन्हा म्हणाल्या की, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, ग्रामीण भागातील युवक व महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मधाचे योग्य व शास्त्रीय पद्धतीने संकलन व त्यानुषंगाने उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. मधाचे गाव म्हणून विकसित होण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. मधमाश्यांचे पर्यावरणातील महत्व मोठे आहे. त्याचा पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठीही लाभ होतो. हे लक्षात घेता मधमाश्यांच्या संवर्धनाबाबत उपक्रम आखण्यात आला आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल व मधु पर्यटनाच्या माध्यमातून गावाचा विकास होईल. मध केंद्र योजनेत मधमाशी पालनासाठी प्रशिक्षण, साहित्यवाटप, अनुदान आदी सुविधा मिळतात. त्याचा लाभ अधिकाधिक नागरिकांना करून द्यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
सिन्हा यांनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना उपक्रमाची माहिती दिली. यावेळी स्थानिकांना आग्या मधमाश्यांचे कीटवाटप करण्यात आले. खादी व ग्रामोद्योग आयोग व वन विभागामार्फत आमझरी येथील महिलांना नुकतेच अगरबत्ती मशीनचे प्रशिक्षण देण्यात आले. या महिलांना यावेळी प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
Join Our WhatsApp Community