- ऋजुता लुकतुके
अपार इंडस्ट्रीजचा शेअर मागची ४ वर्षं अखंड धावत होता. डिसेंबर २०२४ मध्ये शेअरने अगदी १०,००० रुपयांचा टप्पाही ओलांडला होता. पण, नवीन कॅलेंडर वर्षांची सुरुवात या शेअरसाठी लाभदायक ठरलेली नाही. जानेवारी २०२५ मध्ये या शेअरने तब्बल ३० टक्क्यांची घसरण अनुभवली आहे. अगदी नेमकेपणाने सांगायचं तर मागच्या १७ ट्रेडिंग सत्रांत शेअर ३७ टक्क्यांनी खाली आला आहे. (Apar Industries Share Price)
डिसेंबर तिमाहीचे निकाल मनासारखे लागले नाहीत हे एक कारण. कंपनीची बाहेरच्या देशात कमी झालेली निर्यात हे या पडझडीमागील मुख्य कारण असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. खरंतर कंपनीचा महसूल गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढला आहे. पण, कच्च्या मालाची अनुपलब्धता आणि वाढलेल्या किमती तसंच कच्च्या मालासाठी चीनसह इतर देशांवर अवलंबून राहवं लागल्यामुळे कंपनीचा खर्चही वाढत गेला आणि परिणामी, गेल्यावर्षी या तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा निव्वळ नफा १० टक्क्यांनी घटला. आधीच्या २१० कोटी रुपयांच्या तुलनेत तो १७५ कोटींवर आला. (Apar Industries Share Price)
ही गोष्ट गुंतवणूकदारांना रुचलेली नाही. शिवाय कंपनीची निर्यातही जवळ जवळ ७ टक्क्यांनी घटली आहे. एकूण १४० देशांमध्ये कंपनी व्यवहार करते आणि निर्यात हा कंपनीच्या उलाढालीतील मोठा हिस्सा आहे. त्यामुळे शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात शेअर अर्ध्या टक्क्याने वर असला तरी ११,७७९ या आपल्या वार्षिक उच्चांकाच्या खूप खाली आला आहे. (Apar Industries Share Price)
(हेही वाचा – Bandhan Bank Share Price : बंधन बँकेचा नफा ४२ टक्क्यांनी घटला, तरीही शेअर २.२५ टक्क्यांनी वर का?)
अपार इंडस्ट्रीज ही भारतातील सगळ्यात जुनी कन्डक्टर आणि केबल बनवणारी कंपनी आहे. तेल, पॉलीमर आणि ल्युब्रिकन्ट यांच्या वहनासाठी केबल बनवण्याचं काम ही कंपनी करते. १९५८ मध्ये स्थापना झाल्यापासून कंपनीचा १४० देशांबरोबर व्यापार चालतो. आताही कंपनीचं भाग भांडवल ३०,००० कोटी रुपयांचं आहे. (Apar Industries Share Price)
आणि तिमाही निकाल फारसे आश्वासक नसले तरी ते निराश करणारेही नाहीत, असं नोमुरा या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेनं म्हटलं आहे. कंपनीने या शेअरमध्ये खरेदीचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला आहे. पण, आधीचं ११,७०० रुपयांचं लक्ष्य कमी करून ते १०,३०० वर आणलं आहे. आताच्या शेअरच्या भावापेक्षा हे लक्ष्य ४३ टक्क्यांनी वर आहे. (Apar Industries Share Price)
(डिस्क्लेमर-शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर यात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट कुठल्याही शेअरमध्ये खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community