सावरकर स्मारकात गुरु – शुक्र युती पाहण्याचा खगोलप्रेमींनी लुटला आनंद 

सूर्यमालेत सूर्य, पृथ्वी, चंद्र आणि इतर ग्रह यांच्या विशिष्ट स्थानांमुळे आणि भ्रमण काळामुळे आपल्याला अवकाशात अनेक प्रकारच्या खगोलीय घटना अनुभवास येतात. अशीच एक घटना म्हणजे ग्रहांची युती. यात कोणत्याही दोन खगोलीय वस्तू एकमेकांच्या जवळ दिसतात. त्यांना युती म्हटले जाते. गुरू आणि शुक्र ग्रहाची युती गुरुवारी, २ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता पाहण्याचा योग खगोलप्रेमींसाठी जुळून आला. यानिमित्ताने खगोल मंडळाच्या वतीने दादर येथील नागरिकांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ६ दुर्बिणी लावण्यात आल्या होत्या.
याप्रसंगी दादर येथील शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतला आणि शुक्राचे तेज आणि गुरुची छटा पाहून खगोलप्रेमींनी आनंद व्यक्त केला. सर्व वयोगटातील नागरिकांनी आकाशातील ग्रह – ताऱ्यांविषयीचे शंकानिरसन करून घेतले. याप्रसंगी खगोल मंडळाचे १५ प्रतिनिधी यावेळी सावरकर स्मारकात नागरिकांना गुरु आणि शुक्राचे दर्शन घडवून देत होते, तसेच त्यांना त्याविषयी अधिक माहिती देत होते. यासंबंधी बोलताना खगोल मंडळाचे सचिव डॉ. अभय देशपांडे ‘हिंदुस्थान पोस्ट’ सोबत बोलताना म्हणाले, खगोल मंडळ नागरिकांना आकाश दर्शनाचा कार्यक्रम ठिकठिकाणी राबवत असते, विशेष म्हणजे मूक-बधिर आणि अपंग मुले आणि वृद्धाश्रमासाठी मोफत आकाश दर्शनाचे कार्यक्रम राबवले जातात. यामाध्यमातून लोकांना आकाशातील ग्रह-ताऱ्यांविषयी ज्ञान करून देणे, हा यामागील उद्देश आहे, असे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here