भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणा-या स्वातंत्र्यविरांनी वंदे मातरम् म्हणत हसत-हसत मरणाला कवटाळले. वंदे मातरम् या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यशदेखील आले. बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी 15 डिसेंबर 1882 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीमधील ‘वंदे मातरम्’ हे गीत भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे खरे प्रेरणागीत होते. या गीताला 24 जानेवारी 1950 ला राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यात आला होता. याच प्रेरणागीताच्या जन्माची कहाणी जाणून घेऊया.
बंकीमचंद्र चटोपाध्याय यांचा जन्म 16 जून 1838 ला नैहाटी बंगालच्या काठालपाडा येथे झाला. त्यांच्या वडीलांचे नाव देवचंद्र चटोपाध्याय होते. बंकीमचंद्र यांना तीन भाऊ होते. यामध्ये दोन मोठे श्यामचरण आणि संजीवचंद्र आणि एक लहान भाऊ पूर्णचंद्र. मात्र या चारीही भावांमध्ये बंकीमचंद्र हे साहित्यात हुशार होते. लहाणपणापासूनच कुशाग्र बुद्धी असलेले बंकीमचंद्र न्याय, ख-याची बाजू घेणारे होते. त्यामुळे कायद्याचे शिक्षण घेत असताना, त्यांना डेप्युटी मॅजिस्ट्रेट आणि डेप्यूटी कलेक्टरची नोकरी लागली. त्यांनी तीस वर्षांपर्यंत नियमित डेप्युटी कलेक्टरच्या पदावर नोकरी केली. इंग्रज सरकारशी मतभेद आणि विशिष्ट योग्यता असूनही त्यांना पदोन्नती मिळत नव्हती, त्यामुळे त्यांनी स्वेच्छेने नोकरी सोडली.
( हेही वाचा: बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार पुरस्कारावर अहिराणी ‘यासनी मायनी यासले’ची मोहोर )
‘असा’ झाला वंदे मातरम् चा जन्म
सन्याशांचे बंड आणि स्वातंत्र्य युद्धाचे आकर्षण असलेले बंकिमचंद्र चटोपाध्याय हे डेप्यूटी कलेक्टर असताना, 1857 मध्ये इंग्रज सरकार ‘गाॅड सेव्ह दी क्वीन’ हे ब्रिटीशांचे राष्ट्रगीत भारताचे राष्ट्रगीत म्हणून रुजू करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे त्यांनी हे गीत सैन्यात आणि शाळांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न सुरु केला.
इंग्रज सरकारच्या या निर्णयामुळे भारतीयांसोबतच बंकिमचंद्रही खूप संतापले. त्यांनी यावर विचार केला. त्यांच्या लक्षात आले की, गेल्या हजार वर्षांच्या गुलामगिरीमुळे भारत हा अखंड असा देश या राहिला नव्हता आणि भारताचे कोणतेही राष्ट्रगीत नव्हते, म्हणून 1976 मध्ये 7 नोव्हेंबरला त्यांनी देशभक्तीच्या भावनांनी ओथंबलेले आणि भारत देशाला मातृभूमी असे संबोधित करुन तिचे नमन करणारे वंदे मातरम् हे सहा कडव्यांचे गीत लिहिले. बंकिमचंद्र चटोपाध्याय मागील शतकातील संन्याशांचे बंड या ऐतिहासिक घटनेवर आधारित 15 डिसेंबर 1882 साली आनंद मठ ही कादंबरी लिहिली. त्यांनी या कादंबरीत वंदे मातरम् ही कविता समाविष्ट केली. या कादंबरीत देशभक्त संन्यासी वंदे मातरम् हे गीत सामुहिकपणे गाताना दाखवले आहेत.