फिरायला जाताय? ‘या’ जिल्ह्यात ट्रेकिंगसह कॅम्पिंगला बंदी; वनविभागाने पर्यटकांना जारी केल्या सूचना

159

गेली दोन वर्ष कोरोनामुळे पावसाळी पर्यटनावर निर्बंध होते. यंदा पर्यटनावर कोणतेच निर्बंध नसल्याने पर्यटनाचा उत्साह वाढला आहे परंतु अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन सुद्धा झाले आहे. शनिवार ९ जुलैला कळसुबाई शिखरावर पाचशे पर्यटक अडकले होते. पूर्व सूचना देऊन सुद्धा पर्यटकांनी नियमांचे पालन न केल्याने आता वन विभागाने पर्यटनावर निर्बंध लागू केले आहेत. नोव्हेंबर अखेरपर्यंत ट्रेकिंगसह मुक्कामाला (कॅम्पिंग) मनाई करण्यात आली असून, पोलिसांच्या मदतीने आता गुन्हे दाखल करण्याचा इशाराही वनविभागाकडून देण्यात आला आहे.

( हेही वाचा : BEST Route Update : पावसाचे पाणी साचल्याने सायन येथील बसमार्गात बदल)

पर्यटन बंदी लागू करण्याचे आदेश

कळसुबाई शिखरावर शनिवार ९ जुलैला दुपारी पाचशे पर्यटक अडकले होते. त्यांना पावसामुळे पर्वतावर जाऊ नये असा पूर्व सल्ला देण्यात आला होता. तरीही नियमांचे उल्लंघन करून अनेकजण या शिखरावर गेले. यामुळे पोलीस, वन पथकासह, ग्रामस्थांचीही चांगलीच धावपळ झाली वेळीच मदत मिळाल्याने या पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. यामुळे आता नाशिक वन्यजीव विभागाने अभयारण्य क्षेत्रात आता प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. यानुसार कळसुबाई, सांदण दरी, हरिश्चंद्रगड, रतनगड, अमृतेश्वर मंदिराजवळील धबधबे, भंडारदरा, रंधा धबधबा येथे ट्रेकिंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. यासह गर्दी वाढल्यास पर्यटन बंदी लागू करण्याचे आदेश व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

हुल्लडबाजी, नियमभंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील तसेच नियंत्रणापेक्षा गर्दी वाढल्यास कलम १४४ लागू करण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या संमतीने कार्यवाही होईल. असे वनसंरक्षकांनी स्पष्ट केले आहे.

पर्यटकांना सूचना

  • नोंदणीकृत पर्यटकांनाच अभयारण्यात प्रवेश दिला जाणार
  • धोकादायक ठिकाणी फोटोसेशन, सेल्फीला मनाई
  • धबधब्यालगत, पाण्यात पोहण्यास मनाई
  • हुल्लडबाज पर्यटकांवर गुन्हे दाखल होणार
  • मद्यप्राशन करणाऱ्यांवर गुन्हे केले जाणार
  • २५ पेक्षा अधिक आसन क्षमतेच्या वाहनांना मनाई
  • जंगलक्षेत्रासह गड किल्ल्यांवर रात्री राहण्यास बंदी
  • गर्दी झाल्यास संचारबंदी केली जाणार
  • सांदण दरीसह, डोंगरावर ट्रेकिंग बंद
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.